Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्जन्म २

आतापर्यंत आपले नेत्र बंद करुन साधनेत मग्न असलेल्या त्या व्यक्तीने, वेताळाचा स्मशानात प्रवेश होताच आपले नेत्र उघडले. कदाचित त्याला वेताळाच्या आगमनाची चाहुल लागली असावी. त्यावरुन ही व्यक्ती एक सिद्ध तांत्रिक असावी. असा प्रकाशचा अंदाज होता. वेताळ त्याच्या जवळ जाताच तो वेताळासमोर नतमस्तक झाला. वेताळाने त्याला वर बघण्यास सांगितले. म्हणून आता तो तांत्रिक उघड्या नेत्रांनी वेताळाकडे आणि त्याच्या अवती-भोवती असलेल्या सर्व शक्तींकडे जरासुद्धा भयभित न होता एक-एक करत दृष्टीक्षेप टाकू लागला. त्यानंतर तांत्रिकाने वेताळाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याजवळील मिठाई व फळे अर्पण केली.

त्याने तसे करताच वेताळ त्याच्याशी बोलू लागला. "मला प्रसन्न करण्यासाठी तु कित्येक दिवस, सातत्त्याने चालणारी ही महाकठीण साधना केलेली आहेस. तुझ्या सामर्थ्याची परिक्षा घेण्यासाठी मी बऱ्याचदा तुझ्या साधनेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला पण तु त्या सर्व अडचणींवर मात करुन शेवटी आजच्या अमावास्येच्या रात्री तुझी साधना यशस्वीपणे पूर्ण केलीस. फार मोठ्या तपानंतर मला प्रसन्न करणारा, तु एक अत्यंत सामर्थ्यवान मनुष्य आहेस. अर्थातच त्यामागे तुझ्या पुर्वजन्माची महत्वाची भुमिका आहे. बोल काय इच्छा आहे तुझी? मी तुझ्या साधनेवर अत्यंत प्रसन्न आहे.''

"तु माझ्या आज्ञेप्रमाणे माझे सर्व आदेश मान्य करुन, मला माझे इच्छित कार्य पुर्ण करण्यासाठी सहाय्य करावेस अशी माझी इच्छा आहे.'' तो तांत्रिक लगेचच उदगारला.

"ठीक आहे, कुठल्या प्रकारचे सहाय्य हवे आहे तुला?'' वेताळाने विचारले. त्यावर तो तांत्रिक मोठ-मोठ्याने हसू लागला आणि काही क्षणातच त्याने आपले हसणे थांबवून स्मशानाबाहेर उभ्या असलेल्या प्रकाशकडे अंगुलीनिर्देश करुन,"मला ह्या जीवाला आणि त्याच्या कुटुंबाला संपवून त्याच्याजवळील नागमणी प्राप्त करायचा आहे.'' ही इच्छा वेताळासमोर व्यक्त केली. वेताळाचा पाठलाग करुन बऱ्याच वेळेपासून वेताळाचे आणि तांत्रिकाचे बोलणे लपून ऐकणाऱ्या प्रकाशला काही कळण्याच्या आतच, त्याला वेताळाने आणि त्याच्या बरोबरच्या भुत-पिशाच्चांनी लगेचच घेरले. ह्या तांत्रिकाला आपण इथे उपस्थित असल्याचे कसे काय समजले? आणि याला आपल्या कुटुंबाचा सर्वनाश कशासाठी करायचा आहे? याचा आणि आपला काय संबंध? या सर्व गोष्टींचा प्रकाश विचार करत असतानाच, "तु मला अजुन नीट ओळखले नाहीस वाटते?'' तांत्रिक तावातावातच म्हणाला. तसे प्रकाशने आपले नेत्र मिटले तशी क्षणार्धातच त्याला आपल्या अंतर्ज्ञानाने त्या तांत्रिकाची मुळ ओळख पटली.

"म्हणजे...तू..." प्रकाश उदगारला.

"होय मीच, तू इतका बेसावध असशील असे वाटले नव्हते मला." तांत्रिक म्हणाला.

