Get it on Google Play
Download on the App Store

विकासाची रहस्ये १

सर्वप्रथम प्रकाशने विक्षरला मानवाच्या आणि पृथ्वीवरील इतर जीवांच्या उत्पत्तीची रहस्ये सांगितली. परंतु विक्षरने प्रकाशकडून जे काही ऐकले होते ते त्याला चक्रावून टाकणारं होतं. प्रकाशने त्याला आतापर्यंत जे काही सांगितले त्यावर विक्षरने विश्वास जरी ठेवला असला, तरी त्याच्या मनात अजूनही असे बरेचसे प्रश्न शिल्लक होते, ज्यांची उत्तरे फक्त प्रकाशच देऊ शकत होता.

"जर हे सर्व सत्य मानले, तर मग मनुष्य ह्या सर्व अद्भूत रहस्यांपासून अजूनही अपरिचित कसा?" असा प्रश्न विक्षरने विचारताच प्रकाशने त्यालाच काही प्रतिप्रश्न विचारले. आज मनुष्याची वैज्ञानिक क्षेत्रात इतकी प्रगती होऊनही त्याला आपल्या उत्पत्तीबद्दल आणि सुरुवातीच्या काळातील मनुष्याच्या विकासाबद्दल अजूनही ठामपणे काहीच कसे सांगता येत नाही? मनुष्याच्या उत्पत्तीनंतरच्या काळातील मनुष्याची ह्या पृथ्वीवरील स्थिती कशी होती? मनुष्याचा विकास कसा काय होऊ शकला? आजच्या शास्त्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या मते आजच्या काळातील सर्वात बुद्धिमान जीव म्हणून ओळखला जाणाऱ्या मनुष्याचे पूर्वज वानर होते. तर मग मनुष्याचा आनुवंशिक विकास कसा काय होऊ शकला? त्याच्या डी.एन.ए.च्या संरचनेमध्ये बदल कसे काय झाले? असे एक-एक करत बरेचशे प्रश्न त्याने विक्षरला विचारले. ज्यांची उत्तरे साहजिकच त्याच्याकडे नव्हती.

प्रकाशने सांगितलेल्या गोष्टीवरुन सर्व जीवांची उत्पत्ती एकाच जीवापासून झाली होती आणि त्या सर्व जीवांचा पूर्वजही एकच असल्याचे त्याचे म्हणणे होते. परंतु विज्ञानानुसार या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नव्हते. मग नेमके सत्य काय? मानवाचा विकास कसा झाला असावा? असे कितीतरी निरुत्तरित प्रश्न आता पुन्हा विक्षरच्या मनात पिंगा घालत होते. ज्यांची उत्तरे आता प्रकाशलाच द्यावी लागणार होती. विक्षरच्या मनाची अवस्था ओळखून प्रकाशने पुन्हा त्याला काही रहस्यमय गोष्टी सांगण्यास सुरुवात केली.

