Android app on Google Play

 

अपहरण ८

 

प्रकाश सापडल्याचे पोलिसांनी वसंतरावांच्या घरी फोन करून कळविले होते. त्यावेळी पोलिसांचा फोन आल्यावर संदीपने तो उचलला होता. प्रकाश सापडल्याचे कळताच संदीपही ताबडतोब पोलिसांनी त्याला सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. ज्यावेळी संदीप त्या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी पोलिस प्रकाशशी घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करत होते. ते प्रकाशला प्रश्न विचारत होते. आणि प्रकाशही त्यांच्या प्रश्नांची निमुटपणे उत्तरे देत होता.

प्रकाशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी प्रकाशला त्याच्या मित्राने इमारतीखालून आवाज देऊन त्याला खाली बोलावले होते. त्यावेळी त्याच्या घरातील सर्व मंडळी आतल्या खोलीत जेवायला बसली होती. प्रकाशचेही ताट वाढून झाले होते. पण इमारतीखाली त्याचा मित्र आल्याने तो त्याला भेटण्याच्या उद्देशाने लगेचच इमारतीखाली आला. ज्यावेळी तो इमारतीखाली पोहोचला, त्यावेळी त्याचा मित्र त्याला त्यांच्या इमारतीच्या समोरील रस्त्यावर उभा असलेला दिसला. प्रकाशने त्याला हाक मारली. पण त्याच्या मित्राने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही. त्यामुळे प्रकाशच त्याच्या दिशेने चालू लागला. प्रकाश त्याच्या दिशेने येत आहे; हे बघून त्याचा मित्र त्याच्यापासून दूर पळू लागला. प्रकाशला त्याच्या मित्राचे असे विचित्र वागण्याचे कारण लक्षात येत नव्हते. कारण याच्या आधी त्याचा तो मित्र त्याच्याशी इतक्या विचित्रपणे कधीच वागला नव्हता. त्यामुळे त्याचा मित्र त्याला बघून का पळत आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रकाशही त्याच्या मागे धावू लागला. धावता-धावता त्याचा मित्र एका गल्लीत शिरला. पण गल्लीत त्याचा मित्र त्याला कुठेच दिसत नव्हता. तो अचानकपणे एकाएकी तिथून दिसेनासा झाला होता. बऱ्याच वेळेपासून प्रकाश त्याच्या मित्राला शोधत होता. पण तो त्याला अद्याप सापडला नव्हता. म्हणून अस्वस्थ होऊन प्रकाश पुन्हा आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. तितक्यात एक तीस-पस्तीस वयाचा, एक माणूस त्याच्या जवळ आला. त्याच्या हातात कसलातरी कागद होता. तो कागद त्याने प्रकाशला दाखवला आणि त्यावर लिहिलेला पत्ता तो प्रकाशला विचारू लागला. प्रकाशने तो कागद हातात घेलता आणि त्यावरील पत्ता तो वाचू लागला. तेवढ्यात त्या व्यक्तीने प्रकाशच्या नाकासमोर एक रुमाल धरला. काही कळण्याच्या आतच प्रकाश बेशुद्ध झाला. प्रकाशला फक्त इतकेच आठवत होते.

ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी तो एका रुग्णालयामध्ये होता. प्रकाश शुद्धीवर आल्याचे कळताच तिथल्या नर्सने ह्या गोष्टीची सूचना बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना दिली. जसे पोलिस त्याच्यासमोर आले तसा तो बिथरला. पोलिसांना आधीच प्रकाशची ओळख पटली होती. तरी त्यांनी पुन्हा प्रकाशशी विचारपूस करून, तशी खात्री करून घेतली आणि मग ते त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले.

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे एक पन्नास पंचावन्न वयाची व्यक्ती प्रकाशला रुग्णालयात घेऊन आली होती. त्यावेळेस तो बेशुद्ध होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे प्रकाश त्याला तिथल्याच एका रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. म्हणून त्याने जवळच्या दुकानदाराकडे त्याची चौकशी केली. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, तो सकाळपासूनच त्या ठिकाणी पडून होता. ‘एखादा बेवडा दारू पिऊन पडला असेल’ या विचाराने कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. पण या अज्ञात व्यक्तीने मात्र त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर फार मोठे उपकार केले होते. प्रकाशशी कुठल्याही प्रकारची ओळख नसताना, त्याने मोठ्या मानाने प्रकाशची मदत करून जगात आजही माणुसकी शिल्लक आहे हे दाखवून दिले होते.

