संसार - अभंग ३१०१ ते ३१२०
३१०१
पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥
सर्वही संबंधीं असतां जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥
पाहे पां तो बोका बैसतो टपूनी । जातो उचलोनी घेउनी अंश ॥३॥
एका जनार्दनीं किती भाकूं कींव । नायकती जीव गुंतले ते ॥४॥
३१०२
काळाचे आहारीं । पडसी शेवटीं निर्धारीं ॥१॥
ऐसें असोनि ठाउक मना । परि न स्मरे रामराणा ॥२॥
गुंतले ते मायाजाळीं । न कळे गळीं लागती ॥३॥
एका जनार्दनीं शरण । वाचे न म्हणती नारायण ॥४॥
३१०३
नेमिला काळ लागला पाठीं । हे तों दिठी पाहती ॥१॥
एकापाठीं दुसरें जाय । वायां हाय हाय उरते ॥२॥
न सोडी तो लागला मागें । शिणते वाउगे मूर्ख ते ॥३॥
शरण एका जनार्दनीं । पडती वदनीं काळाचे ॥४॥
३१०४
अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं ॥१॥
परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥
आमीष देखोनी भक्षावया जाय । परिनेणे काळ आहे म्हणोनियां ॥३॥
एका जनार्दनीं प्राणी तेक भुलले । आमिषा गुंतले मीनापरी ॥४॥
३१०५
देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले ॥१॥
नाहीं त्या यमासी करुणा कवणाची । भोगविती दुःखाची नाना योनी ॥२॥
सुकृत पदरीं मूळ नाहीं दोरा । घालितां अघोरा अंत न लगे ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं तेथें सुख । भोगविती दुःख न सांगवे ॥४॥
३१०६
आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥
चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्हीं राम कां रे म्हणाना ॥२॥
नरदेह पांचाचा आणिलासे उसना । कांहीं तरी स्वहित करा व्यर्थ कां रे वल्गना ॥३॥
राम दृढ धरशील तरी तुटेल यातना । भ्रांति माया काढी नको पडुं बंधना ॥४॥
वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा । एका जनार्दनीं म्हणे जाई साधुदर्शना ॥५॥
३१०७
जैसा गळीं लागला मासा । तैसा फांसा यमाचा ॥१॥
जाणते परी वेडे होती । फेरे घेती चौर्यांयशी ॥२॥
परि नेघे रामनाम । सदा काम विषयाचें ॥३॥
म्हणे जनार्दनीं एका । यासी सुटका कैसेनी ॥४॥
३१०८
घटिका भरतां न लगे वेळ । उभा काल वाट पाहे ॥१॥
कोणी न ये रे संगाती । वायां होतसे फजिती ॥२॥
माप भरतां नाहीं गुंती । वायां कुंथी फळ काय ॥३॥
शरण रिघा जनार्दनीं । मोक्षदानीं उदार ॥४॥
एका विनवी जनार्दनीं । अंतकाळीं नाहीं कोणी ॥५॥
३१०९
देह अवसानीं काळाची तों संधी । पोहोंचली आधीं येवोनियां ॥१॥
कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥
छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया ॥३॥
एका जनार्दनीं भुलूं नको माया । काळ तो लवलाह्मा नेईल बापा ॥४॥
३११०
आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं ॥१॥
बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावें तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हां दूर पळती ते ॥२॥
कोण्ही न होती कोणाचे । तूं म्हणसी मामे भाचे । एका जनार्दनीं साचे । कोणी नाहीं पामरा ॥३॥
३१११
काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥
अरे आलेती संसारा । कांहीं ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥
करुणा नाहीं तया यमासी । काढिती वोढिती जिवासी । भोगविती चौर्यांशी । यातना ते दुस्तर ॥३॥
म्हणोनी येतसे करुणा । शरण एका जनार्दना । वाचें रामनाम म्हणा । मग सुख पावाल ॥४॥
३११२
नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगें ॥१॥
बालत्वाचें सुख अज्ञान दशेंत । रामनाम मुखांत न ये कधीं ॥२॥
तरुण अवस्था विषयांचे ध्यान । न ये तें भजन मुखीं कदा ॥३॥
जरेनें वेष्टिलें जालें वृद्धपण । एका जनार्दन भजन नेणें ॥४॥
३११३
भोगोनी नान योनी । आलासी आतां या जनीं ॥१॥
ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥
नाहीं तरी जाशील वायां । पुनरपि यमालया ॥३॥
येतां जातां शिणतोसी । एका जनार्दनीं कां न भजसी ॥४॥
३११४
अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांहीं तरी भजन करी वाचे ॥१॥
जाणार जाणार नरदेह जाणार । न चुकेक वेरझारा जन्ममृत्यु ॥२॥
करी धंदा आठवी गोविंदा । वायां तूं आपदा नको घेऊं ॥३॥
एका जनार्दनीं पंढरी पाहून । तेथें करी मन ठेवणें देखा ॥४॥
३११५
पळ पळ आयुष्य खातसे काळ । कां रे होसी सबळक पोसणा तूं ॥१॥
वाढविसी देह काळाचें भातुकें । कां रे तुज कौतुकें सुख वाटे ॥२॥
नामस्मरण करितां लाजसी पामरा । भोगिसी अघोरा यमदंडा ॥३॥
एका जनार्दनी सांगतसे हित । कां रे न घ्या त्वरित हरिनाम ॥४॥
३११६
काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥
आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती यमदंड ॥२॥
उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढें काहीं ॥३॥
एका जनार्दनीं तूं कां रे अंधळा । देखतोसी डोळां सुख दुःख ॥४॥
३११७
आपुलिया हिता आपण जागिजे । वायां न नागविजे देही देहा ॥१॥
हाचि अनुताप घेऊनियां मना । करी पां चिंतना रामनाम ॥२॥
नाहीं कांहीं मोल सुलभ फुकाचें । घेई सदा वाचे रामनामक ॥३॥
एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलें ते हावे नायकती ॥४॥
३११८
कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटीं तो गळां । यमपाश पडतील ॥१॥
वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती ॥२॥
वाउगें जप तप कर्म । याचा न धरी संभ्रम । वाचे गाय सदा नाम । तेणें सर्व जोडतसे ॥३॥
एका जनार्दनीं नेमक । कायावाचा - मनें सप्रेम । वाचे सम्रतसे नाम । श्रीराम सर्वदा ॥४॥
३११९
अशाश्वत देह काळाचें भातुकें पंचप्राण कौतुकें खेळ तेथें ॥१॥
जीव शिव दोन्हीं मध्य बैसाकार । व्यापारी व्यापार सर्व त्याचा ॥२॥
जीव गुंतलासे विषयाचे वोढीं । शिव जाणे गौरी आत्मस्वरूप ॥३॥
ऐसा हा खेळ अनादि पसर । एका जनार्दनीं निर्धार नाम जपा ॥४॥
३१२०
देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥
आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥
सर्व जाणोनियां अंधळें पैं होती । काळ नेतांचि देखतो ते दुजा ॥३॥
परि रामनामीं न धरिती विश्वास । निकट समयास धांवाधांवी ॥४॥
एका जनार्दनीं भुलले ते प्राणी । तया सोडवाणी कोण करी ॥५॥