Get it on Google Play
Download on the App Store

अपहरण २

रात्रीचे नऊ दहा वाजले असतील. घरातील सर्वांनाच भूक लागली होती. कारण त्यांच्या जेवणाची वेळ झाली होती. जेवण वाढण्यास सुरुवात झाली. तितक्याच प्रकाशला अचानक काहीतरी आठवले. त्यामुळे ‘मी जरा खाली जाऊन येतो.’ असे म्हणून प्रकाशने आपली चप्पल घातली. तो कुठे चालला आहे? आणि कशासाठी चालला आहे? हे विचारण्याआधीच तो पटापट जिने उतरून इमारतीच्या खाली आला होता. ‘जेवणाचे ताट वाढलेले असताना, जेवायचे टाकून हा असा अचानक घाईगडबडीमध्ये बाहेर कसा काय गेला?’ हा प्रश्न घरातील सर्वांनाच पडला होता. पण ‘त्याला काही महत्वाचे काम आठवले असेल किंवा खाली त्याचा कोणी मित्र आला असावा. या समजुतीने घरातील मंडळींनी आपले समाधान करून घेतले आणि ते जेवू लागले.

सर्वांची जेवणे आटोपली पण प्रकाश अजूनही घरी आला नव्हता. त्याकाळी मोबाईलसारखी यंत्रे अस्तित्वात नसल्याने त्यांचा प्रकाशशी संपर्क होणे शक्य नव्हते. प्रकाशच्या अशा अचानकपणे घराबाहेर जाण्यामुळे सगळेच चिंतीत होते. सर्वांचे लक्ष आता सतत घड्याळाकडे जात होते. घड्याळाचे काटे जस-जसे पुढे जात होते, तसतसे त्यांची चिंताही अधिकच वाढत होती.

प्रकाश हा एका चांगल्या कुटुंबात वाढलेला सुसंस्कारी मुलगा. त्याचे वय जेमतेम बावीस तेवीस असेल. तो अभ्यासात फारसा हुशार नसला, तरी त्याने कसे-बसे आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. हल्लीच त्याला कुठेतरी नोकरी मिळाली होती. तसा तो खूप समजूतदार होता; पण कधी-कधी तो विचित्रपणे वागत असे.

रात्रीचे बारा वाजून गेले होते, तरी अजुन प्रकाशचा काहीच पत्ता नव्हता. त्याचे वडील वसंतराव इमारतीखाली जाऊन, प्रकाश कुठे दिसतो का? हे बघुन आले होते. दुर्देवाने प्रकाशच्या कुठल्याही मित्राचा टेलिफोन नंबर त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे प्रकाशचा शोध घेणे त्यांच्यासाठी कठीण होते.

काहीही न सांगताच घरातून बाहेर पडलेल्या प्रकाशला जाऊन आता जवळपास तीन तास झाले होते. त्यामुळे घरातील सर्व माणसे बेचैन झाली होती. त्यांनी आता पोलीस चौकीत जाण्याचा निर्णय घेतला. प्रकाशचे आई-वडील पोलीस चौकीत आले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पण पोलिसांनी त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व न देता त्यांनाच उलट सुलट प्रश्न विचारले. त्याशिवाय पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा नोंदविण्यास नकार दिला. “जर उद्यापर्यंत तुमचा मुलगा घरी आला नाही तर, पुढे काय करायचे ते आम्ही बघू” असे म्हणून पोलिसांनी आपले हात वर केले. पोलिसांच्या अशा वागण्याचा वसंतला खूप राग आला. त्यामुळे त्यांची आणि पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली. पण पोलिसांशी भांडणे, वसंताने समजुतदारपणे टाळले. आणि मग शेवटी दोघेही नवरा-बायको कंटाळून आपल्या घरी निघून आले. रात्रभर घरातील कोणालाही नीट झोप लागली नाही. सकाळीच त्यांनी पुन्हा पोलिस चौकीकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी त्यांची मदत करण्याचे मान्य करून प्रकाशचा शोध घेण्यास सुरुवात केली.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६