देह - अभंग २९३१ ते २९५०
२९३१
म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥
योनिद्वारें ज्याचें जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥
जंव जन्मलेंचि नाहीं । तंव तें मरण लागलें पाहीं ॥३॥
गर्भाच्याही ठायीं भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं मरण । तेथें नाहीं जनन येणें जाणें ॥५॥
२९३२
स्वप्नामाजीं बंधन । जागृति पाहतां लटिकें स्वप्न ॥१॥
ऐशी जाणा देहस्थिती । जागृति स्वप्न तें भास चित्तीं ॥२॥
जागृति धरितां भाव । स्वप्नीं दिसे तो प्रकाश ॥३॥
जागृति स्वप्न दोन्हीं पाहीं । एका जनार्दनीं पायीं ॥४॥
२९३३
स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥
तया सोडविण्या हरी । धांव घेतसे झडकरी ॥२॥
पाहे स्वप्नाचेनि कांतें । अनिरुद्धा केलेसे निरुतें ॥३॥
स्वप्नेंचि देखे सारा । एका जनार्दनीं पसारा ॥४॥
२९३४
मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥
पुढें जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥
चौर्यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥
ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥
होतां विषयीं वासना । नाठवीची एका जनार्दना ॥५॥
२९३५
आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर ॥१॥
उमजोनी उमजोनी झाकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख ॥२॥
मरणाचे हावे एकमेकां बोलती । गेला गेला म्हणती असोनी जवळी ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे ते अंध । भुलले मतिमंद भ्रांतियोगें ॥४॥
२९३६
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥
होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥
आणिलें जयाचें तें देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥
एका जनार्दनीं वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥
२९३७
धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील ॥१॥
सोडविता नाहीं नाहीं कोण्ही । पाहें विचारुनी मनामाजी ॥२॥
येती तैसे सवेंचि जाती । व्यर्थ कुंथती माझें माझें ॥३॥
एका जनार्दनीं पैलपार । तरसी निर्धार विठ्ठलनामें ॥४॥
२९३८
वायांची आयुष्य जातसे खरें । उपाय तो बरें हरी एक ॥१॥
अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवुं ॥२॥
जे जे घडी जे जे वेळीं । करा कल्लोळीं हरिकथा ॥३॥
शरण एका जनार्दनीं । भजा अनुदिनें संतासीं ॥४॥
२९३९
देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी ॥१॥
भरिला भरिला सागर भरिला । उतरीं का रे वाहिला संतसंगे ॥२॥
नामाची सांगडी बांधीत निर्धारें । तेणें पैलपार तरसी देखा ॥३॥
सांगड नामाची धरी प्रेमभावें । संता शरण जावें एकविधा ॥४॥
२९४०
नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं ॥१॥
ऐसें जें अभागी पावती पतनीं । तया सोडवणी कोण करी ॥२॥
एका जनार्दनीं मानी हा विचार । राम चराचर जप करी ॥३॥
२९४१
हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥
अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥
पूर्व सुकृताचें फळ तें पदरीं । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥
एका जनार्दनीं वाया जातो काळ । कांहीं तरी गोपाळ आठव वेगें ॥४॥
प्रपंच
२९४२
प्रपंची गुंतती । बळें माझें माझें म्हणती ॥१॥
ऐसें अभागी ते खर । नेणे विचार सारासार ॥२॥
चिखले रुतती । आणिकातें धांवा म्हणती ॥३॥
बळें कृशान पदरीं । बांधिताती दुराचारी ॥४॥
कुंथाकुंथी बळे । यम मारितसे सळें ॥५॥
शरण जनार्दना । कोण्हा नोहेचि वासना ॥६॥
जनार्दनाचा एका । बोल बोलतसे देखा ॥७॥
२९४३
प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥
गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥
टाळी लावूनियां बैसलासे बक । तैसाचि तो देख नामहीन ॥३॥
आवडीं आदरें न ये नाम मुखीं । एका जनार्दनीं सुखी केवीं होय ॥४॥
२९४४
न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची ॥१॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥
शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा । पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं भाव खरा । तया त्या पामरा सांगुनी काय ॥४॥
२९४५
भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥
भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल कां हे ॥२॥
श्वानाचियेपरी मागें पुढें पाहे । माझा म्हणोनी बाह्मा कवटाळिती ॥३॥
एका जनार्दनें अवकाळीं मेघ । तैसा प्रपंची दंभ लटिकाची ॥४॥
२९४६
प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया ॥१॥
स्त्री पुत्र धन हें केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥
पुढील विचार धरी कांहीं सोय । संतसंग लाहें अरे मुढा ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥
२९४७
बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥
प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥
तुज सुख दुःख मागील आठव । आतां भाकी कींव कांहीं रया ॥३॥
एका जनार्दनी अहा रांदलेका । भोगिसी अनेका योनी रया ॥४॥
२९४८
जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया ॥१॥
प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥
वोढाळ सांपडतां बांधिती दावणी । कोण करुणावचनीं सोडी रया ॥३॥
एका जनार्दनीं करितां प्रयाणा । नाहीं ती करुणा यमासी ॥४॥
२९४९
ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥
नाहीं तया कांहीं धाक । जन्ममरणाचा देख ॥२॥
आलिया देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥
जरा आलिया निकटी । करी प्रपंचाची राहटी ॥४॥
एका जनार्दनीं शरण । नायकती मूर्ख जन ॥५॥
२९५०
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥
दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥
एका निमाले देखतो । दुजा उडी घाली अवचितीं ॥३॥
ऐशी भुललीं बापुडीं । एका जनार्दनीं धरूनि गोडी ॥४॥