Get it on Google Play
Download on the App Store

संकटाची चाहूल ३

त्या दिवशी धनंजयने एका मोठ्या सभेचे आयोजन केले होते. त्याच्या बाजुने असलेल्या सर्व नागांची त्या सभेमध्ये उपस्थिती होती. त्यात मोठ- मोठ्या पराक्रमी नाग योद्ध्यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर इतर सामान्य नागप्रजाही त्या सभेसाठी तिथे उपस्थित होती. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आले होते. धनंजयला खात्री होती की या सभेसाठी हजारोंच्या संख्येने नाग उपस्थित राहतील. त्यासाठी त्याने आपल्या विश्वासातील नागांमार्फत या सभेची वार्ता गुप्तपणे नागलोकात सर्वत्र पसरवली होती. सभा मंडपाच्या मध्यभागी मोठ्या मंचाची उभारणी करण्यात आलेली होती. जिथे धनंजयसहित इतर प्रमुख नाग आपापल्या आसनावर बसले होते. सभेसाठी जमलेले इतर नाग मंचावरील दृष्ये सहजरित्या पाहू शकतील अशा ठिकाणी तो मंच उभारण्यात आला होता.

धनंजय आणि मंचावर उपस्थित असलेल्या नागांची बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरु होती. तितक्यात नागराणीचे तीथे आगमन झाले. नागराणी येताच मंचावरील सर्व नाग शांत झाले.

"आम्ही सर्वजण तुमचीच वाट पाहत होतो." धनंजय म्हणाला. त्यानंतर धनंजयने तिला इशाऱ्याने आपल्या आसनावर स्थानापन्न होण्यास सांगितले. त्यानंतर धनंजय त्या मंचाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. त्याला पाहताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या, नागांची कुजबुज थोडीशी कमी झाली. त्याने सर्वांना शांत बसण्याची विनंती केली आणि मग तो, त्या मंचावरून बोलू लागला.

"माझ्या समस्त नाग बांधवानो, आपण आज इथे हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून माझ्यावर खुप मोठे उपकार केलेले आहेत. ज्याची परत फेड, मी तुम्हाला लवकरच करेन. आपण आज इथे आलात, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही दाखवलेल्या, माझ्यावरच्या ह्या विश्वासासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहणार आहे. तुम्हाला इथे बोलावण्यामागे एक फार महत्वाचे कारण आहे....." आतापर्यंत सर्वत्र शांतता पसरली होती. आता सर्वांचे लक्ष धनंजयच्या बोलण्यावर केंद्रित झाले होते.

"मी ज्येष्ठ, नागराज पुत्र धनंजय, आज अशी घोषणा करतो की, आजपासून तुम्हाला अनंताच्या नियंत्रणात राहण्याची आणि त्याने बनवलेले कायदे पाळण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण लवकरच मी अनंताचे राज्य संपवणार आहे. त्यानंतर तुमच्यापैकी कुणालाही कधीच श्रम करण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण यानंतर तुमच्या सेवेसाठी मी मनुष्यांना पाचारण करणार आहे. ज्यावेळी मी तुमचा राजा होईन, त्याचवेळी मी आपल्या प्रचंड सैन्यासोबत पृथ्वीवर पदार्पण करणार आहे. त्यानंतर मनुष्याशी युद्ध करुन, मी त्याला आपला गुलाम करणार आहे. मी ऐकले आहे की, अनंताचा नातु एक अर्धनागमनुष्य असून त्याच्याकडे अलौकिक नागशक्ती आहेत. ज्यांच्या बळावर, तो तुच्छ मनुष्य नागलोकी आक्रमण करेल, आणि नागलोकात अराजकता पसरवेल; ह्याच भीतीपोटी आपले अनेक नागबंधू त्या अनंताची साथ देत आहेत. पण माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा अनंता  संपला की, ते सुद्धा आपल्या बाजुने लढण्यास तयार होतील. त्यांना आपल्या बाजुने लढण्यास कसे प्रवृत्त करायचे हे मी चांगलेच जाणतो."

