Android app on Google Play

 

सत्यातील असत्यता ६

 

संपूर्ण कथा ऐकून झाल्यावर विकीने कथेतील सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपल्या परीने शक्य तितका तपास केला. त्या तपासात त्याला असे आढळून आले की, पोलिस खात्याच्या जुन्या कागदपत्रांनुसार प्रकाश नावाचा मुलगा खरोखरच हरवला होता. या घटनेची नोंद त्यांना सापडली होती. पण त्या जुन्या कागदपत्रावरील शाई एकदमच अस्पष्ट झाल्याने, ह्या घटनेला किती वर्षे झाली असावी, हे निश्चित सांगता येणे पोलीस खात्यातील कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला शक्य वाटत नव्हते. कदाचित, या व्यक्तीचे अपहरण झाल्यामुळे त्याच्या मनावर ह्या घटनेचा फार गंभीर परिणाम झाला असावा. ज्यामुळे त्याने आपल्या खऱ्या आयुष्यातील ह्या घटनेला आपल्या कल्पनांची जोड देऊन, ही कथा रचली असावी असा विकीचा अंदाज होता. त्यामुळे विकी आणि जय हे पोलिस अधिकारी आज पुन्हा एकदा त्याची चौकशी करणार होते.

विकी: मला याची संपूर्ण कथा काल्पनिक वाटते. कारण कथा सांगताना त्याने कथेतील काही गोष्टी खूप विस्तृतपणे मांडल्या; पण त्यात बऱ्याचशा गोष्टी अशाही होत्या की, ज्या त्याने खूपच संक्षिप्तपणे सांगितल्या कारण या सर्व त्याच्याच मनाच्या गोष्टी असल्याने, त्या घटनांना तो स्वतःला हवे तसे हाताळू शकत होता. त्याचा पुरावा म्हणजे खऱ्या आयुष्यात त्याचे अपहरण झाल्यानंतर, त्यापुढील काही काळातच याची आई आणि त्यानंतर बहिण वारली. (आता तो प्रकाशकडे तोंड करून त्याच्याशी बोलू लागला.)

"अपहरणाच्या वेळी तू गुंगीच्या औषधाच्या प्रभावाखाली होतास. त्यामुळे तुझे अपहरण का झाले? आणि ते कोणी केले, या प्रश्नाचे उत्तर निश्चितच तुझ्याकडे नव्हते. म्हणून तू ही काल्पनिक कथा रचलीस."

"कथा सांगताना तू काही ठिकाणी 'मोहन' या नावाचा उल्लेख केलास तर 'मोहनराव', त्यामागचे कारण म्हणजे, हे तूच निर्माण केलेले पात्र असल्याने, तू कधी त्याच्याकडे एक पिता म्हणून बघितलेस. तर कधी तुझी कथेतील पात्र म्हणून, त्यामुळे कथा सांगताना तू या एकाच व्यक्तीचा दोन वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केलास. जी तुझ्या नकळत घडलेली सर्वात मोठी चूक होती."

जय: विकी, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे, याच्या कथेवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे हा स्वतः एक अंतर्मुख स्वभावाचा व्यक्ती असून याला बाह्य जगातील खऱ्या जीवनापेक्षा याने स्वतःच्याच मनात निर्माण केलेले काल्पनिक जगच याला अधिक जवळचे वाटत असावे. त्याचप्रमाणे याला तासंतास अशा काल्पनिक विश्वात रमण्याची इतकी सवय झाली असावी की, त्याने त्याच्या मनात निर्माण केलेल्या प्रत्येक पात्राचे जीवन तो जगू लागला म्हणून ज्यावेळी कथेतील पात्रांचा मृत्यू झाला तेव्हा तो फार कष्टदायक न होता अगदी सहजरीत्या झाला."

विकी:    अगदी बरोबर बोललास. (आता तो सुद्धा प्रकाशकडे पाहून बोलू लागला.) तू स्वतः भित्र्या स्वभावाचा व्यक्ती असल्यामुळे जेव्हा कथेत युद्ध होण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा तू चातुर्याने कथेची संपूर्ण दिशाच बदललीस. कारण जर मोठे युद्ध झाले असते तर त्यात तुला कथेतील बऱ्याचशा पात्रांचा अमानुषपणे मृत्यू घडवून आणावा लागला असता. जे तुझ्या मनाला पटणारे नव्हते.

