Android app on Google Play

 

अपहरणाचे रहस्य ३

 

नागतपस्वींच्या म्हणण्यानुसार, प्रकाशजवळ जन्मतःच असलेल्या दिव्य नागमणीमुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या शस्त्राचा परिणाम होऊ शकत नव्हता. ही गोष्ट सत्य असल्याचे आतापर्यंत नागराजच्याही चांगलेच लक्षात आले होते. त्यात  नागतपस्वींनी प्रकाशला त्याच्या नागमणीमुळे प्राप्त झालेल्या दिव्य शक्तींबद्दल जी काही माहिती सांगितली होती, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या नागांच्या चेहऱ्यावरचा भीतीने रंग उडाल्याचेही त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे प्रकाशला पृथ्वीलोकातून अपहरण करून त्याला नागलोकी आणण्याचा खटाटोप फुकट जाणार की, काय? आणि मग अशावेळी करायचे तरी काय? नेमके हेच त्याला सुचत नव्हते. काहीही झाले, तरी त्याला प्रकाशला जिवंत ठेवता येणार नव्हते. त्यामुळे ज्याअर्थी प्रकाशसारख्या मनुष्याकडे दिव्य नागमणी असल्यामुळे त्याच्यावर इच्छाधारी नागांच्या शक्तीचा परिणाम होत नव्हता त्याअर्थी जर त्याचा तो नागमणी आपल्याला त्याच्यापासून वेगळा करता आला, तर आपली सर्व चिंताच मिटेल, असा त्याने मनोमन विचार केला. आणि तो नागतपस्वींशी बोलू लागला.

“नागतपस्वी, तुम्हाला काय वाटले? मी ह्याच्या म्हणजेच नागमणीच्या दिव्य शक्तींबद्दल विसरून गेलो की काय? जर तुम्हाला तसे वाटत असेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण मी काहीही विसरलेलो नाही. मी तर फक्त नागमणीच्या शक्तींना तपासून पाहत होतो. नागमणी ही एक अमूल्य देणगी आहे. परंतु परमेश्वराने तो आपल्यासारख्या नागांना न देता, एका तुच्छ मनुष्याला द्यावी... हे आमचे नव्हे तर संपूर्ण नागप्रजातींचे दुर्भाग्य आहे. असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे सर्व घडत असताना, तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? फक्त याच गोष्टीचे मला आश्चर्य वाटते.”

नागराजचे बोलणे ऐकून नागतपस्वी अत्यंत नम्रपणे बोलू लागले. “तसं नाही नागराज. मलाही नागप्रजातीची काळजी वाटते. परंतु परमेश्वर नेहमीच योग्यता असलेल्यांनाच योग्य गोष्टी देतो. मग त्या दिव्य शक्ती असू देत किंवा इतर काही...” नागतपस्वींचे हे बोल ऐकून नागराज त्यांच्यावर संतापून बोलू लागला.

“म्हणजे आपली नागप्रजाती नागमणी धारण करण्याच्या योग्यतेची नाही, असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”

“नाही नागराज, तुझा गैरसमज होतोय. संपूर्ण ब्रम्हांडात जे काही घडत असते त्याच्यामागे परमेश्वराचीच इच्छा असते. तो ज्याला त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणेच देत असतो. म्हणून आपण मिळेल त्यातच समाधान मानावे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे.”

“वा... म्हणजे जर असे असेल, तर मग कोणालाही काहीच मिळवण्याचा प्रयत्न करायला नको.”

“नाही नागराज, तुला अजूनही नीट समजलेले नाही. प्रत्येकाने काहीना काही मिळवण्यासाठी प्रयत्न तर करावेच. परंतु दुसऱ्याचे हिरावून घेऊन स्वतःकरिता मिळवण्यासाठी नाही, तर स्वबळावर प्राप्त करण्यासाठी. लक्षात ठेव, काही जीवांना परमेश्वर काही गोष्टी जन्मतःच प्रदान करतो, तर काही जीवांना तो त्या गोष्टी प्राप्त करण्याची क्षमता देतो. आणि असे असताना एखाद्या जीवाला जन्मजात असलेल्या दैवी देणगीपेक्षा एखाद्या जीवाने स्व:कर्तुत्वावर निर्माण केलेल्या गोष्टींचे महत्व कैक पटींनी अधिक असते.” नागतपस्वी म्हणाले.

