Get it on Google Play
Download on the App Store

उत्पत्तीची रहस्ये

"आता मी तुम्हांला जे काही सांगणार आहे. कदाचित त्याने तुम्हांला मोठा धक्काच बसेल. पण मी तेच सांगेन, जे सत्य आहे. मनुष्याशी शत्रुत्व न करण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे....मनुष्य हा आपलाच भाऊ आहे.'' हे ऐकल्यावर सर्व नागांना आश्चर्याचा एक झटकाच बसला. आतापर्यंत धनंजयने आणि त्यानंतर ह्या नवीन अनोळखी नागाने मनुष्याबद्दल जे काही सांगितले होते, ते सर्व नागलोकातील नागांसाठी रहस्यमय असल्याने कशावर विश्वास ठेवावा? आणि कशावर ठेवू नये? हेच अनेकांना कळत नव्हते. पण ह्या सर्व रहस्यमयी गोष्टी ऐकल्यामुळे तिथे जमलेल्या नागांच्या, पृथ्वीलोकातील मनुष्याबाबतच्या ज्ञानात भर मात्र नक्कीच पडत होती.''

"होय, हेच सत्य आहे. पूर्वकाळात परमपिता ब्रम्हाने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर, ब्रम्हाचे मानसपुत्र प्रजापती दक्ष यांच्या तेरा कन्यांचा विवाह ऋषी कश्यप यांच्याशी झाला. जे मारिची मुनींचे पुत्र आणि ब्रम्ह देवाचे पौत्र होते. ते थोर विद्वान असल्याने ते सप्तऋषींचेही प्रमुख होते. ज्यांचे आपण सर्व वंशज आहोत. त्यांच्या आदिती नामक पत्नीपासून देवतांची, दिती पासून दैत्यांची, दनू पासून दानवांची, कद्रु पासून नागांची, अरीष्ठा पासून गंधर्वाची, सुरसापासून राक्षसांची, सुरभिपासून गायी, म्हैशींची, विनितापासून गरुडांची, ताम्रापासून गिधाडांची, क्रोधवशापासून विंचू सारख्या विषारी जीवांची, इडा पासून वृक्ष-वेलींची, काष्टा पासून अश्वांची आणि मुनी पासून अप्सरांची उत्पत्ती झाली. त्यानंतर मनुष्याची उत्पत्ती करण्याकरिता ब्रम्हाने स्वतःच्या शरीराचे दोन भागात विभाजन केले. त्यातुन पुरुष आणि प्रकृतीची निर्मिती झाली. तो आद्य पुरुष 'मनु' होता तर प्रकृती ही 'शतरूपा' होती. मनुच्या नावावरुन त्याच्यापासून निर्मित प्रजातीला 'मानव' हे नाव दिले गेले. ह्या सृष्टीतील प्रत्येक जीवाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रम्हाने ज्या जीवांची निर्मिती केली त्यांना ऋषीमुनी म्हटले गेले. म्हणजेच आपण सर्व जीव ऋषी पुत्र असून, आपण सर्वच ब्रम्हाचे वंशज आहोत, आपल्या पित्यांचा पिता एकच असूनही मातृसत्ताक पद्धतीच्या प्रभावामुळे, आपण एकमेकांपासून परिचित नव्हतो.