"आपल्या पृथ्वीवरील सर्वच जीवांची उत्पत्ती एकाच पुर्वाजापासून (ब्रम्हापासून) झाल्यामुळे एक काळ असा होता की, पृथ्वीवरील सर्व प्रजातींमधील जीवांचे शरीर मनुष्याप्रमाणेच होते. हा काल वानरापासून मनुष्याचा विकास होण्याच्या आधीचा काळ होता. त्या काळी कोणत्याही जीवाचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. ज्याप्रमाणे वानरापासून हळू-हळू विकसित होऊन आजच्या काळातील मानव अस्तित्वात आला; त्याचप्रमाणे पूर्वी मानवी गुणांचा काही अंश असणाऱ्या देव-दैत्य, गरुड, नाग, यक्ष, गंधर्व यांच्यातील मानवी गुणांचा काळानुसार हळू-हळू क्षय होत जाऊन ते सुद्धा आपल्या शरीराच्या  पूर्णत्वाला पोहोचले. या गोष्टीचे उदाहरण द्यायचे झाले तर देवतांमधील मनुष्य गुणांचा ऱ्हास होऊन त्यांना दिव्य शरीराची प्राप्ती होऊन ते त्यांच्या पूर्णत्वाला पोहोचले. गरुडासारख्या जिवामध्ये काळानुसार झालेल्या बदलामुळे त्याच्यातील मानवी गुणांचा ऱ्हास होऊन त्याचे पूर्ण पक्ष्यात रुपांतर होऊन त्यानंतरच्या काळात ते भूमीवर न राहता आकाशात राहू लागले. अशाप्रकारे विकासाच्या अवस्थेत अताना प्रत्येक प्रजातींमधील मानवी गुणांचा ऱ्हास होऊन सर्व प्रजातींमधील जीव आपल्या शरीराच्या पूर्णत्वाला पोहोचले. म्हणजेच एकेकाळी मनुष्याप्रमाणेच शरीर असणाऱ्या जिवांमधील मनुष्य गुणांचा काळानुसार ऱ्हास होऊन त्या जिवांमधील असलेल्या विभिन्न गुणांच्या आधारे त्यांचे विविध प्रजातींमध्ये रुपांतर झाले. ज्या जिवाकडे ज्या गुणांची अधिकता होती, त्याच मुख्य गुणाच्या आधारे ते जीव विकसित होत गेले. याच कारणामुळे फक्त काहीच वानरांना आपल्यातील मनुष्य गुणांच्या अधिकतेमुळे मनुष्य स्वरूप प्राप्त करता आले, तर काही वानरांना  मनुष्य गुणांच्या अभावामुळे, पूर्णपणे मनुष्यासारखे विकसित होऊ शकले नाहीत, कारण जर ते तेव्हा विकसित होऊ शकले असते, तर आज वानर नावाची प्रजातीच शिल्लक राहिली नसती."

"मी तुला हे जे काही सांगितले आहे हे सत्य सांगण्यामागचा मुख्य पुरावा म्हणजे पुरातन काळातील मानवी सभ्यतेचे शोधकर्त्यांना आजवर जे काही अवशेष सापडले त्यात त्यांना घोड्याचे धड असलेले मनुष्य, नागाचे धड असलेले मनुष्य, गरुडाचे धड असलेले मनुष्य अशा प्रकार अर्धे मनुष्याचे तर अर्धे इतर जीवांचे शरीर असलेली बरीचशी चित्रे पुरातन काळातील वास्तूंवर  कोरलेली आढळली. जी आजही आपल्याला इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृतीचे पुरावे असलेल्या पिरामिडवरही बघायला मिळतील. संशोधकांना आजही ह्या चित्रांमागचा खरा अर्थ लक्षात आलेला नाही. मनुष्यासारखे हात-पाय असलेला गरुड किंवा नाग, त्याचप्रमाणे शिंगे असलेले मनुष्य, पक्ष्यांप्रमाणे पंख असलेले घोडे आणि मनुष्य अशाप्रकारची सर्व रहस्यमय चित्रे हजारो वर्षांपासून याच सत्याकडे संकेत करत असल्याची जाणीव मनुष्याला आजही झालेली नाही."

"त्यानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हजे आताच्या मनुष्याला देव, दैत्य, गरुड, नाग, यक्ष, गंधर्व, भुत-पिशाच्च यांच्यासारख्या जीवांच्या अस्तित्वाबद्दल सदैव शंका का असते? या जीवांच्या अस्तित्वावर मनुष्याचा चटकन विश्वास का बसत नाही? कारण या सर्व जीवांची ओळख पटवून देणाऱ्या अद्भूत गोष्टी पुरातन काळातील मनुष्यासाठी देखील त्या गोष्टी अविश्वसनीय होत्या. त्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवणे त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे होते. त्यामुळे त्याला सुद्धा या गोष्टी चमत्कारीक वाटत होत्या. अदृश्य होणे, अवकाशात भ्रमण करणे, आपले रूप बदलणे, शरीराचा आकार बदलणे, भविष्य कथन करणे, यासारख्या कितीतरी गोष्टी त्यावेळी मनुष्याबरोबर राहणाऱ्या देव, दैत्य, गरुड, नाग यांसारख्या प्रजाती अगदी सहजतेने शक्य करू शकत होत्या. परंतु या सर्व गोष्टी शक्य करून दाखवणे मनुष्य शरीरक्षमतेच्या पलीकडचे होते, म्हणून तो या गोष्टींना चमत्काराची उपमा देत असे."