"कथेत तु सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींमध्ये तर काहीच तथ्य नव्हते. जसे वैद्यकिय शास्त्राचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह आणि त्याचा नागांच्या अस्तित्वाशी तु जोडलेला संबंध अशा कितीतरी अर्थहिन गोष्टी सांगता येतील.''

तो कुठलाही प्रतिक्रिया न देता त्या दोघांचेही बोलणे शांतपणे ऐकत होता.

जय :    कथेत अचानकपणे मध्ये-मध्ये येऊन, अचानकच नाहीशी होणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून, ती एका अपघातात मृत्यु झालेली तुझीच पत्नी होती. जी तुझ्या मनामध्ये आठवणींच्या स्वरुपात आजही जिवंतच आहे. ही कथा तू तुझ्या मनातच रचल्यामुळे आठवणींच्या स्वरूपातील तुझी पत्नी कधीही कथेमध्ये ये-जा करू शकत होती.

विकी:     अशाप्रकारे तुझ्या कथेतील बऱ्याचशा गोष्टींचा नीट विचार केल्यावर, "तु एक मनोरुग्ण असून तुझी ही कथा खोटी आहे या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. त्यामुळे तुला यासर्व काल्पनिक जगातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर तुझ्यावर योग्य उपचार होणे मला फार गरजेचे वाटते.

विकिचे बोलणे संपताच तो मिश्किलपणे हसू लागला.

तो:   बरं, माझी कथा खोटी, माझे जग काल्पनिक. मग तुमच्या दोघांची स्वतःची काय कथा आहे? तुमच्या  जगाचे तरी खरे अस्तित्व आणि तुमच्या स्वतःचा तरी आपला असा भूतकाळ आहे का?

जय:    (काहीसा विचार करत) याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे. याचे रहस्य उलगडण्याच्या नादात ही गोष्ट माझ्यादेखील लक्षात आली नाही. ती म्हणजे...तू कोण आहेस? आणि या रहस्याचा आणि तुझा काय संबंध?

( त्याने विकीला विचारले)

विकी:     हाच प्रश्न मीदेखील विचारु शकतो. तू हे प्रकरण का हाताळत आहेस? तू या रहस्याचा उलगडा व्हावा म्हणून माझे सहाय्य का करत आहेस?

जय:    आपला उद्देश एकाच असल्यामुळे मी देखील तुझ्याकडे फारसे लक्ष न देता या गोष्टीचा विचार केला नाही.

विकी:     माझं देखील नेमक हेच झालं. पण आपण याआधी देखील बऱ्याचदा कुठे ना कुठे भेटलो आहोत...पण कुठे? हे मला आता सांगता येत नाहीये. खरं तर मी देखील संभ्रमातच आहे.

जय:     आणि मी देखील (तो गंभीरपणे म्हणाला)

तो:  (हसून) मी तुमचा संभ्रम दूर करू शकतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत.

विकी:      पण त्याआधी तुझ्या या काल्पनिक कथेतील एका रहस्याचा उलगडा होणे माझ्यासाठी फार महत्वाचे झाले आहे. तू सांगितलेल्या सर्व गोष्टी जरी सत्य मानल्या तरी पण एक प्रश्न मात्र अजूनही माझ्या मनात शिल्लक आहे. तो म्हणजे तू ज्याला नागराज म्हणून संबोधतोस त्याच्या खऱ्या मुळ नावाचा तू अद्याप उल्लेख सुद्धा केलेला नाहीस.''

हे ऐकल्यावर तो मिश्किलपणे हसू लागला. "हं...म्हणजे तुम्ही आतापर्यंतची सर्व कथा लक्ष देऊन ऐकली आहे. छान! बरे वाटले मला. चांगला प्रश्न उपस्थित केलात आपण. नागराजचे मूळ नाव इतक्या सहजतेने तुम्हाला समजले असते तर ही कथाच तुम्हांला ऐकुन घ्यावी लागली नसती.''

जय:     म्हणजे?''

विकी:       "ए, बाबा आतापर्यंत तू तुझी कथा ऐकवून आम्हांला भांबावून सोडले आहेस. तू सांगितलेल्या गुढ गोष्टींचा विचार करुन-करुन आमच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आज पहिल्यांदाच आमच्यावर आली आहे. तेव्हा आम्हांला अजुन कोड्यात पाडून आमच्या डोक्याचा ताप वाढवू नकोस. आतातरी स्पष्ट बोल काय ते?''