या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपण मनुष्याचे उदाहरण पाहू. मनुष्याचा विचार केला, तर पूर्व काळात कुटुंबव्यवस्था आणि विवाह संस्था अस्तित्वात नव्हती. त्यावेळी मनुष्यामध्ये माता-पिता, भाऊ-बहिण अशा कुठल्याही प्रकारची नाती अस्तित्वात नव्हती. त्यावेळी मनुष्यांमध्ये फक्त स्त्री आणि पुरूष असे दोनच भेद होते. त्याकाळी आतासारखी समाजव्यवस्था अस्तित्वात नसल्याने, कुठलाही स्त्री-पुरूष कोणत्याही आणि कितीही स्त्री-पुरुषांबरोबर यौन संबंध प्रस्थापित करू शकत होता. स्त्री-पुरुषांमध्ये विशिष्ट जोड्यांचे बंधन नसल्याने त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या अपत्याचा पिता कोण? हे निश्चित सांगता येत नव्हते. परंतू त्यांची माता कोण? हे निश्चित असल्याने, त्याकाळी मातेच्या नावाने वंश चालत असे. कालांतराने विवाह संस्था अस्तित्वात आल्याने, कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली.  त्यानंतरच्या काळात, माता-पिता, बंधू-भगिनी, मामा-मामी अशाप्रकारच्या कित्येक नात्यांचे नामकरण झाले. त्यामुळे मनुष्य प्रजातीमधील स्वच्छंद यौन संबंधावर मर्यादा आली''

"त्यानंतरच्या काळात मानवी समाजात, पितृसत्ता अस्तित्वात आली. त्यामुळे त्यानंतरच्या पुढील काळात गोत्र व्यवस्था निर्माण झाली. समान गोत्र असणाऱ्या स्त्री-पुरुषाच्या विवाहावर बंधने आली. कालांतराने मनुष्याच्या कर्मानुसार त्याची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशा वर्णात विभागणी झाली. ज्याला जे कार्य करणे जमते, तीच त्याची जात झाली. म्हणजेच तोच त्याचा वर्ण झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील सदस्यांचे त्यांच्या कर्मानुसार विभाजन झाले. एका कुटुंबातील स्त्री-पुरुष दुसऱ्या कुटुंबातील स्त्री-पुरुषाशी विवाह करू लागले.त्याकाळी विभिन्न वर्णाचे मनुष्य भिन्न गोत्र बघून एकमेकांशी विवाह करत होते. परंतू समान गोत्र असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा विवाह होत नसे. त्याकाळात देवतांनी मनुष्याच्या विविध कुळांचा उद्धार केल्याने, विविध कुळातील मनुष्य विविध देवतांना आपले कुळ दैवत मानू लागली होती. चार वर्णामध्ये विभाजन झालेला मनुष्य पुढे जाती आणि उपजातींमध्ये विभागला गेला. तरी समान कुळ दैवतामुळे (म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपल्या कुळामुळे) एकत्र येऊ लागला. तरीही कर्मावर आधारीत असलेली वर्णनव्यवस्था मनुष्याच्या आपापसातील वैमनस्याचे कारण बनली. दुर्दैवाने त्याकाळी आपणही मनुष्याच्या संगतीत राहून, मनुष्याची हिच संस्कृती आत्मसात केली. त्यामुळेच आज मनुष्याप्रमाणे नागांमध्ये असमानता दिसत आहे."

