Get it on Google Play
Download on the App Store

संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५

२६२६

रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी ॥१॥

वर्म न कळेची मुढां । होतो फजित रोकडा ॥२॥

जनीं नारायणा । अवघा भरला जनार्दन ॥३॥

तडातोडी करूनी वर्म । चुकला तो अधम ॥४॥

सर्वांठायीं नारायण । एका जनार्दनीं भजन ॥५॥

२६२७

त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥

घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वायां जाये ॥२॥

नारायण नामीं नाहीं पैं आचार । सर्व अनाचार स्त्रीतें लक्षी ॥३॥

एका जनार्दनीं संन्यास लक्षण । गीतेमाजीं कृष्ण बोलियेला ॥४॥

२६२८

त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ॥१॥

शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥

नित्य भिक्षा पुत्राघरीं । मठ बांधोनी राहे द्वारीं ॥३॥

एका जनार्दनीं संन्यास । वायांची नाश कायेचा ॥४॥

२६२९

डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥१॥

ऐसें नोहे निर्मळपण । शुद्ध करी कां अंतःकरण ॥२॥

राख लाउनी वरच्यावरी । इंद्रियें पीडिलीं भरोवरी ॥३॥

संध्या स्नान द्वादश टिळे । फासे घालुनी कापी गळे ॥४॥

बगळा लावूनियां टाळी । ध्यान धरुनी मत्स्य गिळी ॥५॥

पाय घालुनी आडवा । काय जपतोसी गाढवा ॥६॥

कन्येसमान घरची दासी । तिशीं व्यभिचार करिसी ॥७॥

लोकांमध्यें मिरविसी थोरी । घरची स्त्री परद्वारीं ॥८॥

श्वान आले बुद्धिपणा । चघळोनी सांडी तो वहाणा ॥९॥

एका जनार्दनीं निर्मळ भाव । तेथें द्वेषा कैंचा ठाव ॥१०॥

२६३०

दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥

घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ' नारायण ' करी पोटासाठी ॥२॥

काम क्रोध वैरी सदोदित पीडी । वरी शेंडी बोडी करुनीं काई ॥३॥

व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची मात सोंग दावी ॥४॥

एका जनार्दनीं संन्यास साचा । रामनाम वाचा उच्चार करी ॥५॥

२६३१

षडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगीं ॥१॥

आशा मनीषा यांचा तोडोनियां पाश । मग मुखें संन्यास घ्यावा आधीं ॥२॥

एका जनार्दनीं संकल्पाचा त्याग । सुखें संन्यास मग घ्यावा आधीं ॥३॥

२६३२

संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला ॥१॥

करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म स्वयें जोडे ॥२॥

नाश करावे षड्‌वैरी नेमें । तया संन्यास कर्में म्हणिजेती ॥३॥

एका जनार्दनीं गृहस्थाची बरा । फजिती बाजारा उभ्या होय ॥४॥

२६३३

नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥

अनुतापाविण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥

संन्यास घेतलिया पाठीं । काम नुपजावा पोटीं ॥३॥

ऐसे संन्यास लक्षण । एका जनार्दनीं खुण ॥४॥

२६३४

भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥

सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥

संग्रह यत्‍नाचीया चाडा । मोहोळ अवघा कडा ॥३॥

मोहोळ झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥

सर्व मायीक पदार्थ । एका जनार्दनीं परमार्थ ॥५॥

२६३५

वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥

यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥

मन दंडिजे तोचि घेई सुंदंडु । जीवनेंविण कमंडलु अखंडु ॥३॥

एकाक्षरजप करी । क्षराक्षरातीत धरणा धरी ॥४॥

स्वानंदाचें करी करपात्र । सहजीं सहज जेवीं नारायण वक्त्र ॥५॥

एका जनार्दनीं सहज संन्यासु । सहजीं सहज तेथें न लगे आयासु ॥६॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३