"तुम्ही सगळे माझे सहकारी आहात, माझे बंधू आहात. त्यामुळे जे नाग माझ्या बरोबर, पृथ्वीवर येण्यास तयार होतील आणि युद्धात सहभागी होतील, त्यांना शंभर मनुष्य त्याच्या सेवेसाठी दिले जातील. मी ऐकले आहे की, पृथ्वीवरील मनुष्याची संख्या खुप वाढली आहे म्हणून..... मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरील इतर सजीवांचा हवा तसा वापर करुन घेत आहे. संपूर्ण पृथ्वीवर त्याचीच सत्ता असल्यासारखे त्याला वाटू लागले आहे. पण तो एक गोष्ट विसरला आहे की, हजारो वर्षापूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी पृथ्वीवरची आपली सत्ता सोडली तेव्हाच तो, आता पृथ्वीवर राज्य करु लागला आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजांनी पृथ्वी तर सोडली, पण आपली एक प्रजाती त्यांनी पृथ्वीवरच मागे सोडली होती. माझ्या माहितीनुसार, ते नाग आता विविध प्रजातींमध्ये विकसित झालेले आहेत. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरील जंगले नष्ट करु लागला आहे. त्यामुळे त्यांचे आणि पृथ्वीवरील इतर सजीवांचे, तेथील जगणे पापी मनुष्याने मुश्कील करून ठेवले आहे. मला माहिती आहे की, ते मनुष्याशी लढू शकत नाहीत. कारण मनुष्याच्या सानिध्यात राहून, ते आपला मूळ स्वभावच विसरले आहेत. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी आपण पृथ्वीवर प्रस्थान करु, त्यावेळी मनुष्याशी होणाऱ्या युद्धामध्ये पृथ्वीवरील ते नाग सुद्धा आपल्याला साथ देतील. आणि मग पुन्हा एकदा पृथ्वीवर आपल्या नागप्रजातींची सत्ता असेल."

धनंजयचे शब्द तिक्ष्ण बाणाप्रमाणे नागांच्या मन-मस्तिष्कात शिरुन, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य करत होते. त्याच्या भाषणामुळे त्यांना स्फुरण चढू लागले. तो जे काही बोलत होता, ते त्यांना पटू लागले होते. तिथे उपस्थित असलेल्या नागांनी धनंजयला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने, त्याला आता अधिकच चेव चढला.

"माझ्या बांधवांनो, मी नागराज झाल्यावर पृथ्वी आणि नागलोकातील लाखो वर्षापासून गुप्त असलेला मार्ग सर्वांसाठी कायमचा खुला करणार आहे. आजवरच्या सर्व राजांनी, पृथ्वीवर जाण्यासाठी प्रवेशद्वार असलेला गुप्तमार्ग कसा खुलतो, हे तुमच्यापासून सदैव लपवून ठेवले होते. ते रहस्य सुद्धा मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. नागांचे पृथ्वीवर पूर्वीसारखेच राज्य असावे आणि तिथला मनुष्य आपला गुलाम असावा, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. पण त्या दृष्ट नागतपस्वींनी त्यांना सदैव आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवून, मनुष्याचे पृथ्वीवरील स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्या नागतपस्वींनी नागप्रजातींच्या हिताचा विचार कधीच केला नाही. याउलट त्यांनी गुप्तपणे पृथ्वीवर जाऊन अनंताच्या ‘नागमनुष्य’ नातवाच्या नागशक्ती जागृत केल्या. त्यांचा मित्र असलेल्या अनंताने माझ्या वडिलांची हत्या केली. आणि तो स्वतः नागराज झाला. खरेतर हे फार मोठे षडयंत्र होते. जे तुम्हाला अद्याप कळू शकले नाही. अनंताला नागप्रजातीच्या हिताची काहीही पर्वा नाही, त्याला पर्वा आहे ती फक्त त्याच्या अर्धमनुष्य नातवाची आणि मनुष्य प्रजातीची. इतकी वर्षे पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत केल्याने, त्याची मती भ्रष्ट झाली आहे."