प्रकाश परत येऊन दोन दिवस होऊन गेले होते. दोन दिवसांत कित्येक लोकं त्याला भेटण्यासाठी आले होते. तर कित्येकांनी फोनवर त्याच्याबरोबर घडलेल्या प्रकारची चौकशी केली होती. कित्येकांनी तो सुखरूप परतल्याचे बघून समाधान व्यक्त केले. मोहनरावही प्रकाश सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला भेटण्यासाठी आले होते. तो सुखरूप असल्याचे बघून त्यांना फार आनंद झाला होता. परंतु त्यांना समोर पाहताच प्रकाश मात्र भरपूर संतापला होता. त्याचा संताप इतका वाढला होता की, त्याचे संपूर्ण शरीर अग्नीप्रमाणे तप्त व्हावे असे वाटत होते. त्याची संतप्त नजर त्याच्या चेहऱ्यावरील संताप स्पष्ट करत होती. वसंतला त्याच्या रागाचे कारण अद्याप समजू शकले नव्हते. मोहनरावसुद्धा अजूनही शांतच होते. त्यांनी प्रकाशला काही विचारण्याआधीच “आज कशी काय आठवण झाली तुम्हाला माझी?” असा सवाल प्रकाशने त्यांना केला. तो प्रश्न कानी पडताच मोहनचा चेहरा काळवंडला. वसंतरावही आपल्याला काहीच माहिती नसल्याचा पवित्रा घेत, आपल्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव प्रकट करत ते प्रकाशला समजवण्याच्या प्रयत्नात होते. तेवढ्यातच प्रकाशने त्यांना शांत राहण्यास सांगितले. “खासदार साहेब, मला तुमच्याकडून स्पष्टीकरण हवे आहे. हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल, नाही का?” एवढे बोलून प्रकाशची नजर मोहनवर स्थिर झाली होती. “बाळ, प्रत्येक वेळी जे दिसते ते सत्य नसते.” मोहनराव म्हणाले, “हेच तर म्हणायचे आहे मला, आजवर तुम्ही सर्वांनी मला अंधारात ठेवले होते. पण आता माझ्या अपहरणामुळे अशी बरीचशी सत्ये माझ्यासमोर आली आहेत. म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं; आज माझ्या बाबतीतही नेमकं तेच खरं ठरलं. माझ्या अपहरणामुळे मला आता खऱ्या अर्थाने माझी खरी ओळख पटली आहे.” वसंत आणि मोहन, दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. प्रकाशचे अपहरण झाल्याचे त्याने दोन दिवसांनंतर आज पहिल्यांदाच सांगितले होते. त्यामुळे खरे सत्य काय आहे, हे प्रकाशशिवाय दुसरे कुणालाही माहित नव्हते.

“माझे अपहरण कोणी केले होते हे तुम्हाला माहित असेलच?” मोहनकडे बघून तो पुटपुटला. वसंत आता थोडा भयभीत झाल्यासारखा दिसत होता. प्रकाशशी काहीही बोलण्याची त्याच्यात हिम्मत उरली नव्हती. तो शांतपणे उभा होता.

“म्हणजे तुझ्या जन्माचे रहस्य तुला आता कळले आहे तर?” मोहनने प्रश्न केला.

“होय. पण मला तुमच्याकडून सर्व ऐकायचे आहे.” प्रकाश उद्गारला.

प्रकाशचे अपहरण कोणी आणी कशासाठी केले? हे जरी वसंतला माहित नसले, तरी प्रकाश हा मोहनचा मुलगा आहे आणि प्रकाशच्या लहानपणीच त्याने त्याला वसंतला दत्तक म्हणून दिले होते. हे सत्य आजवर प्रकाशपासून लपवून ठेवले होते, त्यामुळे तो आता शांत बसला होता.