तो:  "नीट ऐक, सैतानाचे नाव कधीच घ्यायचे नसते. नाहीतर त्याच्या शक्ती जागृत होऊन, त्याला अधिक बळ प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या समोर त्याचे नाव उच्चारणेही तुमच्यासाठी धोक्याचे ठरेल. हा सैतान म्हणजे अशी शक्ती आहे जी सतत कार्यरत असते. जिचा पूर्णतः विनाश केवळ अशक्यच... गुप्त रुपाने आपल्या सभोवताली असणाऱ्या चांगल्या, वाईट शक्ती आपल्यावर त्यांचा प्रभाव पाडतात. त्यानुसारच माणसाचे चांगले किंवा वाईट वागणे ठरते. जो मनुष्य बऱ्याचदा चांगल्या शक्तींकडून प्रभावीत होतो. त्याला कालांतराने, चांगल्या गोष्टीची सवय होऊन, तो स्वतःही चांगल्या प्रवृत्तीचा होतो, तर जो व्यक्ती बऱ्याचदा वाईट शक्तींकडून प्रभावीत होतो त्याच्या मनात दृष्ट प्रवृत्तींची वाढ होते. ज्या शक्तींचा मनुष्याच्या मनावर जास्त परीणाम होतो, तिच शक्ती त्याच्या प्रवृत्तीच्या रुपाने त्याच्या बाह्य जीवनावर परिणाम करते. त्यामुळे पर्यायाने चांगल्या किंवा वाईट प्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी मनुष्याला स्वतःलाच स्वतःशी संघर्ष करावा लागतो.''

"म्हणून या सैतानाशी संघर्ष करताना, आपण स्वतःही सैतान होणार नाही. या गोष्टीचे सुद्धा भान असणे आवश्यक असते. माझे दुर्दैव म्हणजे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचे हे युद्ध सुरु असताना मीच कधी सैतान बनलो याचे मलाच भान राहिले नाही. होय मीच तो सैतान आहे. मीच तो नागराज. मीच प्रकाश आणि मीच विक्षर आहे. माझ्या पोटी जन्माला आलेला सैतान म्हणजे माझा पुत्र विक्षर हा त्याच्या पूर्वजन्मात दृष्ट नागराज होता. विक्षर आणि नागराज हे दोन्ही जरी एकच आत्मा असले, तरी ते एक नाहीत, कारण हे दोघे तिसऱ्याच एका मूळ रुपाची विभिन्न रूपे आहेत. त्यांचे मूळ रूप म्हणजे खरा सैतान जो मीच आहे. प्रकाश. म्हणजेच खरा सैतान एकच आहे, फक्त त्याची रूपे भिन्न आहेत. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फार किचकट आणि गुंतागुंतीच्या वाटू शकतील. पण तरीही पुन्हा एकदा माझ्या कथेचा विचार करा. त्यातील प्रत्येक टप्प्यावर मी जीवनातील गुढ रहस्यांचा खुलासा केलेला आहे. त्या रहस्यांचा तुमच्या अस्तित्वाशी संबंध आहे. शेवटी आपले जीवन म्हणजे एक युद्धच असते. स्वतःचे अस्तित्व शोधण्याचे युद्ध. बाह्य जगातील युद्धापेक्षा आपल्या मनाचे आपल्याच मनाशी असलेले हे युद्ध कैक पटींनी मोठे असते. या युद्धात जो विजयी होतो त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागतो. आपल्या अस्तित्वाचा शोध लागणे म्हणजेच स्वतःवर विजय मिळवण्यासारखे असते. त्यामुळे जो स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊन स्वतःवर विजय मिळवतो तो संपूर्ण ब्रम्हांडावरही विजय मिळवू शकतो. हे सत्य ज्यावेळी मला समजले त्याच वेळी आपल्यातल्या सैतानाचा अंत करण्यासाठी मी माझ्यातील वाईट प्रवृत्तींना माझ्यापासून वेगळे केले. दुर्दैवाने त्याचवेळी माझ्या नकळत  नागराजचा जन्म झाला."

