भटकयात्रा: प्रवासवर्णन पुस्तके
मी आतापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (दक्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.
उदा: दक्षिणायन - रणजित मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),
गूढ रम्य महाराष्ट्र - मिलिंद गुणाजी,
अफलातून ऑस्ट्रेलिया - जयश्री कुलकर्णी,
पूर्व अपूर्व - द्वारकानाथ संझगिरी
वगैरे.
तसेच नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर इंडिया हे मासिक अधून मधून वाचले. मिसळपाव, मायबोली सारख्या वेबसाइट वर सुद्धा अनेक प्रवास वर्णने वाचायला मिळाली.
प्रवासवर्णनावरचे पुस्तक वाचन, मासिक वाचन आणि चॅनेल्स बघणे यात स्वत:चे वेगळे असे फायदे- तोटे आहेत, तो भाग वेगळा!
नंतर, मी प्रवास वर्णनाला-दर्शनाला वाहिलेल्या काही वाहिन्या (चॅनेल्स) शोधल्या. प्रवास आणि जगभरची प्रेक्षणीय स्थळे याला वाहिलेल्या तशा अनेक वाहिन्या दिसायला दिसतात आणि असायला आहेत. पण त्यातली एकही निखळ प्रवास वर्णन आणि दर्शन दाखवत नाही असे मला वाटते. त्यापेक्षा ८० टक्के खाद्य संस्कृती दाखवण्यात त्यांचा वेळ जातो. फोक्स ट्रॅव्हलर ने पण नांव बदलून फोक्स लाईफ केले आहे. TLC, नॅशनल जिओग्राफिक वगैरे पण काही खास प्रवास दर्शन घडवत नाहीत किंवा मला त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा तरी माहीत नसावी. कुणाला निखळ प्रवास वर्णन दाखवणारी कोणत्याही भाषेतली (इंग्रजी, मराठी, हिंदी) चॅनेल्स माहीत असल्यास येथे शेअर करावीत!
या चर्चेचा उद्देश असा की ज्यांनी प्रवास वर्णने वाचली आहेत किंवा त्या विषयाला वाहिलेली मासिके वाचतात आणि चॅनेल्स बघतात त्यांनी येथे त्याबद्दल माहिती द्यावी, थोडक्यात समीक्षण लिहावे ज्यायोगे इतर त्याचा लाभ घेऊ शकतील. आपण सगळे जग फिरू शकत नाही पण प्रवास वर्णनाद्वारे तेथे गेल्याचे काही टक्के समाधान मिळते.
प्रवास वर्णनावरची कोणती चॅनेल्स, मासिके, पुस्तके तुम्ही वाचतात/बघतात?