Get it on Google Play
Download on the App Store

हिमालयात आगमन...१

मोहन आणि प्रकाश हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचले होते. तिथले वातावरण प्रचंड थंड असल्याने तिथल्या माणसांनी उबदार वस्त्रे परिधान केली होती. परंतु प्रकाश आणि मोहनवर तिथल्या वातावरणाचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता.

बऱ्याच वेळेपासून मोहन एकाच ठिकाणी थांबून कोणाची तरी वाट बघत  ताटकळत उभा होता. थोड्या वेळाने एक तरुण मोहनला शोधत त्या ठिकाणी येऊन पोहोचला. तो जवळपास प्रकाशच्याच वयाचा असेल, असे त्याला पाहताच लक्षात येत होते. त्याला लांबूनच येताना पाहून मोहनच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला होता. याचाच अर्थ त्यांची प्रतीक्षा आता संपली होती. हे आतापर्यंत प्रकाशच्या लक्षात आले होते. मोहनला बघताचक्षणी तो तरुणही खुश झाला होता. तो मोहनच्या जवळ येताच, दोघांनीही एकमेकांना गाढ अलिंगन  दिले. त्यामागचे कारणही तसेच होते. ते दोघेही एकमेकांना जवळपास पन्नास वर्षांनंतर भेटत होते.

मोहनने त्या तरुणाला प्रकाशची ओळख करून दिली. जेव्हा प्रकाशकडे त्याची नजर गेली तेव्हा थोडासा भय-भित दिसू लागला. काही क्षण प्रकाशकडे एक टक बघून झाल्यावर, त्याने मोहनकडे बघून आपली मान होकारार्थी डोलावली. बहुदा मोहनने मनोमन त्याच्याशी काही संवाद साधला असावा. तसे त्या तरुणाने आपली मान खाली झुकवून, प्रकाशच्या प्रती आपला आदरभाव दर्शवला. त्यानंतर ते लगेचच पर्वताच्या दिशेने अग्रेसर झाले.

काही तासांच्या पायी प्रवासानंतर तिघांनी आपले इच्छित अंतर गाठले. त्यानंतर तो तरुण एका गुहेत शिरला. त्याच्या पाठोपाठच मोहन आणि प्रकाशही गुहेच्या आत शिरले. ती भरपूर अंधारमय गुहा होती. कोणी आपल्याला बघत तर नाही ना? याची खात्री करून त्या तरुणाने आपले डोळे मिटले आणि तोंडातल्या तोंडात तो काहीतरी पुटपुटू लागला. तसे अचानकच तिथे भरपूर तेज निर्माण झाले. एका दिव्य प्रकाशाने त्या तिघांनाही व्यापून टाकले आणि क्षणार्धातच ते तिघेही त्या गुहेच्या पलीकडे असणाऱ्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले. त्या तरुणाने मंत्र पुटपुटताच निर्माण झालेला तो दिव्य प्रकाश म्हणजेच एका जगातून दुसऱ्या अद्भूत अशा विश्वात नेणारे गुप्त द्वार असल्याचे प्रकाशच्या लक्षात आले होते. तरीही त्याच्या चेहऱ्यावर आता थोडेसे आश्चर्याचे भाव दिसू लागले होते. हिमालयातील त्या गुप्त रहस्यमयी विश्वात त्याचा पहिल्यांदाच प्रवेश होत होता.