"पण, मनुष्यासाठी अभिप्रेत असणारा हा चमत्कार म्हणजे नेमके काय? तर ज्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो किंवा ज्या गोष्टी मनुष्याला शक्य करता येत नाहीत, त्या गोष्टी त्याला चमत्कार वाटू लागतात. पण मग अशाप्रकारे विचार केला तर मग, आजच्या विज्ञान योगातील मानवाने विकसित केलेले तंत्रज्ञान हे हजारो वर्षांपूर्वीच्या मनुष्याला एक प्रकारचा चमत्कारच वाटला असता. कारण भविष्यातील मनुष्य असे काही करू शकतो हे त्यावेळच्या मनुष्यांच्या विचारांच्या पलीकडचे होते. त्याचप्रमाणे त्या काळात देव, दैत्य किंवा नागांसारखे जीव अस्तित्वात होते. या गोष्टीवरही मनुष्याचा चटकन विश्वास बसत नाही."

"एके काळी देव, दैत्य, गरुड नाग यांसारख्या जीवांबरोबर पृथ्वीवर वास्तव्य करणारा मनुष्य अलौकिक शक्तींच्या अभावामुळे या सर्व इतर प्रजातींपेक्षा खूपच मागासलेला होता. इतर जीवांकडे अलौकिक शक्ती असल्यामुळे तो त्यांना आपल्यापेक्षा वरचा दर्जा देत असे आणि तसेही मनुष्यातील अलौकिक शक्तींच्या अभावामुळे इतर प्रजाती त्याला अगदी सहज आपला गुलाम बनवू शकत होत्या. एके काळी याच पृथ्वीवर जन्माला येऊन विकसित झालेल्या या सर्व प्रजातींमधील जीवांसारख्या अलौकिक शक्तींच्या अभावामुळे इतर प्रजातींमध्ये विकसित न होऊ शकणारा जीव नंतर मनुष्य म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच त्याकाळचा अविकसित मनुष्य नागांचा गुलाम होता. पण नागांमुळेच या मनुष्याला प्रगीतीची दिशा मिळाली. हे देखील एक सत्यच आहे. नाहीतर आपल्यातील अलौकिक गुणांच्या अभावामुळे त्यावेळी मनुष्य म्हणून अस्तित्वात येणारा जीव रानावनात, कडे-कपारीत राहणारा, शरीराभोवती वस्त्र  म्हणून पालापाचोळा गुंडाळणारा होता. त्याकाळच्या अविकसित मनुष्याने स्वबळावर त्याच्या जीवनात इतक्या झपाट्याने  प्रगती करणे शक्यच नव्हते. काही गोष्टी तो देवांकडून शिकला, काही नागांकडून, तर काही दैत्यांकडून. अशाप्रकारे प्रत्येक प्रजातींकडून मनुष्याला काही ना काही शिकता आले. ज्या ज्या गोष्टी त्याला इतरांकडून आत्मसात करता आल्या त्या त्याने केल्या. त्यानंतरच्या काळातील मनुष्याला हा सर्व प्रजातींच्या सानिध्यात राहिल्याने त्याला देवतांनी किंवा नागांनी निर्माण केलेली विविध तंत्र आत्मसात करता आली. जी आजच्या काळातील मनुष्याला अशक्य वाटू शकतात. त्यात भविष्य कथन करणे, अवकाश भ्रमण करणे, अदृश्य होणे यासारख्या कित्येक तंत्रांचा समावेश होतो. त्याकाळी वैज्ञानिक प्रगती झालेली नसतानाही त्या काळातील मनुष्याला ग्रहांची गती, त्यांचे आकाशगंगेतील स्थान या सर्व गोष्टींच्या आधारे खगोल शास्त्राचा आणि त्याद्वारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता येणे शक्य होते. तसेच त्या काळातील मनुष्याला हृदय प्रत्यारोपण, मेंदूच्या शस्त्रक्रिया, त्वचारोपण यासारख्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेचे ज्ञान होते. त्याकाळी जी चिकित्सा पद्धत अस्तित्वात होती, ती चीकीत्सापद्धत आजच्या काळातील चिकित्सा पद्धतीपेक्षाही कितीतरी पटींनी अधिक प्रगतीशील होती.  या तंत्राचे ज्ञान मनुष्याने धन्वंतरी आणि अश्विनीकुमार यांसारख्या देवतांकडून आत्मसात केले. वैद्यशास्त्रामध्ये नागांचे आणि गरुडाचेही योगदान महत्वपूर्ण होते. म्हणूनच त्याकाळातील मनुष्य नागांनी विळखा घातलेल्या आणि दोन्ही बाजूनी गरुडाचे पंख असलेल्या आणि मनुष्याचे मुख असलेल्या चिन्हालाच वैद्याशास्त्राचे प्रतिक मानत असे. त्यातील मनुष्याप्रमाणे असलेले मुख हे देवांचे, गरुडाचे पंख हे गरुडाचे तर विळखा घातलेले नाग हे नागांचे प्रतिक मानले जाते. या सर्व गोष्टींवरून त्या काळी मनुष्याचा या सर्व जीवांशी संबंध होता हे स्पष्ट होते. परंतु दुर्दैवाने त्या काळातील मनुष्याने ह्या सर्व जीवांकडून आत्मसात केलेली विविध तंत्रे अत्यंत गुप्त ठेवल्याने त्याचा वारसा पुढील पिढीला मिळाला नाही."