"हजारो वर्षापूर्वी, मनुष्याने आपले पृथ्वीवरील साम्राज्य संपुष्टात आणले. पण खरेतर पृथ्वीवर आपली सत्ता असणे, हा आपला अधिकारच आहे. मनुष्य आपल्यासमोर एक तुच्छ जीव आहे. जो पूर्वी आपल्या पूर्वजांचा गुलाम होता. मनुष्याच्या बाबतीमधील आणखीन एक फार महत्वाची गोष्ट आजवर तुमच्या पासून लपवून ठेवली गेली होती, ती गोष्ट तुम्ही ऐकल्यावर, तुमचा तुमच्या कानावरही विश्वास राहणार नाही." इतके बोलून तो काही क्षण नागांची उत्सुकता ताणण्यासाठी थांबला आणि पुन्हा बोलू लागला. "खरेतर मनुष्य या जीवाची उत्पत्ती आपल्या कल्याणासाठीच झाली होती. मनुष्य शरीर त्यातील कितीतरी गोष्टींमुळे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मनुष्याचे रक्त हेच आपल्या पूर्वजांचे प्रमुख अन्न होते. कालांतराने आपल्या प्रजातीची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी आपल्या पूर्वजांची मूळ नाग संस्कृती आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. मी ऐकले आहे की, आपले पूर्वज लाखो वर्षापर्यंत स्वास्थपूर्ण जीवन जगू शकत होते. पण आपले सध्याचे आयुर्मान फक्त जवळपास दहा हजार वर्षाचेच झाले आहे आणि या पुढील काळात ते असेच कमी-कमी होत जाणार आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे......... अमृताचा अभाव. मानवी रक्त आपल्या नागप्रजातीसाठी अमृताप्रमाणे कार्य करते. ते आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी हृदय. आपले पूर्वज सदैव निरोगी जीवन जगत होते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, ते मनुष्याच्या हृदयापासून विविध प्रकारची स्वादिष्ट व्यंजने तयार करत असून त्यांचे सेवन करीत होते."

"आपल्या पूर्वजांचे राहणीमान अत्यंत साधे होते. ते आपल्याप्रमाणे महालामध्ये राहत नव्हते. पृथ्वीवर असताना गुहेमध्ये, जंगलामध्ये वास्तव्य करणारे, आपले पूर्वज मानवी हाडांपासून बनवलेली भांडी वापरत होते. त्याचप्रमाणे मानवी हस्ती आणि दंतापासून बनवलेल्या अलंकाराचा वापर ते आपले शरीर सौंदर्य खुलवण्यासाठी करत होते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, मानवी हस्तींपासून बनवलेले अलंकार नागांच्या शरीराचे तापमान संतुलित करण्यात, महत्वाची भुमिका बजावतात. आपले पूर्वज मानवी केसांपासून बनवलेल्या मुलायम चटयांचा वापर करीत होते. अशा आरामदायक चटयांचा वापर झोपण्यासाठी केल्याने शांत निद्रेचा ते सदैव अनुभव घेत होते."

"या सर्व गोष्टी आजवर तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या होत्या. आपण जर मानवी शरीराचा उपयोग आपले जीवन सुखकारक करण्यासाठी आणि आपले आयुर्मान वाढवण्यासाठी करू लागलो, तर आपल्यातील नागशक्ती झपाट्याने विकसीत होतील, आणि मग आपणही आपल्या पूर्वजांप्रमाणे दिर्घ आयुष्य व्यतीत करु शकू."

"मनुष्य, हा जरी आपल्या तुलनेत तुच्छ असला, तरी तो आपल्यापेक्षा थोडा अधिक बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याने हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना फसवून, त्यांना पृथ्वीवरुन हाकलून दिले. त्यांना भिती दाखवून आणि मोहात पाडून, नागलोकात राहण्यासाठी भाग पाडले."

"त्यानंतर अनंतासारख्या नागांनी मनुष्याच्या संरक्षणासाठी कायदे केले. मनुष्य हत्या करणे पाप आहे, असे विचार सर्वत्र पसरवले गेले आणि मग नागलोकात वास्तव्य करणे नागांसाठी कसे योग्य आहे? हे नागांच्या मनावर बिंबवले गेले. त्याचाच परिणामस्वरूप आज आपल्याला मनुष्य शरीर दुर्लभ झाले आहे. त्यामुळेच आपले आयुर्मान घटू लागले, याचाच अर्थ धुर्त मनुष्याच्या नादाला लागून अनंतासारख्या नागांनी, मनुष्य प्रजातीच्या हितासाठी आपल्यावर अन्याय केला. जो मला मान्य नाही."

"आता यापेक्षा अधिक काही बोलण्याची माझी इच्छा नाही. तर मग.........बोला! नागप्रजातीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कोण-कोण माझ्याबरोबर युद्धात सहभागी होण्यास तयार आहे?" धनंजयच्या प्रश्नाबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या सर्व नागांनी जोरात ओरडून त्याला आपली सहमती दर्शवली आणि त्याबरोबरच धनंजयच्या नावाचा जयजयकार सुरु केला.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६