"थोडक्यात नागराज हे माझेच दुसरे रूप आहे. बाह्य जगात जरी मी प्रकाश म्हणून वावरत असलो, तरी माझ्या मनातील जगात माझी नागराज, नागऋषी, नागतपस्वी अशी कितीतरी रूपे आहेत. नागराजने माझ्या मनात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माझ्या मनाचा ताबा घेऊन स्वतःचा वेगळाच भूतकाळ तयार करून त्याला माझ्या समोर आणले. आणि आपण तयार केलेला भूतकाळ खरं आहे हे मला सहजरीत्या पटवून देण्यासाठी त्यानेच अनंता, नागऋषी, नागतपस्वी आणि नागलोक ही सर्व माया निर्माण केली. पण ते सर्व खोटे आहे याची मला आता प्रचीती आली आहे. नागराजचे स्वतःचे असे अस्तित्वच नाही. त्याला मीच निर्माण केले आहे. मी माझी कथा सांगत असताना नागराजने बऱ्याचदा माझ्या मनाचा ताबा घेतला होता. त्याने कथेच्या मध्ये-मध्ये हस्तक्षेप करून कथेला वेगळेच वळण दिले. त्यावेळी माझे मन त्याच्या ताब्यात असल्यामुळे त्याने मीच कथा सांगत आहे भासवले. पण ते सत्य नाही. नागराजने माझ्या मनावर ताबा मिळवून त्याची कथा माझ्या मनावर कोरली आणि मीच संपूर्ण कथा सांगत आहे असे चित्र निर्माण केले. त्यामुळे कथेची दिशा वेळोवेळी बदलत गेली. आणि जोपर्यंत मी स्वतःवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणार नाही, तोपर्यंत ती अशीच बदलत जाणार. सुदैवाने मी काही काळापुरता तरी माझ्या मनावर ताबा मिळवू शकलो. म्हणूनच हे सत्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. मी निर्माण केलेले हे सर्व काल्पनिक भावविश्व माझ्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनेल अशी साधी कल्पनाही मी कधी केली नव्हती. हे सर्व मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही सुद्धा या कथेचाच एक भाग आहात. हे सत्य पचवणे तुमच्यासाठी फार अवघड असले तरी जे सत्य आहे त्याची तुम्हाला जाणीव करून देण्याची आता वेळ आली आहे."

त्याने जयकडे बघितले आणि बोलू लागला, "जय, तुला तुझे खरे नाव माहित आहे का? नाही ना! तर ऐक, तूच धनंजय आहेस. नागराजचा पुत्र धनंजय!" हे ऐकूनही जय अजूनही स्तब्धच होता. त्याला त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यानंतर त्याने विकीकडे पहिले आणि तो बोलू लागला. "विकी, तुला सर्वजण विकी म्हणून हाक मारतात. या विकी नावाची तुला इतकी सवय झाली आहे की, तू स्वतःचे मूळ नाव देखील विसरलास. माझ्या बाळा, मी तुला मारलेलं नाही. चल उठ, आता झोपेतून, तुच माझा पुत्र विक्षर आहेस." हे ऐकताच तो खाडकन जागा झाला. त्याच्या डोक्याला एक पट्टी बांधलेली होती. त्याच्या समोर एक व्यक्ती बसलेली होती. ती व्यक्ती म्हणजे प्रकाश. आता तो ज्या खोलीमध्ये होता, ही तीच खोली होती. जिथून ही कथा सुरु झाली होती. प्रकाशच्या हाताचा एक बोट अजूनही रक्ताने माखलेलाच होता.

तो:  "विक्षर, कथा सांगताना एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली होती. ती म्हणजे त्या दिवशी स्मशानामध्ये माझे आणि वेताळाचे युद्ध झाले होते. नागऋषीने वेताळाच्या मदतीने तुला वशीभूत करून तुझ्या मनामध्ये न जाणो काय काय भरले असावे? पण आता ते सर्व तू विसरून जा आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू पूर्वजन्मात माझा शत्रु नागराज होतास. मला त्रास देता यावा या हेतूने तुझ्या मृत्युनंतर तू स्वइच्छेने या पृथ्वीवर पुन्हा माझ्या मुलाच्या रुपात जन्म घेतलास. परंतु, सत्य तर हे आहे की, नागराज काय आणि विक्षर काय, तुम्ही दोन्ही माझेच अंश आहात."

"यावरून एक गोष्ट आता एकदम स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे मनातील काल्पनिक विचारांची दुनिया आपल्या खऱ्या आयुष्यावर आपली छाप सोडत असते. म्हणजेच आपण माणूस म्हणून जगत असलेले जीवनही आपल्याच मनातील जगाचे प्रतिबिंब असते. आता सत्य काय? आणि असत्य काय? याचा विचार करत बसलास तर तू संपूर्ण आयुष्यभर याच संभ्रमात अडकून राहशील. या सर्वातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या मनावर विजय मिळवणे. विक्षर हा तुझा पुनर्जन्म आहे. त्यामुळे तुला पुन्हा नागराज बनायचे आहे की, 'प्रकाश' ही निवड तुलाच करायची आहे. शेवटी तूच आमच्या दोन्ही रूपांच्या मधील एकमेव दुवा आहेस. तुझा मनातील या कथेचा तू एक अविभाज्य भाग आहेस. त्यामुळे तुला या कथेतील नायक बनायचे आहे की, खलनायक ही निवड सुद्धा तुझीच असणार आहे. लक्षात ठेव, या दोघांपैकी विजय कोणाचाही होऊ दे, पण त्याचे परिणाम तुझ्याच जीवनावर पडणार आहेत. म्हणून तुझ्या मनातील या गुंतागुंतीच्या जगातून बाहेर पडण्यासाठी मी तुला योग्य मार्ग दाखवत आहे."

