सत्यातील असत्यता ३
विक्षरला शाळेतून घरी आणल्यावर, प्रकाशने विक्षरसोबत त्याच्या काकांच्या घरी त्यांना पाहण्याकरिता जाण्याची तयारी सुरु केली. विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त झालेल्या संदीपची शेवटची भेट घेऊन प्रकश आपल्या घरी परतला. परंतु संदीपच्या घरी गेल्यावर प्रकाशने एका गोष्टीची आवर्जून दक्षता घेतली होती. ती म्हणजे त्याने त्यावेळी, संदीप, शैला आणि त्यांच्या मुलांना संमोहित करून तो स्वतःही सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे थोडासा वयोवृद्ध झाल्यासे भासवले. प्रत्यक्षपणे संदीपची भेट घेण्याकरिता त्याला असे करणे भागच होते. कारण काळाच्या परीणामाप्रमाणे संदीपची मुलेही प्रकाशपेक्षा वयाने मोठी दिसू लागली होती. परंतु प्रकाशवर काळाचा परिणाम अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे तो त्याच्या खऱ्या रुपात त्यांच्यासमोर जाऊच शकत नव्हता. प्रकाशने त्यांना संमोहित केल्यामुळे प्रकाश त्यांना जवळपास पन्नाशी ओलांडलेल्या माणसासारखा दिसत होता. त्याने विक्षरला संमोहित न केल्यामुळे त्याला मात्र तो नेहमीप्रमाणे तीस-पस्तीस वयाचाच दिसत होता. परंतु संदीपच्या घरी संदीपच्या, शैलाच्या आणि प्रकाशच्या चाललेल्या गप्पांवरून विक्षरला प्रकाशच्या आणि त्याच्या काकांच्या आणि त्यांच्या मुलांच्याही वयातील फरक लक्षात आला. ज्यावेळी प्रकाश वीस-बावीस वर्षांचा होता, तेव्हा संदीप आणि शैलाला एकही अपत्य नव्हते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांना मुले होऊनही ती सुद्धा प्रकाशपेक्षा वयाने खूपच मोठे दिसत होती. ही गोष्ट विक्षरला विचार करायला प्रवृत्त करणारी होती. त्यामुळे त्याला आपला पिता खरोखरच अद्भूत शक्ती सामर्थ्य असलेला इच्छाधारी नाग असावा या गोष्टीची खात्री पटत चालली होती.