"इतकी वर्षे मी गाफील राहिलो, त्याचेच हे परिणाम आहेत नाहीतर मी असे घडूच दिले नसते.'' प्रकाश म्हणाला. तितक्यातच "आपण इथे काय करत आहात? आणि कोणाशी बोलत आहात? हे शब्द प्रकाशच्या कानावर पडले. तसे त्याने मागे वळून पाहिले. तसा त्याला आश्चर्याचा झटकाच बसला. तो आवाज विक्षरचा होता. त्याला पाहताच "पण... तु इथे कसा? असा प्रश्न त्याने विक्षरला केला. "ते मलाही पूर्णपणे माहिती नाही. कशी ते माहित नाही. पण मला अगदी अचानक जाग आली मला आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून मी तो बंद करण्यासाठी उठलो, तर तुम्ही घरात नसल्याचे मला जाणवले. म्हणून तुम्ही बाहेर आहात का? हे बघण्यासाठी मी आपल्या घराबाहेर पडलो. पण त्यानंतर मी इथपर्यंत कसा पोहोचलो? हे माझे मलाच कळले नाही, परंतु आपण इथे आणि ते पण यावेळी काय करत आहात? असे बोलता-बोलता त्याने थोडेसे स्मशानाच्या आत डोकावून पाहिले तसा त्याच्या शरीराला कंप फुटला. भितीने त्याचे हात-पाय थर-थर कापू लागले आणि तोंडातून एक शब्दही बाहेर येईनासा झाला. आपल्या आजवरच्या आयुष्यात त्याने कधी कल्पनाही केली नसावी इतके भयंकर दृष्य त्याच्या डोळ्यासमोर तो पाहत होता. त्या ठिकाणी कित्येक भूतं, प्रेतं पिशाच्च आक्राळ-विक्राळ रुप धारण केलेला वेताळ आणि आपल्या साधनेने या सर्व शक्तींना तिथे बोलावणारा विचित्र वेशातील तांत्रिक त्याच्या दृष्टीस पडला. काही क्षण त्या तांत्रिकाची आणि विक्षरची नजरा-नजर झाली. त्या तांत्रिकाने विक्षरला आपल्या जवळ येण्यास सांगितले. तसा प्रकाश त्याला आपल्याजवळ बोलावू लागला. "विक्षर त्याच्याजवळ जाऊ नको.'' म्हणून ओरडू लागला. परंतु विक्षरची आणि त्या तांत्रिकाची नजरा-नजर होताच त्याने विक्षरला वाशिभुत केले; त्यामुळे त्याच्यावर प्रकाशच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो थेट, त्या तांत्रिकाजवळ चालत गेला. आपल्या मुलाचे प्राण संकटात आहेत हे जाणून प्रकाशने आपले डोळे मिटले आणि तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटु लागला, क्षणार्धातच त्याने त्याच्या अवती-भोवती जमा झालेल्या भुत-प्रेत आणि पिशाच्चांवर दृष्टीक्षेप टाकला तसे ते सर्वजण बर्फ गोठावा तसे आपल्या जागी स्थिर झाले. प्रकाशने आपल्या स्तंभन शक्तीने त्या सर्वांना स्तंभित केले आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने विक्षरला तांत्रिकाच्या तावडीतून सोडवले. प्रकाशने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने विक्षर थोडा भानावर आला आता प्रकाश विक्षरला तिथुन घेऊन जाण्याच्या तयारीतच असताना वेताळाने त्या दोघांना अडवले. हे बघुन प्रकाशला आश्चर्य वाटले. त्याच्या स्तंभन शक्तीचा वेताळावर परिणाम झाला नव्हता.

