आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.
हे झाले अर्धसत्य!
तर यावरून मला असे लक्षात येते की आपल्याला हवे तसे आभासी चित्र इतरांसमोर निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थासाठी बोललेले अर्धसत्य हे असत्यापेक्षाही निर्दयी आणि भयंकर नुकसानकारक असते...
पण सर्वांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि सैतानी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सांगितलेले अर्धसत्य हे प्रत्यक्ष सत्यापेक्षाही श्रेष्ठ असते.
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते!!
वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो.
(सुचना: महाभारत हे आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिरियल्स मधून माझ्यासमोर आले आहे. त्या आधारे मी हे लिहितो आहे. एकाच प्रसंगाबाबतचा दृष्टीकोन अनेक पुस्तकात आणि लोककथेत आणि सिरियल्स मध्ये वेगवेगळा आढळला आहे. तेव्हा मला जे प्रसंग वाचून, ऐकून किंवा मालिकेतून पाहून माहित झाले आहेत त्याच्या आधारे मी काही प्रसंग मांडत आहे. त्याबद्दल मतभेद असू शकतात.)