"गंधर्वाकडून मनुष्याला कलेचा वारसा मिळाला, देवतांकडून अध्यात्मिकतेचा तर दैत्यांकडून गुप्त तंत्र मंत्राचा मनुष्याला वारसा मिळाला. अशाप्रकारे मनुष्याने ह्या सर्व जीवांच्या सानिध्यात राहून काही ना काही आत्मसात केले आणि आपली वेगळी अशी मानवी सभ्यता निर्माण केली. थोडक्यात इतर जीवांनी निर्माण केलेल्या संस्कृतीच्या मिश्रणाने मानवी सभ्यतेचा आणि संस्कृतीचा पाया रचला गेला." इतके बोलून प्रकाशने आपले बोलणे थांबवले.

आत्तापर्यंत प्रकाशचे बोलणे ऐकून विक्षरची त्या काळातील मनुष्याच्या विकासाची रहस्यमय कहाणी ऐकण्याची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. आत्तापर्यंत प्रकाशने त्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्याला फारच अद्भूत आणि रहस्यमय वाटत होत्या. त्यामुळे या सर्व गोष्टी सत्य आहेत की असत्य? याचा विचार करणे सोडून, तो प्रकाशचे बोलणे शांतपणे लक्ष देऊन ऐकत होता. पण प्रकाशने आपले बोलणे थांबवताच त्याल या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे त्याने लगेचच "ह्या सर्व गोष्टी सत्य असण्यामागचे अजून काही पुरावे आहेत का? असा प्रश्न प्रकाशला विचारला. त्याचा प्रश्न ऐकताच प्रकाश एक मिश्कील हास्य करत पुन्हा बोलू लागला.

