Get it on Google Play
Download on the App Store

कथेकरी - अभंग २६७७ ते २७००

२६७७

आहारालागीं कथा । करिताती पैं सर्वथा ॥१॥

आहार न मिळतां जाण । कथेलागीं पुसे कोण ॥२॥

आहार मिळतां पोट भरी । पुराण सांगे बरव्या परी ॥३॥

आहार मिळतां संध्यास्नान । आहारार्थ जपध्यान ॥४॥

आहारालागीं उपासना । नीचसेवना आहारेंची ॥५॥

आहाराकारणें सर्व हेत । एका जनार्दनीं गात आहारेंची ॥६॥

२६७८

द्रव्याचिया आशें । कथा करणें सायासे ॥१॥

उभयंता नरका जोडी । मेळविलीं तीं बापुडीं ॥२॥

निराश करुनी मन । करा कथा तें कीर्तन ॥३॥

देवा आवड भक्तीची । एका जनार्दनीं साची ॥४॥

२६७९

द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥

तयांचियां दोषां नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥

शास्त्रांची तो मती न चाले सर्वथा । पुराणे हो तत्त्वता मौनावलीं ॥३॥

एका जनार्दनीं दोषां नाहीं पार । रवरव निर्धारें भोगिताती ॥४॥

२६८०

द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥

द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥

द्रव्याचिये आशे पुराण सांगती । सकुल ते जाती नरकामध्यें ॥३॥

द्रव्याचियें आशें कथेचा विकारा । प्रत्यक्ष तो खरा मातंगची ॥४॥

एका जनार्दनीं नैराश्य भजन । तो प्राणी उत्तम कलियुगीं ॥५॥

२६८१

द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं ॥१॥

द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मीं ॥२॥

द्रव्य देऊनियां दान परतोनि घेती । सूकार ते होती जन्मोजन्मी ॥३॥

द्रव्य घेऊनियां रंगी जें नाचती । वैष्णव ते न होती जन्मोजन्मीं ॥४॥

एका जनार्दनीं निर्धन भजन । तेथें नारायण संतुष्टची ॥५॥

२६८२

करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा ॥१॥

नाहीं पुण्य दोघां गांठीं । हीन भाग्य तीं करंटीं ॥२॥

नैराश्य कथा भजन । तेणें तुष्ट नारायण ॥३॥

एका जनार्दनीं वाणी । व्यास बोललें पुराणीं ॥४॥

२६८३

बाजारीं बैसोनि सांगें ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी ॥१॥

मेळवोनी जन सांगे निरूपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठीं ॥२॥

न कळे पामरा आपुला विचार । करी अनाचार जगामध्यें ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें फजीतखोर । भोगिती अघोर नरक देखा ॥४॥