विक्षर:   नाही, हे सत्य नाही. या कथेची सुरुवात तर तूच केली होतीस, पण त्यात नागराजने ढवळाढवळ करायला सुरुवात केली. खरेतर प्रकाश नागराजचे अपहरण करूच शकत नाही. कारण नागराजचा जन्म तर फार नंतर झाला; पण त्याने आपल्या जन्माचे खरे रहस्य तुझ्यापासून लपवून ठेवून तुझ्या मनाला पटेल अशी एक कथा तुझ्या मनामध्ये निर्माण केली. ज्यामुळे तू सत्यापासून दूर जाऊन अधिकच संभ्रमात पडलास. नव्हे, त्याने तुला संभ्रमात पडायला लावले. विचार कर, तुझ्या मनात नागराजच्या रूपाने जन्माला आलेला एक नकारात्मक विचार इतका शक्तिशाली होता की,, त्याचा जन्म होताच, त्याने तुझ्या मनाचा ताबा मिळवून त्यावर सत्ता गाजवण्यास सुरुवात केली. (हे कोण बोलतंय? पण...)

"हे मी बोलत नाहीये, हे सर्व खोटे आहे. त्याने पुन्हा तुझ्या मनाचा ताबा घेतला होता. तू अजूनही पूर्ण जागृत नाहीस. प्रकाश नागराज अजूनही तुझ्याच मनात जिवंत आहे. होय, तूच प्रकाश आहेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कथा तू सांगत नसून या सर्व गोष्टी मीच तुझ्या स्मृतीपटलावर कोरलेल्या आहेत.  जे तुझे भविष्य असणार आहे आणि पर्यायाने माझे सुद्धा, कारण मीच विक्षर आहे. तुझा पुत्र मनामध्ये खोट्या कल्पना निर्माण करून स्वतःची फसवणूक करणे आता तरी थांबव. ही कथा माझी नव्हती. ती तुझीच आहे, ती तुझ्यापासूनच सुरु झाली होती आणि तूच तिला संपवू शकतोस. तू तिला इतकी गुंतागुंतीची बनवलीस की, तू स्वतःच सुरु केलेल्या खेळात तू स्वतःच अडकून पडलास. ही कथा अशी घडायला नको होती. कारण काहीही असो, पण तुझ्या मनात नागराजचा जन्मच व्हायला नको. त्या सैतानाशी युद्ध करण्याची तुझी तयारी नाही. पण तरीही ही कथा तुला तुझ्या पद्धतीने पुढे घेवून जायची होती, म्हणून तूच तिला आपल्या इच्छेप्रमाणे रंगवलीस. त्यासाठी तुझ्या कथेतील एका पात्राच्या रुपात तूच त्या नागराजला जन्म दिलास आणि या काल्पनिक कथेला सत्य मानून जगू लागलास. त्यासाठी किती खटाटोप केलेस तू! त्या सर्व काल्पनिक गोष्टी स्वतःलाच पटवून देण्यासाठी तू कथेच्या सुरुवातीलाच विक्षरला म्हणजे मला मारलेस. आणि त्याला का मारले? याचे कारण शोधण्यासाठी स्वतःलाच स्वतःची कथा ऐकवून स्वतःचीच फसवणूक केलीस. त्यामुळे आता हे सर्व घडण्यापासून रोखण्यासाठी तुझ्याच विचारांप्रमाणे, आपल्याला त्यामागचे मूळ कारण नष्ट करावे लागेल. म्हणूनच हा सर्व घटनाक्रम सुरु होण्याआधीच त्यामागचे कारण नष्ट करण्यासाठी तुझे मार्गदर्शन करणे हाच माझा मूळ हेतू आहे."

