पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?"
पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?"
लेखक: हेमंत बेटावदकर, जळगांव
प्रकाशन: अरिहंत प्रकाशन, पुणे
परीक्षक: निमिष सोनार, पुणे
लेखक: हेमंत बेटावदकर, जळगांव
प्रकाशन: अरिहंत प्रकाशन, पुणे
परीक्षक: निमिष सोनार, पुणे
सुप्रसिद्ध लेखक "हेमंत बेटावदकर" यांचे अरिहंत प्रकाशन, पुणे ने प्रकाशित केलेले "माझं काय चुकलं?" हे दुसरे पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण झाले. त्यांच्या पहिल्या पुस्तकासारखेच ("काळ सुखाचा") हे सुद्धा त्यांच्या "सकाळ" मध्ये छापून आलेल्या लेखांचा संग्रह आहे. एक वाचक म्हणून मला या पुस्तकाबद्दल जे वाटले ते मी आपल्यापुढे मांडत आहे!
यात 45 लेख आहेत. प्रत्येक लेखात एक व्यक्ती (त्याला मी यापुढे लेखनाच्या सोयीसाठी "मनोगती" असे संबोधेन!) आपल्याशी बोलून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, जीवनाला कलाटणी देणाऱ्या काही घटना सांगून, त्या त्या घटनांत त्यांनी कसा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्यात त्यांचं "काय चुकलं?" किंबहुना "काही चुकलं का?" हा प्रश्न आपल्याला विचारतात. अर्थात त्यांना आपल्याकडून "नाही! तुमचं चुकलं नाहीच!" अशी दिलासादायक सहानुभूतीची थाप पाठीवर नक्की हवी असते, हे मात्र नक्की!
पहिल्या पुस्तकासारखेच हे सुद्धा अप्रतिम आणि वाचनीय आहे मात्र याची जातकुळी भिन्न आहे आणि हे समाजातील अनेक गंभीर विषयांना स्पर्श करते. या पुस्तकात "काळ सुखाचा" नसून "काळ वैऱ्याचा आणि संकटाचा" आहे असे दिसते!
यात 19 लेख किंवा मनोगत या स्त्रियांनी मांडले आहेत तर उर्वरित पुरुषांनी! प्रत्येक लेख एक लघुकथाच आहे पण कोणत्याही लेखात एकही संवाद नाही हा नियम लेखकाने कटाक्षाने पाळलेला दिसतोय आणि पुस्तकाच्या विषयाला धरून तेच योग्य वाटते. बहुतेक सर्वच लेख तीन ते चार पानांत आटोपतात. काही लेखांत मनोगतींच्या संपूर्ण आयुष्यात घडलेल्या घटना आहेत तर काहींमध्ये आयुष्यातील फक्त छोटे प्रसंग आहेत. यातील लेख जरी काल्पनिक आहेत तरी अशा घटना हमखास आपल्या अवतीभवती किंवा खुद्द आपल्यासोबत घडल्याचे आपल्याला नक्की प्रत्ययास येईल! यातील सगळ्याच कथा चांगल्या आहेत.
पुस्तकाचे कव्हर बघून आपल्याला ते गंभीर विषयांवर भाष्य करते याची लगेच कल्पना येते. कव्हरवरील व्यक्तीच्या चित्राकडे बघितल्यास असे लेखात येते की तो पुरुष अथवा स्त्री दोन्हीही असू शकतो आणि हीच त्या रेखाचित्र काढणाऱ्याची कमाल आहे.
विशेष म्हणजे लेखक कोणत्याच नात्याला चांगले किंवा वाईट हे लेबल लावत नाही, उलट प्रत्येक नात्यांत चांगली वाईट माणसं असतात हे प्रभावीपणे दर्शवतो. नाती वाईट नसतात तर ती नाती निभावणारी माणसे नात्यांना चांगले किंवा वाईट बनवत असतात.
