Get it on Google Play
Download on the App Store

कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८

२७८१

वरीवरी दावी भक्ति । अंतरीं असे कामासक्ति ॥१॥

माझें घर माझें कलत्र । माझें गोत्र माझा पुत्र ॥२॥

ऐसा प्रपंची गुंतला । तयावरी काळघाला ॥३॥

एका जनार्दनीं शरण । काळ वंदितसें चरण ॥४॥

२७८२

अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥

जळो जळो त्याचें ज्ञान । काय नटाचें भाषण ॥२॥

टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥

शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानीं ॥४॥

२७८३

अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥

जैसें फळ वृंदावन । परी अंतरीं कडुं पूर्ण ॥२॥

सदा वाहे तळमळ चित्त । वरीवरी दावी परमार्थ ॥३॥

एका शरण जनार्दनीं । ऐसे नर पापखाणी ॥४॥

२७८४

किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥

न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥

भलतिया वरी धांवें । श्वान जैसें ते स्वभावें ॥३॥

एका जनार्दनीं जाण । वाहतो देवाची तो आण ॥४॥

२७८५

किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥

जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥

वाउगे पंथें असती जनीं । तसे मांडणी गुंतू नका ॥३॥

एका जनार्दनीं लडिवाळ । पूर्ण कृपाळू संतांचा ॥४॥

२७८६

पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणें कांहीं ॥१॥

शास्त्रीयाचे वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें कांहीं ॥२॥

वेदांताच्या वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥३॥

पुराणिकांचे वचनीं द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥४॥

संताच्या वचना द्यावें अनुमोदन । एका जनार्दनीं तेणें हित होय ॥५॥

२७८७

पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणें घडें जाण सर्व कर्म ॥१॥

वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥

यज्ञादिक कर्में घडतां सांग । मी मी संसर्ग घडतां वायां ॥३॥

दानधर्मविधी धरितां शुद्ध मार्ग । मी मी म्हणतां याग वायां जाय ॥४॥

एका जनार्दनीं मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्वफळ ॥५॥

२७८८

समूळ कमानेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावे ॥१॥

अंतरीं अनिवार कामना । विरक्ति तो दाखवी जनी ॥२॥

नाम गर्जता हे होटी । एका जनार्दनीं काम पळे नेहटी ॥३॥

२७८९

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥

वाउगाची सोस न करी सायास । रामनामें सौरसा जप करी ॥२॥

यज्ञयागादिकक न घडतां साधनें । न्युन पडतां पतन सहज जोडे ॥३॥

एका जनार्दनीं चुकवी येरझार । करीं तूं उच्चार रामनाम ॥४॥

२७९०

तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहु वाचें । तुझें तुज हिताचें । वर्म आम्हीं सांगूं ॥१॥

होई सावध झडकरी । नको पडुं आणिके भरीं । वायांची धांवसी दिशाभरी । श्रमूं निर्धारीं तुजची ॥२॥

ब्रह्मज्ञानाची भरोवरी । वाउगी न करी निर्धारी । कर्म अकर्म आधीं सारी । मग निर्धारीं सुख पावे ॥३॥

जेणें तुष्टे जनार्दन । हेंचि करी पां साधन । शरण एका जनार्दन । वाउगा शीण न करी ॥४॥

२७९१

जेथें कष्टें न लभे ज्ञान । आधीं पाहिजे समाधान । योगयाग तपाचें नाहीं कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥

आणिक नको रे साधन । वायां शीण ब्रह्माज्ञान । आम्हीं मुखीं गाऊं रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचें ॥२॥

आलिया जन्माचें सार्थक । जन्मजरा निवारुं दुःख । कायावाचामनें संतसेवा देख । दुजा हेतु नाहीं मनीं ॥३॥

जन तोचि जनार्दन । साक्षी तया लोटांगण । एका जनार्दना शरण । कायावाचामनेंसी ॥४॥

२७९२

ममता ठेवूनि घरीदारीं । वायां कां जाशी बाहेरीं ॥१॥

आधीं ममत्व सांदावें । पाठीं अभिमानी सहजी घडे ॥२॥

ममता सांडी वांडेकोडें । मोक्षसुख सहजी घडे ॥३॥

एका जनार्दनीं शरण । ममता टाकी निर्दाळून ॥४॥

२७९३

लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरतां करी कां रें ॥१॥

वादक निदक भेदक ऐसें त्रिविध । याचा टाकूनि भेद भजन करी ॥२॥

एका जनार्दनीं त्रिविधापारता । होऊनि परमार्था हित करीं ॥३॥

२७९४

रस सेविल्यासाठीं । भोगवी जन्माचिया कोटी ॥१॥

रसने आधीन सर्वथा । रसनाद्वारें रसु घेतां ॥२॥

जंव रसना जिंतिली । तंव वाउगीच बोली ॥३॥

एका जनार्दनीं शरण । रस रसना जनार्दन ॥४॥

२७९५

उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं या निःशेष सांडीं बापा ॥१॥