"प्रकाश, आपले डोळे उघड. तू अजूनही ट्रेनमध्येच आहेस. आजच तुझे अपहरण होणार आहे. तेव्हा सावध हो. घरी जाताना चुकुनही त्या रिक्षात बसू नकोस आणि तू घरी गेल्यावरही आजची रात्र घराबाहेर पडूच नकोस. कारण एकदा का हा घटनाक्रम सुरु झाला की, त्याला रोखणे कोणालाही शक्य होणार नाही."

प्रकाश:   बरं, ठीक आहे. पण आता तू सुद्धा इथून निघून जा... विक्षर. तुला काय वाटले? असे काहीही सांगून तू मला पुन्हा संभ्रमात टाकण्यात यशस्वी होशील? आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवून हा सर्व घटनाक्रम पुन्हा नव्याने सुरु करेन? आणि मग पुन्हा एका नवीन घटनाक्रमाची नवीन कथा सुरु होऊन त्या कथेमार्फत तुझे अस्तित्व टिकून राहील? आत्तापर्यंत मी नागराज, धनंजय, नागतपस्वी, असे करता करता कथेतील सर्वच पात्रांना आपल्या मनात जागा दिली. तुम्ही सर्वांनी माझ्या मनातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपापली बाजू मांडून मलाच संभ्रमात टाकलेत. त्यासाठी तुम्ही माझ्याच मनातील कल्पनांशी आणि विचारांशी खेळू लागलात. माझ्या मनातील कल्पना सत्य भासवण्यासाठी, माणसाच्या आणि नागांसारख्या जीवांचा संबंध पटवून देण्यासाठी, उत्पत्तीची रहस्ये आणि  नागांचे अस्तित्व सत्य भासवण्यासाठी इजिप्तची सफर घडवून, प्रसंगी पुराण कथांचे दाखले देऊन तू ही कथा पुढे नेलीस. पण आता मी पुन्हा फसणार नाही. आता सत्य माझ्यासमोर अगदी स्पष्ट झाले आहे. तुम्ही सर्वजण मी माझ्याच मनात निर्माण केलेली पात्र आहात. त्यापेक्षा अधिक वेगळी  तुमची स्वतःची स्वतंत्र अशी काहीच ओळख नाही. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या मनात बराच कल्लोळ माजवलात, जेणेकरून मी तुमचा अधिकाधिक विचार करेन. ज्यामुळे तुम्हाला, माझ्या मनातील स्वतःचे अस्तित्व जास्त काळ टिकवता आले असते. आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने सर्व प्रयत्न करवून मला भांबावून सोडलेत. पण हे सर्व करत असताना तुम्ही एक गोष्ट मात्र अगदी सहज विसरलात. या कथेचा आणि पर्यायाने तुमच्यासारख्या सर्व पात्रांचा जन्मदाता आणि मृत्युदाता देखील मीच आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना संपवण्यापूर्वी या कथेतील एक रहस्य तुमच्यासमोर स्पष्ट करतो.

प्रकाश, विक्षर आणि नागराज म्हणजे देव, मनुष्य आणि सैतान यांच्या प्रवृत्तींचे प्रतीनिधित्व करणारे जीव होते. त्यातील प्रकाश हे मनुष्यापासून देवपदाला पोहोचल्याचे, विक्षर हे मनुष्यापासून सैतानाचे , तर नागराज हे फक्त सैतानाचे उदाहरण आहे. तरीही या तीन्ही प्रवृत्ती एकाच व्यक्तीमध्ये सामावलेल्या असून परिस्थितीनुसार त्या अस्तित्वात आल्या.

ज्यावेळी प्रकाशने निसर्गाविरुद्ध जाऊन आपल्या शक्तींचा वापर करुन भविष्याचे स्वरुप बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी निसर्गाने आपला मार्ग शोधून काढून प्रकाशचाच विनाश घडवून आणला. नागराज किंवा धनंजय काही करेल म्हणून त्याला रोखण्यासाठी प्रकाशने तसे घड्ण्यामागचे मूळ कारण बदलले. परीणामी ते बदलता-बदलता तो स्वतःच कधी बदलला हे त्याला देखील कळले नाही. ज्याप्रमाणे नागराज हे प्रकाशचे दुसरे रुप आहे. त्याचप्रमाणे सैतान हे देवाचे दुसरे रुप आहे. शेवटी चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रवाह अस्तित्वात आहेत म्हणुन तर ह्या सृष्टीचा ताळमेळ राखता येतो.