त्या ठिकाणी डोळे दिपवून टाकणारा प्रकाश सर्वत्र पसरला होता. इतका उजेड प्रकाशने आजवर कधीही अनुभवला नव्हता. म्हणून त्याने आकाशात पहिले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला आकाशात कुठेही सूर्य दिसत नव्हता आणि त्यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी त्या तिघांचा त्या अद्भूत ठिकाणी प्रवेश झाला, त्याच वेळी मोहनचे शरीर हळू-हळू बदलू लागले. पूर्वी एखाद्या मध्यमवयीन प्रौढ मनुष्यासारखा दिसणारा मोहन आता पंधरा-वीस वर्षांचा तरुण असल्यासारखा दिसू लागला होता. पण खरेतर तेच त्याचे खरे वय होते. त्या ठिकाणी पृथ्वीच्या सर्व मर्यादा संपल्यामुळे, मोहनने पृथ्वीवर सामान्य मनुष्याप्रमाणे जगण्यासाठी धारण केलेले शरीर बदलून तो त्याच्या खऱ्या रुपात आला होता. प्रकाशच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून मोहन त्याच्याशी बोलू लागला. "मला माहिती आहे की, तू माझाच विचार करत आहेस. इथे येताच माझे रुपांतर एका तरुणामध्ये कसे काय झाले? याचेच तुला आश्चर्य वाटत आहे ना? पूर्वी ज्यावेळी मला माझ्या गुरूंनी ह्या ठिकाणावरून पृथ्वीवर परतण्याचा आदेश दिला होता, त्याच वेळी माझी खरी ओळख गुप्त राहावी म्हणून त्यांनी माझ्या शरीरातील दिव्य नागशक्तींना पृथ्वीलोकासाठी निष्क्रिय केले. म्हणजेच त्यांनी माझ्या शक्तींना बंदिस्त करून ठेवले होते. त्यामुळे पृथ्वीवरील काळाचा परिणाम माझ्यावर होऊ लागला आणि माझे वयसुद्धा एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणेच वेगाने वाढू लागले. परंतु सत्यस्थितीत मी सुद्धा एक नागच असल्याने मला सुद्धा हजारो वर्षांचे आयुष्य लाभले आहे. त्यामुळे इथे परतल्यावर मी पुन्हा माझ्या खऱ्या रुपात येऊ शकलो. जेव्हा मी हे ठिकाण सोडले होते, त्यावेळी मी दहा वर्षांचा होतो. मी पृथ्वीवर व्यतीत केलेली पन्नास वर्षे म्हणजे इथली जवळपास पाच वर्षे असतात. त्यामुळे इथे परतताच क्षणी माझे वय पुन्हा जवळपास पंधरा वर्षे झाले आहे. जे माझे खरे वय आहे. तू इथे आजवर कधीही आला नाहीस म्हणून तुझ्या बाबतीत असे घडले नाही. त्याचप्रमाणे आजवर तुझ्या शरीरातील नागशक्ती जागृत नव्हत्या. म्हणून तुझे वयसुद्धा सामान्य मनुष्याप्रमाणेच वेगाने वाढत गेले. पण तरीही तुझे वय जरी वाढत गेले तरीही तुझे शरीर मात्र तुझ्यातील नागशक्तींमुळे अत्यंत संथ गतीने वाढत आहे. ही गोष्ट आतापर्यंत तुझ्याही लक्षात आलीच असेल." मोहनने अशा प्रकारे सर्व गोष्टी स्पष्ट केल्याने आता सर्व गोष्टी प्रकाशच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या मनातील प्रश्न संपले होते.

त्या गुप्त ठिकाणी प्रकाशने आजवर कधीही न पाहिलेले अनेक चित्रविचित्र जीव त्याच्या नजरेस पडत होते. ज्यावेळी ते तिथे पोहोचले त्यावेळी ते सर्व जीव समूहाने एकत्र बसून त्यांच्यासमोर बसलेल्या एका वृद्ध मनुष्याचे बोलणे ऐकत होते. बहुदा तो मनुष्य त्यांना कसलेतरी ज्ञान देत असावा. पण तो मनुष्य त्यांच्याशी नेमका कोणत्या भाषेत बोलत होता, हे मात्र प्रकाशला काहीच समजत नव्हते. ज्या वेळी त्या वृद्ध मनुष्याची नजर त्यांच्याकडे गेली, त्यावेळी त्याने मोहनला त्याच्या जवळ येण्याची सूचना केली. ती सूचना एक सांकेतिक भाषेतील असून ती मोहनला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या तरुणालाही बरोबर कळली होती.

मोहन आणि प्रकाश त्या वृद्ध मनुष्याच्या दिशेने पावले टाकत चालू लागले. तसे करत असताना तिथे उपस्थित असलेले जीव त्या दोघांकडे पाहत होते. चालता-चालता मोहन त्यांच्याकडे बघून मंद स्मितहास्य करत होता. त्यामुळे तिथे उपस्थित जिवांपैकी बरेचसे जीव मोहनला आधीपासूनच ओळखत असल्याचे प्रकाशच्या लक्षात आले. जेव्हा ते दोघे त्या वृद्धाच्या जवळ पोहोचले, तसे त्याने आपले बोलणे थांबवले आणि तो आपल्या जागेवर उठून उभा राहिला. मोहनला पाहताच तो आनंदित झाला होता. पण जेव्हा त्याची नजर प्रकाशकडे गेली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलल्याचे त्या पितापुत्रांच्या लक्षात आले. मोहनने त्या वृद्धाच्या पायावर आपले मस्तक ठेवून त्याला नमस्कार केला. मोहन काही बोलण्याचा आतच तो वृद्ध त्या दोघांना उद्देशून बोलू लागला. "मला माहित होते की, हा क्षण येणार आहे. पण... (त्याची नजर प्रकाशकडे होती.) त्याने आपले बोलणे अचानक थांबवले.

तो वृद्ध प्रकाशच्या जवळ आला, त्याने प्रकाशच्या डोक्यावर हात ठेवून, प्रकाशचा नागमणी आपल्या हाताने चाचपून पाहिला आणि पुन्हा बोलू लागला. "तुला माहिती आहे का? तू कोण आहेस? आणि तुझ्या जीवनाचे ध्येय काय आहे?" त्यावर प्रकाशने 'हो' म्हणून उत्तर दिले. आत्तापर्यंत प्रकाशला त्यांचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता पण आता तो त्यांच्या अगदीच जवळ असल्याने तो त्यांना निरखून पाहू लागला. त्यांना पाहून त्याचे मन थोडे विचलित झाले होते. "ह्या आधी सुद्धा मी यांना अनेकदा पाहिले आहे. पण कुठे?" असा विचार तो आपल्या मनात करू लागला. तितक्यातच त्या वृद्धाने त्याच्या मनातील प्रश्न ओळखून त्याला उत्तर दिले. "कुठे म्हणजे काय? आपण कित्येकदा तुझ्या स्वप्नात भेटलो होतो." त्यांनी अचानक दिलेले उत्तर ऐकून प्रकाश आता अधिकच विचलित झाल्यासारखा दिसू लागला. आता तो वृद्ध प्रकाशशी आणखी काही बोलणार इतक्यात मोहनने प्रकाशला त्याची ओळख करून दिली.