प्रकाशने विक्षरला आपल्या तावडीतुन सोडवल्यामुळे तांत्रिक आधिच खुप चिडला होता. त्यामुळे त्याने संधीचा फायदा घेऊन वेताळाला आव्हान केले. "तु जर माझ्यावर खरोखरच प्रसन्न असशील. तर याच क्षणी या मनुष्याचा वध करुन त्याच्याजवळील नागमणी त्याच्या शरीरापासून विलग करुन माझ्या ताब्यात दे आणि तत्पुर्वी त्याच्या मुलाला इथे माझ्याजवळ घेऊन ये.'' तांत्रिकाने असे आव्हान करताच वेताळाने प्रकाशला आपल्या बाहुपाशात गुंडाळले. तेवढ्यातच त्या तांत्रिकाने विक्षरला आपल्या ताब्यात घेतले आणि तो प्रकाशचे शरीर आपल्या दोन्ही हातांनी आवळू लागला. तो प्रकाशच्या शरीरावरची आपली पकड अधिकच घट्ट करत त्याच्या शरीराची सर्व हाडे मोडून टाकण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यातच वेताळाच्या बाहुपाशात अडकून पडलेला प्रकाश त्याच्या तावडीतून सुटून अदृष्य झाला. आणि क्षणार्धातच त्याने विक्षरची तांत्रिकाच्या ताब्यातुन मुक्तता केली. तांत्रिक प्रकाशच्या शक्तींसमोर हतबल होता. त्यामुळे तो वेताळावर चिडला, "वेताळ मी तुझ्यावर इतके साधे काम सोपवले होते. पण ते सुद्धा तू करु शकणार नसशील तर धिक्कार असो तुझा.'' तांत्रिकाच्या बोलण्याने वेताळाचाही राग आता अनावर झाला होता. तो पुन्हा प्रकाशच्या अंगावर धावून गेला. परंतू प्रकाशने त्याला आपल्या दिव्य शक्तीने तिथेच रोखले. "कदाचित तु मला पुर्णपणे ओळखु शकलेला नाहीस...वेताळ.'' प्रकाश म्हणाला. त्यावर वेताळ विचित्रपणे मोठमोठ्याने हसू लागला. "अरे सर्पां मी तुला केव्हाच ओळखले आहे पण तु माझ्या समोर एखाद्या गांडूळाप्रमाणे आहेस. त्यामुळे निमुटपणे माझ्या मार्गातुन बाजूला हो.'' वेताळ संतापाने उदगारला. ठिक आहे ते कळेलच आता तुला असे बोलुन, वेताळाला काही कळण्याच्या आत प्रकाश वेताळाच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्या थोबडीत एक सणसणीत लाथ मारली. त्या लाथेचा प्रहार इतका जोरदार होता की, वेताळ जमीनीवर कोसळला. त्याच्या दुसऱ्याच क्षणी प्रकाश वेताळाच्या शरीरावर बसुन तो आपल्या दोन्ही हातानी त्याचा गळा दाबू लागला. प्रकाशच्या सामर्थ्याची तांत्रिकाला आधीपासूनच कल्पना होती. तरी वेताळ त्याचा सामना सहजपणे करू शकतो असे त्याला वाटत होते. पण आता त्याचा हा समज त्याला खोटा ठरताना दिसत होता.

प्रकाशने वेताळाची मान आवळताच तो एखाद्या मनुष्याप्रमाणे विव्हळू लागला. हा सर्व प्रकार बघून स्मशानभुमीच्या बाहेर उभे असलेले सर्व भुत-पिशाच्चही भयभीत झाले. तांत्रिक आता खुपच भयभीत झाला होता. त्यामुळे तो तिथुन पळ काढण्याच्या तयारीत होता.

"वेताळ मी जर मनात आणले तर तुझा याच क्षणी सर्वनाश करु शकतो. बोल तुझी काय इच्छा आहे? प्रकाशने वेताळाला विचारले. तसा वेताळ आपली हार पत्करुन आपली सुटका व्हावी म्हणून प्रकाशची माफी मागु लागला. प्रकाशने वेताळाला आपल्या तावडीतून मुक्त केले तसा वेताळाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या सैन्यासकट तिथुन पळ काढला. वेताळ निघुन गेल्याचे बघुन तांत्रिक अधिकच भयभीत झाला. "आता जरी मला जावे लागले तरी जी गोष्ट मी मागच्या जन्मी करु शकलो नव्हतो ती मी ह्या जन्मी शक्य करुन दाखवणार आहे. ज्याप्रमाणे माझा ह्या पृथ्वीवर मनुष्य स्वरूपात जन्म झाला आहे. त्याचप्रमाणे 'नागराजचाही' झाला आहे. आणि त्याने कुठल्यारुपात जन्म घेतला आहे. हे देखील तुला ठाऊक असेलच.'' इतके बोलून तो अदृष्य झाला.

प्रकाशला त्याच्यावर येणाऱ्या संकटाची पूर्व सुचना देणारा हा तांत्रिक म्हणजे त्याच्या पूर्व जन्मातील नागऋषी होता. ही गोष्ट प्रकाशने आपले नेत्र मिटताच क्षणी जाणली होती. पण त्याला त्याच्या पूर्वजन्माचा बोध कसा काय झाला असावा? त्याच्या पूर्वजन्माच्या सर्व स्मृती जागृत कशा झाल्या? अशाप्रकारे कित्येक प्रश्नांनी प्रकाशच्या मनात जन्म घेतला होता.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६