"स्वतःला सर्व जीवांपेक्षा बुद्धीमान समजणारा मनुष्य, जर कर्मावर आधारीत आणि श्रमविभाजनाचे माध्यम असलेल्या वर्णनव्यवस्थेला (जातींना) समजून घेण्यास असमर्थ ठरत असेल, तर आपल्या सारख्या नागांचे त्याबाबतीत अज्ञानी असणे साहजिकच शक्य आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या मुळ पूर्वजांनी आपल्या विभिन्न शरीरक्षमतेमुळे आणि विभिन्न प्रवृत्तींमुळे एकमेकांपासून वेगळे राहणे पसंत केले. त्यामुळेच आपल्यासारख्या जीवांचे मनुष्य, नाग, गरुड, राक्षस इ. अशाप्रकारे विभिन्न प्रजातींमध्ये विभाजन झाले. कालांतराने आपण सर्व जीव वेगवेगळे राहून, फक्त आपल्याच प्रजातीचा विचार करू लागलो. त्यामुळे विभिन्न प्रजातींमधील एकमेकांतील मतभेद वाढून,त्यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ लागली. काळाच्या प्रभावाने आपणही सर्व एकाच पुर्वजापासून निर्माण झालेले विविध जीव आहोत. हेच आपण विसरुन गेलो. त्यानंतरचे आपले पूर्वज एकमेकातील शत्रुत्वामुळे युद्धे करु लागली. युद्धात विजयी झालेली प्रजाती, इतर प्रजातींना आपला गुलाम बनवून त्यांच्यावर अत्याचार करू लागली. आपण नागांनीही हेच केले. म्हणुनच आपल्या अत्याचारांना कंटाळलेल्या मनुष्याने नागांमधील सत्तेची लालसा असणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा फायदा घेऊन, आपल्या पूर्वजांना नागलोकी पाठवले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यावेळी जे काही केले ते योग्यच होते. त्यात त्यांचे काही चुकले असावे, असे मला वाटत नाही. सत्तेच्या आणि सुखाच्या उपभोगासाठी आपण विभिन्न जीव असलो,तरी एकाच पुर्वजापासून निर्माण झालेली भावंडे आहोत; हे आपण सोयीस्करपणे विसरून गेलो. याची मला खंत वाटत आहे. ज्या चुका आपल्या पूर्वजांनी केल्या, त्याच चुका आपण आपल्या शुल्लक स्वार्थासाठी करू नये अशी माझी इच्छा आहे. मनुष्य रक्तामुळे किंवा त्याच्या शरीरातील इतर अवयवांमुळे आपला काही फायदा होईल हे आज ठामपणे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा जीव घेऊन त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे कधीही योग्य ठरणार नाही. मनुष्य काय?... आणि इतर जीव काय? आपण सर्व एकाच पूर्वजांची अपत्ये आहोत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची हिंसा सोडून आपापसातील बंधू-भावाचा विकास केला पाहिजे. आणि प्रत्येक जीवाला, त्याच्या लोकात सुखी राहता येईल, असे वागले पाहिजे. मला खात्री आहे, सत्य समजल्यामुळे तुमच्यापैकी कोणीही नाग आता पृथ्वीवर जाऊन विनाकारण मनुष्याशी युद्ध करणार नाही.''

इतके बोलून तो नाग शांत झाला. त्याच्या शांततेबरोबरच सर्वत्र शांततेची लाट पसरली. कोणीही कोणाशीच काहीच बोलत नव्हते. सर्वजण विचारमग्न झाले होते. तो नाग मंचावरून सर्वांना पाहत होता, अधून-मधून त्याची नजर स्तब्ध झालेल्या नागांवरून फिरत होती. सर्वांना आपल्या उत्पत्तीची रहस्ये समजल्याने आजवर त्यांनी, त्यांच्या जीवनाबद्दल जे काही विचार केले होते, ज्या कल्पना केल्या होत्या त्या सर्व एका क्षणात खोट्या ठरल्या होत्या. त्या नागाने आता, सर्व नागांना एक प्रश्न केला. "तर मग बोला, कोण? कोण? सहमत आहे माझ्या विचारांशी? त्याप्रश्नावर बहुसंख्य नागांनी होकारार्थी उत्तर देऊन आपली सहमती दर्शवली. नागांच्या आवाजामुळे धनंजय आपल्या विचार प्रक्रियेतून बाहेर आला होता. आता त्याच्या मुखावर कसलेतरी समाधान दिसत होते. त्याने त्या तरुण नागाकडे भावविवश होऊन पहिले आणि आपोआपच त्याच्या डोळ्यात अश्रु जमा होऊ  लागले. न राहवून त्याने, त्या नागाला मिठी मारली आणि काही क्षण तो त्याच्या कानात काहितरी कुजबुजला. त्यानंतर धनंजयने आपला पृथ्वीप्रस्थानाचा निर्णय चुकीचा असल्याचे,घोषित केले. आणि त्या रहस्यमयी नागाचा सर्वांसमक्ष यथोच्छित सत्कार करुन, आपल्या सभेची समाप्ती केली.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६