सर्वांठायीं देव जगीं तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥

काम अकाम सकाम निष्काम । हे सोपें उपाय साधकांसी ॥३॥

आसन ध्यान धारण तें ध्येय । हे सोपे उपाय साधकांसी ॥४॥

दंडन मुंडन नको तीर्थाटन । एका जनार्दन हृदयीं धरीं ॥५॥

२७९६

जिव्हा रस चाखी अवलोकी नेत्र । प्रेरक पवित्र आत्माराम ॥१॥

बोलतसे मुख त्वचे कळे स्पर्श । प्रेरक परेश आत्माराम ॥२॥

सुखदुःख ज्ञान होतसे पैं चित्ता । प्रेरक पंढरीनाथविण नाहीं ॥३॥

घ्राणा परिमळ ऐकती श्रवण । प्रेरक नारायण सर्वसाक्षी ॥४॥

हस्तें घेणें देणें चरणीं गमन । प्रेरक ईशान आत्माराम ॥५॥

ज्याच्या सत्ताबळें हाले वृक्षपान । प्रेरक भगवान सर्वांचा तो ॥६॥

एका जनार्दनीं पाय हे धरावे । ध्यान हें करावें हृदयीं त्याचें ॥७॥

२७९७

वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥

हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥

उपासना मार्ग हेंचि कर्मकांड । हेंचिक जें ब्रह्मांड जनीं वनीं ॥३॥

हेचि देहस्थिति विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥

एका जनार्दनीं शांति क्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥

२७९८

सत्य असत्य दोनीं देहींच भासत । तेणेंचि नासत सर्व काम ॥१॥

एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया भावा काय सत्य तें मानावें ॥२॥

देह जातो गोष्टी असत्य न बोलूं । सर्वज्ञ विठ्ठ्लू म्हणों आम्हीं ॥३॥

सत्य असत्याची वार्ता नको देवा । एका जनार्दनीं जीवा हेंचि प्रेम ॥४॥

२७९९

असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें ॥१॥

परि संतरज वंदीन मी माथां । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥

अणुमात्र रज डोळां न साहे । कैसा खुपताहे जन दृष्टी ॥३॥

एका जनार्दनीं असत्याची वाणी । तोचि पापखाणी दुष्टबुद्धि ॥४॥

२८००

एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥१॥

एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥२॥

एक एक ग्रामी करिती भ्रमण । परि विठोबाचे प्राप्ती दुर्लभ ते ॥३॥

एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । परि विठोबाची मिळणी दुर्लभ ते ॥४॥

२८०१

नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥

काया कष्ट नको कांहीं । देश विदेशासी न जाई निवांतची ठायीं । बैसोनिया जपे ॥२॥

नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एका जनार्दनीं नाश । नको करूं शरीराचा ॥३॥

२८०२

स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥

धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥

नाम त्रिभुवनीं साजिरें । नाम पावन गोजिरें । एक जनार्दनीं निर्धारें । सांगें ब्राह्मा उभारूनी ॥३॥

२८०३

जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥

नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतुं नको ॥२॥

नको आत्मस्थिती नको ब्रह्माज्ञान । नको अष्टांग साधन नको वायां ॥३॥

नको यंत्रमंत्र नको रे कल्पना । भ्रांती भूली जाणा नको नको ॥४॥

नको तूं करूं सायास धरी पा विश्वास । एका जनार्दनीं पाहें डोळां ॥५॥

२८०४

ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥

करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥

एका जनार्दनीं तयाचें बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मा ॥३॥

२८०५

न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं ॥१॥

पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांहीं ॥२॥

सुखें वाजवा टाळी मुखीं नामघोष । पातकांचा नाश कल्पकोडी ॥३॥

एकाजनार्दनीं नाम एक समर्थ । तेणें स्वार्थ पुरे सर्व जीवां ॥४॥

२८०६

जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥

हेंचि सर्व साधनांचें सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपायीं ॥२॥

नको योगयाग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणें न धाये माप । जन्मजरा मृत्युचे ॥३॥

नको पडूं याचे भरी । वाचे म्हणे कृष्ण हरी । एका जनार्दनीं निर्धारी । निष्पाप होसी तूं ॥४॥

२८०७

नको करुं कर्माकर्म । तुम्हां सांगतों मी वर्म । श्रीरामाचें नाम । अट्टाहास्यें उच्चारा ॥१॥

तेणें तुटेल उपाधी । निरसेल भेदबुद्धी । होईल सत्वशुद्धी । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥

त्रिविधतापांचें दहन । कामक्रोधांचें नाशन । होईल प्रसन्न । चित्त रामप्रसादें ॥३॥

एका जनार्दनीं नेम । नित्य वाचे रामनाम । कैवल्याचें धाम । प्राप्त होय तत्काळ ॥४॥

२८०८

साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥

धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥

घेतां नाम धांवे विठ्ठल । नको तप नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपाळु दीनांचा ॥३॥

एका जनार्दनीं शरण । भक्तीस तुष्टें नारायन । त्यांचे करितां चिंतन । आपोआप येतसे ॥४॥

वेदोपासक - ब्राह्मण - ब्रह्मकर्म- पूजा - योग- समाधि- उपदेश.

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३