“जाऊ दे, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. मला माहिती आहे या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत आणि मी नशीब बदलवण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे.” नागराज म्हणाला.

“वा... हे फार चांगले विचार आहेत. फक्त एवढेच की, हे सर्व तू योग्य मार्गाने करावेस एवढीच आमची इच्छा आहे.” नागतपस्वी.

“योग्य, अयोग्य हे ज्याने त्याने आपापले ठरवावे. तरी नियमानुसार राजा करेल तेच योग्य, हे विसरलात वाटते तुम्ही.” इतके बोलून त्याने आपली नजर बल्ल आणि मल्लकडे वळवली, आणि तो त्यांना उद्देशून बोलू लागला.

“बल्ल, मल्ल ह्या मनुष्याकडे असलेल्या नागमणीमुळे आपले प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा तुम्ही याच्या मस्तकावरील नागमणी त्याच्यापासून वेगळा करा.”

नागराजचे हे उद्गार ऐकून प्रकाशला धडकी भरली. आता ह्या प्रसंगातून स्वतःची सुटका कशी करून घ्यावी? याच विचारात तो होता. बल्ल आणि मल्ल नागराजच्या आज्ञेनुसार प्रकाशचा नागमणी त्याच्यापासून हिरावून घेण्यास त्याच्या जवळ जाणार तितक्यातच नागतपस्वी प्रकाशसमोर येऊन उभे राहतात.

“बल्ल, मल्ल आता तुम्ही याच्या शरीराला स्पर्शही करायचा नाही, आणि जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात, तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.” नागतपस्वी त्या दोघांना उद्देशून म्हणाले. नागतपस्वी प्रकाशला बल्ल आणि मल्लपासून सुरक्षित ठेवण्याकरिता पुढे सरसावले होते, हे पाहून प्रकाशला थोडा धीर आला. नाहीतर तो अशा जीवघेण्या परिस्थितीत अडकलेला असताना, त्याला त्यांचाच काय तो थोडासा आधार!

नागतपस्वींचे हे कृत्य पाहून नागराज त्यांच्यावर अधिकच चिडला होता. परंतु तिथे असलेल्या सर्व नागांच्या उपस्थितीत तो त्यांच्या इच्छेविरुद्ध काही करू शकत नव्हता. शेवटी कितीही झाले, तरी त्याच्याबद्दल नागांच्या मनात आदरभाव होता. म्हणून त्याने नागतपस्वींना त्याच्या मार्गातून बाजूला होण्याची विनंती केली. तरीही नागतपस्वी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत प्रकाशला तसेच संरक्षण देत राहिले.

म्हणून शेवटी नाईलाजाने नागराज स्वतःच नागासनावरून खाली उतरून प्रकाशच्या दिशेने चालत येऊ लागला. आता आपण नागराजला रोखू शकणार नाही, हे जाणून नागतपस्वींनी गुपचूप प्रकाशच्या कानात काहीतरी सांगितले. तसा प्रकाश आपल्या डोक्यावर हात लावून नागमणी चाचपून पाहू लागला.  आत्तापर्यंत त्याला त्याच्या डोक्यावर असलेला नागमणी म्हणजे जन्मापासून असलेली एक गाठ किंवा टेंगुळ आहे, असेच वाटत आले होते. पण त्याच्या आत काहीतरी टणक गोष्ट असल्याची जाणीव मात्र त्याला नेहमीच होत असे. तसा तो जन्मापासूनच त्याच्या शरीराचाच एक लहानसा भाग असल्यामुळे तो प्रकाशपासून दुर्लक्षित होता, किंवा त्याने त्याबद्दल कधी नीट विचारच केला नव्हता.