"प्रकाश, हे 'प्रत्यूष स्वामी' इथल्या सर्व  गुरुंचेही गुरु. ज्यांनी त्रैलोक्यातील विविध प्रजातींच्या जीवांना इथे आश्रय दिला आहे. हे संपूर्ण स्थान त्यांच्याच नियंत्रणात असून, त्यांच्या इच्छेशिवाय इथे एक पानही हलू शकत नाही. पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळातील जीवांनी आपापल्या लोकातच शांतीपूर्ण पद्धतीने वास्तव्य करावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील, स्वर्ग किंवा पाताळ लोकातील जीवांचे, गुप्तपणे असणारे वास्तव्य सुद्धा इथूनच, प्रत्यूष स्वामीद्वारेच नियंत्रित केले जाते. थोडक्यात प्रत्यूष स्वामींच्या नियंत्रणात असलेला हा गुप्त लोक स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांच्यातील दुवा आहे." इतके बोलून मोहनने आपले बोलणे थांबवले. मोहनचे बोलणे ऐकून प्रकाशला धक्काच बसला होता. तिन्ही लोकांमधील दुवा म्हणून ओळखला जाणाऱ्या त्या गुप्त लोकाचा स्वामी एक मनुष्य असावा, अशी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. 'त्यामुळे ह्या गुप्त लोकांत अजूनही बरीचशी रहस्ये दडलेली असतील.' असा विचार तो करू लागला. तितक्यात प्रत्यूष स्वामी बोलू लागले.

"प्रकाश, तुझा जन्म एका विशिष्ट उद्धेशासाठी झाला आहे. तुला मनुष्य आणि नाग प्रजातीच्या हितासाठी कार्य करावे लागणार आहे. भविष्यात अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे ह्या दोन्ही प्रजाती एकमेकांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आपापसात युद्धे करतील. परंतु तुला ते टाळायचे आहे. मला माहिती आहे, अनंता नागलोकी गेला आहे. त्यामुळे त्याचे तिथून पृथ्वीवर सुखरूप परतणे फारच अवघड कार्य आहे. त्याचे आता पृथ्वीवर परतणे आपण दैवावर सोडू. सुदैवाने जर तो नागराजला संपवण्यात यशस्वी झाला. तर नागलोकी अधिकच अराजकता वाढेल. त्यामुळे नागलोकातील नागांना नियंत्रित करण्यासाठी तिथे योग्य राजाची आवश्यकता भासेल. परंतु जर असे झाले नाही, तर मात्र राजाच्या अभावी, तिथल्या नागांवर कोणत्याही प्रकारचे बंधन राहणार नाही. आणि मग कदाचित ते पृथ्वीवरही येऊ लागतील. त्यामुळे पृथ्वीवरील मनुष्याचे जीवन धोक्यात येईल. प्रकाश... तू पूर्णपणे ना मनुष्य आहेस, ना नाग, त्यामुळे भविष्यात तुलाच ह्या दोन्ही प्रजातींमधील मतभेद मिटवून त्यांचे एकमेकांपासून संरक्षण करायचे आहे. त्यामुळे कधी तुला मनुष्याचे तर कधी नागाचे नेतृत्व करावे लागणार आहे. प्रत्येक जीवाला आपल्या लोकात स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी तुला नीच प्रवृतींचा अंत करावाच लागेल. पृथ्वी असो किंवा पाताळ, सर्व जीवांचे वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे टिकविण्यासाठी प्रत्येक जीव प्रयत्नशील असतो. पण इथे प्रश्न कुठल्याही जीवाचा किंवा त्याच्या प्रजातीचा नसून तो त्यांच्या प्रवृतींचा आहे. युद्ध कधीही दोन समूहाचे, जातींचे किंवा जीवांचे नसते, तर ते दोन प्रवृतींमध्ये होत असते. त्यामुळे तुला नि:पक्षपाताने चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करण्यासाठी वाईट प्रवृत्तींचे विनाश करणे हेच आता तुझ्या जीवनाचे ध्येय असणार आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम तुला तुझ्या नागशक्तींना नियंत्रित करता येणे आवश्यक आहे. त्याचे प्रशिक्षण तुला इथे मिळणार आहे. म्हणूनच मी मोहनला गुप्त संदेशाद्वारे तुला इथे घेऊन येण्यास सांगितले होते."

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६