चांगले कर्म करुन देव व्हायचे की, वाईट कर्म करून सैतान हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वांच्याच हाती असतो. प्रकाश आपले मूळ स्वरुप समजून घेऊन आपल्यातील ईश्वराला जागृत करू शकला म्हणून तो ईश्वर स्वरुप झाला. परंतू तो परमेश्वर बनू शकत नाही. जोपर्यंत ह्या ब्रम्हांडातील सर्व जीव स्वतःचे मूळ स्वरुप समजून घेऊन स्वतः ईश्वर होत नाहीत, तोपर्यंत हा खेळ असाच सुरु राहील. त्यामुळे प्रकाश कोण? नागराज कोण आणि धनंजय व विक्षर कोण? कोण कोणाचा पिता आणि कोण कोणाचा पुत्र? यासर्व व्यर्थ चर्चा आहेत. कारण कुठल्या जन्मात आपला कोण पिता होता, आणि कोण पुत्र? कोण मित्र होता? आणि कोण शत्रु? याचा काहीच नियम नसतो. कारण आज जो आपल्यासाठी चांगला आहे तोच उद्या वाईट बनतो आणि आज जो वाईट आहे तोच उद्या चांगला बनतो. जो पर्यंत आपण ह्या सृष्टीमधील ब्रम्ह तत्व समजून न घेता भौतिक शरीराला पाहून एकमेकांना ओळखतो तोपर्यंत हा भ्रम असाच राहील. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर सर्व ब्रम्हांड उर्जेने व्यापलेले आहे. म्हणजेच आपण आणि ब्रम्हांडातील सर्वच गोष्टी एक प्रकारची उर्जाच असते. अगदी अणु-रेणूंपासून ते चंद्र- सुर्यापर्यंत सर्वत्र विविध रूपाने उर्जाच कार्यरत असते. ज्याला ही उर्जा आपल्या इच्छेप्रमाणे हाताळणे जमते, तो ईश्वर होतो. आणि जो या उर्जेचे मुळ केंद्रबिंदू आहे तो परमेश्वर. ही उर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही. फक्त तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतर करता येते. म्हणजेच आपल्यातील ह्या उर्जेचे कुठल्या प्रकारात रुपांतर करायचे हा निर्णय आपलाच असतो. ज्यावेळी उर्जारूपी परमेश्वराला साकार व्हावेसे वाटले त्याचवेळी हा विविध रूपांचा खेळ सुरु झाला. परमेश्वराने स्वतःलाच विविध रूपांमध्ये विभागून तो स्वतः मात्र या खेळापासून अलिप्त राहिला. ज्यामुळे त्याच्या प्रत्येक रुपाला मीच श्रेष्ठ असे वाटू लागले.

हेच रहस्य समजून घेण्यासाठी मी देखील माझ्या मनात अशा प्रकारचा एक खेळ सुरु केला. हा खेळ होता स्वतःच स्वतःला शोधण्याचा, स्वतःचे मूळ रूप जाणून घेण्याचा हा खेळ खेळताना मी माझ्याच मनातील विचारांपासून इतका अलिप्त राहिलो की, माझ्या विचारांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जाणवू लागले.

तुमच्यासमोर मी उत्पत्तीची रहस्ये उलगडली तरी देखील तुम्ही मी कोण? आणि तू कोण? याच वादात अडकून पडलात. त्यावेळी मी सांगितल्याप्रमाणे ब्रम्हाने या सृष्टीमधील जीवांची उत्पत्ती करण्याकरिता आपल्या मनापासून 'प्रजापती दक्ष' यांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या मनात तुम्हा सर्वांची निर्मिती करून स्वतः मात्र ह्या सर्व मायेपासून अलिप्तच राहिलो. त्यामुळे तुमच्या अज्ञानाने, तुम्ही सर्वजण माझ्या मनाशी खेळत आहात असे तुम्हाला वाटले. परंतु कधी कधी सत्य देखील अविश्वसनीय आणि आपल्याला न पटणारे असते. आपल्या सर्वांचे जीवन देखील एक खेळच असतो. आपल्याला नेहमीच वाटते की, आपण तो खेळ खेळत आहोत. परंतु खेळ खेळणारा हा भलताच कोणीतरी असतो. जो ह्या खेळाचा खरा सूत्रधार असतो आणि आपण त्याच्या हातातील बाहुल्या... आपण सर्व त्याचे खेळणे असतो. पण हे रहस्य तर नेहमीच दुर्लक्षित राहते. म्हणून ज्याला-त्याला तो स्वतः सर्वोच्च अधिकारी असण्याच्या भ्रमात राहण्याची सवय लागलेली असते. म्हणून तो या मायाजालात दिवसेंदिवस अधिकच अडकत जातो. परंतु ज्या क्षणी आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत होऊन सत्याचा बोध होतो. त्याचक्षणी आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊन स्वतःची खरी ओळख पटते आणि त्याचक्षणी आपल्याला आपल्यातील ईश्वरतत्वाची प्राप्ती होते.