आता थोडक्यात या पुस्तकातील लेखांचा माझ्या दृष्टिकोनातून उहापोह करतो. पूर्ण लेखांचे टायटल न देता मी येथे फक्त क्रमांक वापरले आहेत. पुस्तकातील अनुक्रमणिका समोर धरून तुम्ही हे परीक्षण वाचू शकता.
1, 10 आणि 36 या कथा आपल्याला मित्र आणि नातेवाईक यांच्यात केलेल्या उधारीच्या व्यवहारातील धोके दर्शवतात. उधारीचे पैसे परत मिळणार नाहीत हे ठामपणे माहिती असून मनोगती कसा पैसा उधार देत जातो आणि फसत जातो हे यातून ठळकपणे दिसते. त्यामुळे आपल्याला सांगावंसं वाटतं की, बाबा रे! पैसे बुडणार आणि ते वाईट कामासाठी वापरले जाणार माहित असूनही तू उधारी देत गेलास हे तुझं चुकलं नाही का?
3, 11, 15 आणि 38 या कथेत हेकेखोर स्त्रिया, तसेच माहेरच्या श्रीमंतीचा अहंकार असलेल्या स्त्रियांमुळे सहनशील पुरुषांची होणारी होरपळ उत्तमपणे दर्शवली आहे.
5, 25 आणि 45 या कथेत मनोगतींनी घेतलेला टोकाचा निर्णय आपल्याला धक्का देतो. त्याऐवजी वेगळा निर्णय घेता आला नसता का असे मात्र वाटत राहाते.
34 या कथेत आपल्याला वाटत राहाते की, पुत्र चांगल्या अर्थाने गुंडा व्हावा आणि त्याने तिन्ही लोकी झेंडा गाडावा. पण या कथेतला पुत्र मात्र शब्दश: गुंडा झाल्यावर बाप त्यावर काय निर्णय घेतो हे खरोखर वाचण्यासारखे आहे.
8, 30 आणि 35 या कथा मला खूप वेगळ्या आणि अतिशय भावनिक अशा वाटल्या. तुम्हालाही तशा नक्की वाटतील.
23 आणि 39 या कथा वेगळ्याच सामाजिक समस्येवर भाष्य करतात आणि त्यातल्या पात्रांनी शेवटी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनीच अनुकरण करावे हे नक्की! यात मनोगतीला सांगावेसे वाटते की तुझे काहीच चुकले नाही! तुझे शंभर टक्के बरोबर आहे!
42 ही कथा आपल्याला थ्री इडियट्स मधील "आर माधवन" ची आठवण करून देते आणि मनोगतीच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते तसेच 16 ही कथा "नटसम्राट" चित्रपटाची आठवण करून देते.
पुस्तकातील बहुतांश स्त्री मनोगतींच्या कथा या पुरुषी मानसिकतेला, पुरुषांच्या स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आणि स्त्रियांवरील अत्याचाराला ठळकपणे मांडतात व अधोरेखित करतात. मात्र 41 ही कथा वाचून स्त्रियांचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्की बदल बदलवेल आणि एक सुखद धक्का देईल! सगळ्या पुरुषांना स्त्रिया "पुरुषजात एकजात सारखीच" असं जे लेबल लावतात ते या कथेमुळे नक्की गळून पडेल, असा विश्वास वाटतो.
यातील सर्वच कथा मनाला भिडतात. लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात म्हटल्याप्रमाणे "(स्वतःचे) अंतरंग ढवळून विचार बाहेर प्रकट करणे ही काही साधी गोष्ट नाही" आणि येथे तर लेखक आपल्या प्रभावी लेखणीतून "इतरांच्या" मनाला ढवळून त्यातील विचार समर्थपणे लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे. कोणत्याही गोष्टीचा पाल्हाळ न लावता मोजक्या शब्दांत मनोगतींच्या कथा आणि व्यथा प्रभावीपणे मांडण्यात लेखक यशस्वी ठरलाय! तर मग, तुम्ही कधी वाचताय हे पुस्तक?
- निमिष सोनार, पुणे