Get it on Google Play
Download on the App Store

कथेकरी - अभंग २७६१ ते २७८०

२७६१

विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥

अमृत फळें पूर्ण आलीं । कां गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥

धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारासी संतसमागम । नाठवेचि सर्वथा ॥३॥

स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एका जनार्दनीं हरी । नको संग तयाचा ॥४॥

२७६२

एक नरदेह नेणोनि वायां गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले । एक ते गिळले ज्ञान गर्वे ॥१॥

एक तें साधनीं ठकिले । एक ते करूं करुं म्हणतांचि गेले । करणें राहिलेंसे तैसें ॥२॥

यापरि अभिमान जगीं । ठकवितसे अंगसंगीं । नडी लागवेगीं जाणत्यासी ॥३॥

जें जें करी साधन । तेथें होय अभिमान । नागवी लावणें तेथें । सावधांवा करी कोण ॥४॥

ज्ञानें व्हावी ब्रह्मप्राप्ती । तें ज्ञान वेची विषयासक्तीं । भांडवल नाहीं हातीं । मा मुक्ति कैंची ॥५॥

स्वप्नींचे निजधनें जाग्रतीं नोहे धर्म । ब्रह्माहमस्मि हेंही समाधान । सोलीव भ्रम ॥६॥

अभिमानाचिया स्थिती । ब्रह्मादिकां पुनरावृत्ती । ऐसी वेदश्रुती । निश्चयो बोले ॥७॥

एका जनार्दनीं एकपण अनादी । अहं आत्मा तेथें समुळ उपाधी ॥८॥

२७६३

विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे ॥१॥

विषयतृष्णा सांडी मग तूं साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥

स्त्रीपुरुष भावना भेदु भासे मना । तेथें ब्रह्माज्ञाना गमन कैंचें ॥३॥

कणुभरित जो डोळा शरीरासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥

शुद्धभाव तें वैराग्य आवडे । अति विषय विषयाधीन ते किडे ॥५॥

एका जनार्दनीं निजज्ञानशक्ति । निर्विषय मन ते अभेद भक्ति ॥६॥

२७६४

प्रत्यक्ष देव असोनी नाहीं म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती ॥१॥

देहींच देहीं देव तो आहे । भ्रांतीचेनी लोभें नाहींसा होय ॥२॥

एका जनार्दनीं सबळ ती भ्रांती । देहीं देव असोनी वायां हुडकिती ॥३॥

२७६५

कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा ॥१॥

रामा जवळी चुकले । तप तपें भांबावले ॥२॥

तीर्थी नाहीं क्षेत्रीं नाहीं । जवळी असतां भ्रांति पाहीं ॥३॥

असतां सबाह्मभ्यंतरीं । नाहीं म्हणुनी दैन्य करी ॥४॥

तयालगीं सैरा हिंडे । तोचि तया मागें पुढें ॥५॥

एका जनार्दनीं योग । रामचि होय सर्वांग ॥६॥

२७६६

हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥

आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥

साधन तें मन करी आपुलें आधीन । यापरतें कारण आन नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं मनासी आवरी । मग तुं संसारीं धन्य होसी ॥४॥

२७६७

उलट पालट कासया खटपटी । नको तूं कपाटी रिघूं वायां ॥१॥

आसन मातृका साधन समाधी । वाउगी उपाधि तेणें होय ॥२॥

एका जनार्दनीं वाउगा सायास । नामचि सौरस पुरे काम ॥३॥

२७६८

जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥

नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥

एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । सोडविता कोणी नाहीं दुजा ॥३॥

