लेख: प्रेरणादायी प्रकाश
सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते....
तुम्हाला मिळालेल्या यशात सगळे भागीदार होतात व श्रेय घेतात. तुमच्या अपयशाचे भागीदार कुणीच नसते. तुम्ही एकटेच तुमच्या अपयशाला जबाबदार ठरता. हीच जगाची रीत आहे आणि आपण ती रीत त्रास न करून घेता स्वीकारली पाहिजे आणि म्हणूनच यश मिळाले की त्या आनंदात सगळ्यांना सामील करून घ्या, सगळ्यांना श्रेय द्या आणि अपयश आले तर त्याचे श्रेय स्वतः कडे घेण्याचा दिलदारपणा दाखवा. आपल्याला अपयश आले असता लोक त्याचे भागीदार तर नक्की होणार नाहीतच पण काही जण तुम्ही कुठं कुठे चुकले होते हे तुम्हाला न विचारता आणि न विसरता सांगतील. त्यापैकी काहीजणांनी तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण केलेले असतील, काहीजण तुमचे हितशत्रू असतील, काहीजण तुमचे हितचिंतक, काहीजण ज्यांना तुम्ही आवडत नाही असे असतील तर काही विघ्नसंतोषी, तुमच्याशी तुलना करणारे, तुम्ही प्रगती करू नये असे मनापासून वाटणारे लोक असतील.
त्या सगळ्यांचे नम्रतेने ऐकून घ्या. त्यांना चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद द्या.
ते सगळेजण ज्या तुमच्या चुका दाखवतील त्या सगळ्या खर्या असल्या नसल्या तरी मान्य करा, त्यांचे आभार माना आणि तुमच्या अपयशाची विविध कारणे सुद्धा देत बसू नका कारण कुणी त्यावर विश्वास ठेवणार नाही कारण तुम्ही त्या वेळेस "अपयशी" आहात. अपयशी!!
मात्र पुढच्या वेळेस यशासाठी प्रयत्न करताना ते हितशत्रू आणि त्या अडथळे निर्माण करणार्या व्यक्ती ज्या तुम्हाला अपयशामुळे माहीत झाल्या आहेत त्यांना पुन्हा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू देऊ नका. त्यांचेपासून सावध राहा. त्यांना पुन्हा संधी देऊ नका. त्यांना विसरू नका. तसेच हितचिंतकांनी सांगितलेल्या तुमच्या चुका सुधारा. नाहीतर पुन्हा अपयश येईल आणि जीवनात पुन्हा पुन्हा अपयश परवडणार नाही. अपयश यशाची पहिली पायरी असली म्हणून काय झाले? त्या पहिल्या पायरीवर पुन्हा पुन्हा तुम्हाला कुणी ढकलत असेल तर तुम्ही तेथे पुन्हा पुन्हा येणार का? नक्कीच नाही!
यश मिळाल्यावर पुन्हा वरील सगळी मंडळी तुमच्याकडे येतील व तुमच्या यशाचे श्रेय घेतील. घेऊ द्या. पण यशाच्या धुंदीत हितशत्रूंना विसरू नका आणि माफ करू नका. कारण तुम्ही त्यांना माफ करून विसरून जाल व बेसावध व्हाल पण ते तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे थांबवतील याची काय खात्री देता येईल?
खरे तर हितशत्रू माहीत होण्यासाठी तुम्हाला अपयश आलेच पाहिजे असे नाही. अगदी पाहिल्याच प्रयत्नात यश आले तरी तुम्हाला तुमच्या मार्गावरचे हितशत्रू ओळखता आलेच पाहिजेत. तेवढे चाणाक्ष (चाणक्य) तुम्ही असलेच पाहिजे....
एक लक्षात ठेवा: अपयशाचा सूर्य मावळला तरी पुन्हा यशाचा सूर्योदय होणारच असतो. आशा सोडू नका. रात्री सूर्याला काही जणांच्या शिव्या मिळाल्या तरी तो खचून न जाता दिवसा पुन्हा येतोच. पण म्हणून सतत सूर्यासारखे उदय अस्त याप्रमाणे एकदा यश एकदा अपयश अशा चक्रात अडकू नका. सतत प्रकाशमान राहण्याचा प्रयत्न करा. दोन वेळा मावळा पण नंतर सतत उगवण्याची सवय लावा आणि उगवलेलेच राहण्याची सवय करा. पुन्हा पुन्हा मावळू नका. सतत प्रकाशमान राहा. तुमच्या यशाचा प्रकाश सगळ्यांना द्या. त्या प्रकाशाची प्रेरणा इतरांना देऊन त्यांनाही यशस्वी करा. त्यांनाही अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करा!