“ठीक आहे.” मोहन बोलू लागला. आणि एक-एक करत त्याने प्रकाशला, त्याच्या जन्माचे सर्व रहस्य सांगून टाकले. त्याचे काका आणि काकी घराबाहेर कुठेतरी गेल्यामुळे त्यावेळी तिथे फक्त प्रकाश, मोहन आणि वसंत होते. मोहनने प्रकाशला जे काही सांगितले, त्याचा त्यावर लगेच विश्वास बसला आणि त्याचा रागही शांत झाला होता. मोहनने प्रकाशला त्याच्या जन्माची रहस्ये सांगण्यास सुरुवात करण्याच्या आधी त्याने वसंतकडे पहिले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची नजर वसंतवर पडताच तो एकदम स्तंभित झाला. ‘पाणी गोठून त्याचा बर्फ व्हावा!’ त्याप्रमाणे तो एकाच जागी स्थिर झाला. मोहनने प्रकाशला “त्याची काळजी करू नको म्हणून सांगितले. आणि त्यानंतरच तो त्याच्याशी बोलू लागला होता.

“प्रकाश, काही दिवसातचं मी तुला एका व्यक्तीची भेट करून देईन, मला माहिती आहे, अजूनही तुझ्या मनात बरेच प्रश्न शिल्लक असतील, ज्याची उत्तरे तुला अद्याप मिळाली नसतील. त्या प्रश्नांची उत्तरे फक्त तीच व्यक्ती देऊ शकते. ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आणि तुझे आजोबा.” एवढे बोलून त्याने आपले बोलणे थांबवले आणि पुन्हा एकदा वसंतकडे पहिले. तसा वसंत पुन्हा एकदा सामान्य  अवस्थेत येऊन, त्याच्या शरीराची हालचाल करू लागला. काही क्षणापूर्वी त्याच्याबरोबर काय झाले होते, हे त्याला आता आठवत नव्हते. त्याचप्रमाणे मोहनने प्रकाशला त्याच्या जन्माची काही गुप्त अशी रहस्ये सांगितली आहेत; याची त्याला जराही जाणीव झालेली नव्हती.
 

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य
मनोगत
पार्श्वभूमी
अपहरण १
अपहरण २
अपहरण ३
अपहरण ४
अपहरण ५
अपहरण ६
अपहरण ७
अपहरण ८
खरी ओळख १
खरी ओळख २
खरी ओळख ३
शोध सुरु आहे... १
शोध सुरु आहे... २
स्वप्न की सत्य? १
स्वप्न की सत्य? २
अपहरणाचे रहस्य १
अपहरणाचे रहस्य २
अपहरणाचे रहस्य ३
अपहरणाचे रहस्य ४
नागांची रहस्ये १
नागांची रहस्ये २
नागांची रहस्ये ३
युद्धाची तयारी १
युद्धाची तयारी २
युद्धाची तयारी ३
युद्धाची तयारी ४
युद्धाची तयारी ५
युद्धाची तयारी ६
युद्धाची तयारी ७
युद्धाची तयारी ८
मोहनचे रहस्य
हिमालयात आगमन...१
हिमालयात आगमन...२
प्रकाशची गोष्ट १
प्रकाशची गोष्ट २
प्रकाशची गोष्ट ३
संकटाची चाहूल १
संकटाची चाहूल २
संकटाची चाहूल ३
संकटाची चाहूल ४
संकटाची चाहूल ५
भविष्य धोक्यात आहे! १
भविष्य धोक्यात आहे! २
भविष्य धोक्यात आहे! ३
भविष्य धोक्यात आहे! ४
उत्पत्तीची रहस्ये
"स्वरुप बदलते!"
पुनर्जन्म १
पुनर्जन्म २
पुनर्जन्म ३
विकासाची रहस्ये १
विकासाची रहस्ये २
विकासाची रहस्ये ३
भूतकाळातील घटनाक्रम १
भूतकाळातील घटनाक्रम २
तिच्या स्मृती १
तिच्या स्मृती २
तिच्या स्मृती ३
तिच्या स्मृती ४
तिच्या स्मृती ५
सत्यातील असत्यता १
सत्यातील असत्यता २
सत्यातील असत्यता ३
सत्यातील असत्यता ४
सत्यातील असत्यता ५
सत्यातील असत्यता ६