२७६९

अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाहीं ॥१॥

जिंकितांचि मन साधनें साधती । न जिंकितां फजिती मागें पुढें ॥२॥

एका जनार्दनीं काया वाचा मन । धरुनि बंधन त्यासी करी ॥३॥

२७७०

दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥

येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥

मन चित्त अहंकार करणें या विचार । दुजेपणें पार केवीं तरे ॥३॥

एका जनार्दनीं दुजेपणा सांडी । विठ्ठलचि मांडी हृदयामाजीं ॥४॥

२७७१

एका स्तुति एका निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥

अर्धांगी लक्ष्मी काय वंदावी । चरणीची गंगा निंदावी ॥२॥

भज्य करावें भजन भजनीं । निंदा स्तुति सांडोनी दोन्हीं ॥३॥

तेची भक्ति निजस्थिती । आवड चिंत्तीं भजनाची ॥४॥

वसावें सदा चरणीं मन । एका शरण जनार्दन ॥५॥

२७७२

अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउलें कुंथती भारवाही ॥१॥

ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥

परस्परें एकएका पैं मैत्री । ऐशी चाले धात्री पंचभुतें ॥३॥

जगपटतंतु आपणचि होय । ऐसा हा निश्चय सत्ता ज्याची ॥४॥

एका जनार्दनीं सर्वसत्ताधारी । न माय चराचरी कीर्ति ज्याची ॥५॥

२७७३

लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ॥१॥

मी ब्रह्मा म्हणतां अभिमान । तेथें शुद्ध नोहे ब्रह्माज्ञान ॥२॥

जळापासुनी लवण होये । ते जळीचें जळीं विरुनी जाये ॥३॥

जैशी देखिली जळगार । शेवटीं जळचि निर्धार ॥४॥

मुक्तपणें मोला चढलें । शेवटीं सोनियांची फांसी पडीलें ॥५॥

एका जनार्दनीं शरण । बद्धमुक्ता ऐसा शीण ॥६॥

२७७४

अभिमानासाठीं । वेंचिती तपाचिया कोटी ॥१॥

अभिमान दुर्वासासी । व्यर्थ शापिला अबंऋषी ॥२॥

अभिमान ब्राह्मीयासी । नेलें गाई गोप वत्सासी ॥३॥

अभिमान नाडला पूर्ण । विश्वामित्र ऋषि जाणा ॥४॥

एका जनार्दनीं शरण । समूळ सांडावा अभिमान ॥५॥

२७७५

कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही त्याजिल्या शेखी त्यागी म्हणे निजाची ॥१॥

अभिमान कैसेनि सरे। ही कृपा कीजे माहेरें दातारा ॥२॥

देही देहातीत प्रतिपादिजे ज्ञान । तेणेंचि ज्ञान देही येतुसे अभिमान ॥३॥

जें जें होय रुतें तें अहंकारु । त्यागी भोगी होय दिंगबरु ॥४॥

ब्रह्माज्ञानें म्हणती अभिमानाची तुटी । सोऽहं सोऽहं म्हणोनी तेथेंही लागे पाठीं ॥५॥

द्वैत नाहीं जगीं मीच येकला येकु । येणें स्फुरणें आला अभिमान घातकु ॥६॥

अति सुक्ष्म अभिमान कवणा न पडे ठाईं । देहातीत ज्ञानी म्हणती जो विदेही ॥७॥

एका जनार्दनीं जगद्‌गुरु न्याहाळी । गौखुर वंदितां अभिमानाची धुळी ॥८॥

२७७६

आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥

नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥

एका जनार्दनीं एकचि स्मरा । जन्म वेरझारा खंड होती ॥३॥

२७७७

सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ ॥१॥

ज्याचीया सत्तेचा पंचभुत खेळ । विसरती गोपाळ तयालागीं ॥२॥

वल्कलें वेष्टन भस्माचें धारण । करिती धूम्रपान वाउगेंचीं ॥३॥

एका जनार्दनें हृदयस्थ असतां । कां हो शीण तत्त्वतां करिताती ॥४॥

२७७८

गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान तें जाणिवेनें खादलें ॥१॥

भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवेवरी रे ॥२॥

पंडिताचा बोध विध्वंसी वाद । तापसाचें तप निर्दाळी क्रोध ॥३॥

योगियाचा योग नाडियेला सिद्धि । अभिमान नाडी सज्ञान बुद्धी ॥४॥

कर्माकर्म नाडी वर्णाश्रम । संबंधी विषम विकल्प करी ॥५॥

एकाजनर्दनीं भगवत कृपा पुर्ण । निरभिमानें चरण धरियेलें ॥६॥

२७७९

एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम नको ॥१॥

गुदातें अंगुष्ठ लावुनी बैसणें । शरीरीं रोधणें पंचप्राण ॥२॥

नको नको व्यर्थ जीवासी यातना । रामनाम स्मरणा करी सुखें ॥३॥

एका जनार्दनीं नको यातायाती । नामस्मरणें मुक्ति सत्वर जोडे ॥४॥

२७८०

लांब लांब तुम्हीं सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठीं ॥१॥

मीपण जोंवरी गेलें नाहीं । तोंवरी तुम्हीं केलें काई ॥२॥

मीपण देहीं प्रपंच दृष्टी । कोरड्या काय सांगाल गोष्टी ॥३॥

एका जनार्दनीं बांधावें सत्य । बोलामाजीं तेणेंक दाखविलें तत्त्व ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३