जेव्हा प्रकाशने त्या दिव्य नागमणीला हात लावला, तेव्हा त्याच्या स्पर्शामुळे त्यातून प्रकाशकिरणे बाहेर पडू लागली. क्षणार्धात तो दिव्य मणी चमकू लागला. आत्तापर्यंत अगदी निस्तेज असलेला मणी बहुदा जागृत होऊ लागला होता. त्याचे तेज इतके प्रखर होते की, तेथील सर्व परिसर त्याच्या तेजाने प्रकाशमय झाला. क्षणार्धातच तिथे सर्वत्र लालसर रंगाची गडद छाया पसरली गेली आणि क्षणार्धात प्रकाशला घेऊन नष्ट झाली.

घडत असलेला सर्व प्रकार तेथील नागांसाठीही नवीनच होता. त्यांच्यापैकी कुठल्याही नागाजवळ नागमणी नव्हता. तसेच त्यांच्यापैकी कोणीही नागमणी धारण केलेला दिव्य नाग आजवर बघितला नव्हता. नागांच्या मान्यतेनुसार नागमणी घेऊन जन्माला येणारा नाग, लाखो वर्षातून फक्त एकदाच जन्माला येतो. त्या नागमणीमुळे त्याला अशा काही दिव्य शक्ती भेटतात की, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मग त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नसते. परंतु नागमणीच्या संदर्भातल्या ह्या सर्व गोष्टी त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्या होत्या; पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे याबद्दलचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या नागांच्या डोळ्यादेखत घडलेला हा सर्व अद्भूत प्रकार पाहून ते सर्वजण काही क्षणांसाठी स्तब्धच झाले होते. त्यांच्या डोळ्यादेखत क्षणार्धात काय घडून गेले आहे या गोष्टीचा त्यांना साधा अंदाजही बांधता येत नसल्याने ते सर्वजण गोंधळलेल्या स्थितीत होते.
 

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य
मनोगत
पार्श्वभूमी
अपहरण १
अपहरण २
अपहरण ३
अपहरण ४
अपहरण ५
अपहरण ६
अपहरण ७
अपहरण ८
खरी ओळख १
खरी ओळख २
खरी ओळख ३
शोध सुरु आहे... १
शोध सुरु आहे... २
स्वप्न की सत्य? १
स्वप्न की सत्य? २
अपहरणाचे रहस्य १
अपहरणाचे रहस्य २
अपहरणाचे रहस्य ३
अपहरणाचे रहस्य ४
नागांची रहस्ये १
नागांची रहस्ये २
नागांची रहस्ये ३
युद्धाची तयारी १
युद्धाची तयारी २
युद्धाची तयारी ३
युद्धाची तयारी ४
युद्धाची तयारी ५
युद्धाची तयारी ६
युद्धाची तयारी ७
युद्धाची तयारी ८
मोहनचे रहस्य
हिमालयात आगमन...१
हिमालयात आगमन...२
प्रकाशची गोष्ट १
प्रकाशची गोष्ट २
प्रकाशची गोष्ट ३
संकटाची चाहूल १
संकटाची चाहूल २
संकटाची चाहूल ३
संकटाची चाहूल ४
संकटाची चाहूल ५
भविष्य धोक्यात आहे! १
भविष्य धोक्यात आहे! २
भविष्य धोक्यात आहे! ३
भविष्य धोक्यात आहे! ४
उत्पत्तीची रहस्ये
"स्वरुप बदलते!"
पुनर्जन्म १
पुनर्जन्म २
पुनर्जन्म ३
विकासाची रहस्ये १
विकासाची रहस्ये २
विकासाची रहस्ये ३
भूतकाळातील घटनाक्रम १
भूतकाळातील घटनाक्रम २
तिच्या स्मृती १
तिच्या स्मृती २
तिच्या स्मृती ३
तिच्या स्मृती ४
तिच्या स्मृती ५
सत्यातील असत्यता १
सत्यातील असत्यता २
सत्यातील असत्यता ३
सत्यातील असत्यता ४
सत्यातील असत्यता ५
सत्यातील असत्यता ६