२६८४

प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥

आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावें ॥२॥

पतिव्रतेनें जैसा पतीच वधिला । प्रायश्चित्त तिला कोणी द्यावें ॥३॥

मातें बाळकासी विषपान दिलें । प्रायश्चित या बोले कोणीं द्यावें ॥४॥

एका जनार्दनीं कथा ती माउली । विकितां घडली ब्रह्माहत्या ॥५॥

२६८५

कोटी ब्रह्माहत्या घडे । कथाविक्रय तया जोडे ॥१॥

हा तों पुराणी निवाडा । पाहे कीं रे दगडा ॥२॥

एका जनार्दनीं जाण । पंचमहापातकीं तो पुर्ण ॥३॥

२६८६

बैसोनियां हातवटी । सांगे गोष्टी लौकिक ॥१॥

तैसें नव्हें भक्तपण । घातला दुकान पसारा ॥२॥

वर्मांचे ते पाठांतर । केला भार बहुतची ॥३॥

एका जनार्दनीं सार । भुकें फार खर जैसा ॥४॥

२६८७

पोट भरावया भांड । जैसा बडबडी तोंड ॥१॥

तेवीं विषयालागीं जाण । शास्त्र व्युत्पत्ती श्रवण ॥२॥

विषयवासना धरुनी थोर । दावी वरवर आचार ॥३॥

जेवीं काग विष्ठा देखे । तेंवीं विषय देखोनि पोखे ॥४॥

म्हणे जनार्दनाचा एक । सुटिका नोहे तया देखा ॥५॥

२६८८

आडक्या कारणें जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त ॥१॥

ऐसिया दांभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥

गाजराची तुळा साची । वाट पाहाती विमानाची ॥३॥

एका जनार्दनीं खोटा भाव । तयासी न भेटे देव ॥४॥

२६८९

विषयप्राप्तीलागीं जाण । धरी बकापरी ध्यान ॥१॥

विषयीक गायन करी । जैसा खर भुकें स्वरी ॥२॥

नाहीं संतचरणीं मन । सदा विषयावरी ध्यान ॥३॥

विषय लोटी परता होई । एका जनार्दन पायीं ॥४॥

२६९०

नाहीं ध्यान तें अंतरीं । सदा विषयी दुराचारी ॥१॥

स्वप्नीं नेणें नामस्मरण । करी विषय सेवन ॥२॥

अतीत अभ्यागत । जया नावडे चित्तांत ॥३॥

एका शरण जनार्दनीं । ऐसा पामर तो जनीं ॥४॥

२६९१

वरीवरी दाविती आचार । अंतरीं तो अनाचार ॥१॥

मुखीं नाहीं कधीं नाम । सदा काम विषयाचा ॥२॥

नेणें कधीं संतसेवा । न करी देवा पूजन ॥३॥

शरण एका जनार्दनीं । ऐसा जन्मला तो जनीं ॥४॥

२६९२

वासना विषयीं सदा वसे । तेथें देवा कोण पुसे ॥१॥

सदा तळमळी मन । करी ध्यान विषयांचें ॥२॥

रात्रंदिवस करी चिंता । नाठवी सर्वथा रामनाम ॥३॥

एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव कैंचा भेटे देव ॥४॥

२६९३

दांभिकाची भक्ति । वरीवरी देहस्थिती अंतरीं तो गती । वेगळी बापा ॥१॥

नाम गाय प्रेमभरित । रडे स्फुंदे डोळे पुसीत । अंतरीचा हेत । वेगळा बापा ॥२॥

वृंदावनाचें तें फळ । कडु जैसें सर्वकाळ । तैसा मनोमेळ । वेगळा बापा ॥३॥

धरुनी ध्यान । बक जैसा लक्षी मीन । परस्त्री देखोन । विव्हळ बापा ॥४॥

सांगे आत्मज्ञान स्थिती । अंतरीं तों वेगळी रीती । द्रव्य जोडे कैशा रीती । हेंची ध्यान बापा ॥५॥

न कळे कांहीं स्वहित । सदा द्रव्यदारांवर चित्त । तयासी भगवंत । प्राप्त नाहीं ॥६॥

शरण एका जनार्दन । नको मज तयाचें दरुशन । अभाविकांसी भाषण । नको देवा ॥७॥

२६९४

तोंडभरी विवेक मनीं वाहे अभिलाख । विवेक केला रंक विषयाचा ॥१॥

वैराग्याविण ज्ञान बोलती तें उणें । घरोघरीं पोसणें लाविताती ॥२॥

जुनाट परिपाठी सांगताहे गोष्टी । विरक्तिविण पोटीं ज्ञान नेघे ॥३॥

परिसोनी ग्रंथ निरोप ज्ञानकथा । मनीं वाहे आस्था विषयांची ॥४॥

आरंभींच डाव पडियेला खोटा । पचलें नाहीं पोटा रामनाम ॥५॥

धडधडीत वैराग्य वरी वाहे विवेक । ज्ञानासी तो एक अधिकारी ॥६॥

वैराग्य विवेक बाणलेंसें अंगीं । ज्ञान तयालागीं वोसरलें ॥७॥

एका जनादनीं विवेकेशीं भेटी । वैराग्याविण गोष्टी फोल होय ॥८॥

२६९५

करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊं पाहें ॥१॥

द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसें ॥२॥

टाळी लावूनियां जाण । दृढ घालिती आसन । अंतरी तो ध्यान । वल्लभेचें ॥३॥

धनलोभाचा वोणवा । तेथें जाळिलें जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकारुढी ॥४॥

धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा । तयासी तो परमार्थ तत्त्वतां । न घडे जाणा ॥५॥

एकलीच कांता । नाश करी परमार्था । तेथें धनलोभ येतां । अनर्थचि होय ॥६॥

एका जनर्दनीं । काम क्रोध लोभ तिन्हीं । द्रव्यदारा त्यजोनी । नित्य तो मुक्त ॥७॥

२६९६

शतावती श्रवण अधिक पैं जालें । तेणें अंगा आलें जाणणेपण ॥१॥

पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहटा जाणिवेचा ॥२॥

श्रवण तो लौकिक मनीं नाहीं विवेक । बुद्धीसी परिपाक कैसेनि होय ॥३॥

मी एक ज्ञाता मिरवीलौकिक । म्हणोनि आक्षेपक सभेमाजीं ॥४॥

नानापरी व्यक्ति मिरवी लोकांप्रती । वाढवितो महंती मानालागीं ॥५॥

मी एक स्वयपांकी मिरवे लौकिकीं । इतर कर्मासी शुद्धी नाहीं ॥६॥

कर्माकर्मीं कांहीं न धरीं कंटाळा । मानितो विटाळा ब्राह्मणाच्या ॥७॥

मजहुनी ज्ञाता आणिक तो नाहीं । ऐसें जाणिवेचे डोहीं गर्वें गेला ॥८॥

नित्य पुढिलाचें गुण दोष आरोपिती । श्रवणाची निष्पत्ति फळली ऐशी ॥९॥

लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था । वरी वरी हरिकथा काय करिसी ॥१०॥

एका जनार्दनीं साच न रिघे मन । तंववरी समाधान केवीं होय ॥११॥

२६९७

वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां ।

भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥

थिता बाईल कां सांडिली । आशा परवंधूं कां धुंडिली ।

शुभ्र सांडोनि भगवी कां गुंडिली । ऐसी भंडी कांहो मांडिली ॥२॥

तुम्हा प्रपंचावर एके घाई रुसवेना । अहं ज्ञातेपणा कोण्हा पुसवेना ।

एका जनार्दनीं मन जिंकवेना । मेल्या कुतर्‍यासारखें कां बसवेना ॥३॥

अभाविक - खल - दुर्जन

२६९८

अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥

हरुषें मुखें नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनीं वाहे ॥२॥

बोले जैसा का भाट । वर्म कांहीं न कळे नीट । नामस्मरण स्पष्ट । न घडे तया ॥३॥

ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एका जनार्दनींक अप्रीति । तयाची देवा ॥४॥

२६९९

वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं ॥१॥

वायां तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥

अरण्यांत जैशी सुकरें बैसतीं । तैसें मठाप्रती करुनी बैसे ॥३॥

उदय होतांची लपतें उलुक । तैसें तो मूर्ख समाधि बैसे ॥४॥

एका जनार्दनीं वायां गेलें सर्व । संसार ना देव दोन्हीं शून्य ॥५॥

२७००

भलतीयासी म्हणती । अहो महाराज निश्चितीं ॥१॥

ऐसें अंधळे हे जन । गेले भुलोन संसारें ॥२॥

महराज जनार्दन । नेणती तयाचे चरण ॥३॥

दीना महाराज म्हणती । एका जनार्दनीं सांगूं किती ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३