ही कथा गुंफताना मी स्वतः भावनेच्या भरात वाहून संभ्रमात पडू नये, यासाठी कथेच्या सुरुवातीलाच मी स्वतःसाठी पुरावा म्हणून एक खुण मागे ठेवली होती. जी मला भावनांच्या भरात वाहून जाण्यापासून रोखून मला सत्य परिस्थितीची जाणीव करून देईल. ती खुण म्हणजे कथेच्या सुरुवातीलाच विक्षरला मारल्यावर त्याच्या सांडलेल्या रक्तात मी 'प्रत्यूषस्वामी' असे लिहून ठेवले होते. हा प्रत्यूषस्वामी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझे अंतर्मन आहे. ज्याने मी ही कथा गुंफत असताना सुद्धा मला वेळोवेळी योग्य मार्ग दाखवून भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे माझी कथा अपहरणापासून सुरु झाली नसून ती 'विक्षर'च्या मृत्युपासून सुरु झाली होती, हे आता माझ्या ध्यानात आले आहे.

त्याच्या मुखातून असे उदगार निघताच क्षणार्धात कथा जेथून सुरु झाली होती, त्याच टप्प्यावर प्रकाशचे मन केंद्रित झाले. रक्तात पडलेला विक्षर तेथुन नाहींसा झाला आणि ते पोलिसही. आता त्या खोलीमध्ये फक्त प्रकाशच होता. खुर्चीवर मागे झोकून दिलेली मान सरळ झाली. प्रकाशचे डोळे उघडले गेले. त्याच्या डोळ्यासमोर सर्वत्र अंधार पसरलेला होता. म्हणून त्याने लगेचच खिडकी उघडली तशी सूर्याची किरणे खोलीच्या आत शिरली. त्याच्या डोक्यावरील नागमणी ती किरणे परावर्तीत करू लागला. क्षणार्धात सर्वत्र प्रकाश पसरला.
 

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य
मनोगत
पार्श्वभूमी
अपहरण १
अपहरण २
अपहरण ३
अपहरण ४
अपहरण ५
अपहरण ६
अपहरण ७
अपहरण ८
खरी ओळख १
खरी ओळख २
खरी ओळख ३
शोध सुरु आहे... १
शोध सुरु आहे... २
स्वप्न की सत्य? १
स्वप्न की सत्य? २
अपहरणाचे रहस्य १
अपहरणाचे रहस्य २
अपहरणाचे रहस्य ३
अपहरणाचे रहस्य ४
नागांची रहस्ये १
नागांची रहस्ये २
नागांची रहस्ये ३
युद्धाची तयारी १
युद्धाची तयारी २
युद्धाची तयारी ३
युद्धाची तयारी ४
युद्धाची तयारी ५
युद्धाची तयारी ६
युद्धाची तयारी ७
युद्धाची तयारी ८
मोहनचे रहस्य
हिमालयात आगमन...१
हिमालयात आगमन...२
प्रकाशची गोष्ट १
प्रकाशची गोष्ट २
प्रकाशची गोष्ट ३
संकटाची चाहूल १
संकटाची चाहूल २
संकटाची चाहूल ३
संकटाची चाहूल ४
संकटाची चाहूल ५
भविष्य धोक्यात आहे! १
भविष्य धोक्यात आहे! २
भविष्य धोक्यात आहे! ३
भविष्य धोक्यात आहे! ४
उत्पत्तीची रहस्ये
"स्वरुप बदलते!"
पुनर्जन्म १
पुनर्जन्म २
पुनर्जन्म ३
विकासाची रहस्ये १
विकासाची रहस्ये २
विकासाची रहस्ये ३
भूतकाळातील घटनाक्रम १
भूतकाळातील घटनाक्रम २
तिच्या स्मृती १
तिच्या स्मृती २
तिच्या स्मृती ३
तिच्या स्मृती ४
तिच्या स्मृती ५
सत्यातील असत्यता १
सत्यातील असत्यता २
सत्यातील असत्यता ३
सत्यातील असत्यता ४
सत्यातील असत्यता ५
सत्यातील असत्यता ६