"एके काळी इतर प्रजातींचे पृथ्वीवर अस्तित्व असण्यामागचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे आफ्रिका खंडातील इजिप्तचे पिरामिड. हे पिरामिड आजपासून जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण केलेले आहेत. यात चारशे-साडेचारशे फुट उंचीचे पिरामिडही आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पिरामिड बनवण्यासाठी वापरलेले प्रचंड वजनाचे दगड कित्येक मैलाच्या अंतराहून आणले गेलेले आहेत. त्या काळात अशा प्रकारच्या भव्य वास्तूचे मिर्माण करण्यासाठी आजच्या काळासारखी यंत्रे अस्तित्वात नसूनही त्या काळातील मनुष्याने इतक्या लांब अंतराहून, इतके मोठे दगड उचलून कसे काय आणले असतील? त्याचप्रमाणे ते दगड एकावर एक रचून इतके भव्य पिरामिड कसे काय निर्माण केले असतील? त्यांनी इतके वजनदार दगड इतक्या उंचीवर कसे काय नेले असतील? अशा प्रकारच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे आजच्या काळातील संशोधकांकडे नाहीत. इतक्या प्रचंड वजनी दगडांची कौशल्यपूर्ण पद्धतीने रचना करून, निर्माण केलेली पिरामिडसारख्या वास्तूची पुन्हा निर्मिती करणे आजच्या काळातील वास्तूतज्ञांनाही अशक्यच वाटते."

"पिरामिडच्या आतमध्ये एका विशिष्ट प्रकारची उर्जा तरंग सतत प्रवाहित होत असतात. जी सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींवर आपला प्रभाव टाकत असतात. हे वैज्ञानिक प्रयोगानी सिद्ध झाले आहे. पिरामिड मानवी शरीरावरही विशिष्ट प्रकारचा प्रभाव टाकतात. त्यामुळे आजही पिरामिडच्या प्रतिकृतींचा उपयोग रोगनिवारण करण्यासाठी केला जातो. पिरामिडच्या आतमध्ये ठेवलेली कोणतीही गोष्ट बराच काळ जशीच्या तशी राहते. म्हणूनच त्या काळी पिरामिडमध्ये ठेवलेली प्रेते अजूनही टिकून आहेत. त्या काळी आपल्या राजांचे प्रेते सुरक्षित ठेवण्याकरिता पिरामिडची निर्मिती करण्यात आली होती. कारण एक दिवस आपल्या राजाचा आत्मा पृथ्वीवर परत येईल या गोष्टीवर इजीप्तवासियांचा विश्वास होता. त्यामुळे जर त्यांचे शरीर सुरक्षित ठेवले गेले; तर ते पुन्हा जिवंत होऊ शकतील अशी त्यांची धारणा होती. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळातील इजिप्तवासियांचे ते राजे म्हणजे मनुष्य शरीर धारण केलेले इच्छाधारी नाग होते. त्यांनीच आपल्या दिव्य शक्तींनी मनुष्याला ह्या सर्व गोष्टींची निर्मिती करण्याचे तंत्र शिकवले होते. त्यांच्याजवळील अद्भूत शक्तींमुळे ते सामान्य मनुष्यासाठी अशक्य असणाऱ्या कितीतरी गोष्टी अगदी सहज शक्य करू शकत होते. त्यांच्या याच अद्भूत शक्तीसामर्थ्यामुळे मनुष्याला त्यांचा फार आदर वाटत असे. आणि भीतीही. नागांनी कित्येक वर्षे मनुष्य प्रजातीवर राज्य करण्यामागचे हे एक महत्वाचे कारण होते. नागांच्या सानिध्यात राहिल्याने त्या काळचा अविकसित मनुष्य आपल्या जीवनात बरीच प्रगती करू शकला. बरीच वर्षे मनुष्याच्या सानिध्यात राहिल्याने नागांनाही मनुष्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटू लागली. त्यामुळे त्या काळातील नाग राजे आपल्या शक्तींचा उपयोग मनुष्याच्या कल्याणाकरिता करीत होते. पण असे करण्यामुळे त्यांच्या शक्तींचा व्यय होत असे, ज्यामुळे त्यांचे आयुर्मान घटून त्यांचा अकाली मृत्यू होत असे. आपल्या राजाचा आपल्या कल्याणाकरीता अशाप्रकारे मृत्यू व्हावा हे मनुष्यालाही मान्य नव्हते. त्याकाळी नागांनी मनुष्याला दिलेल्या वचनानुसार 'एक दिवस ते पुन्हा पृथ्वीवर परत येणार आहेत.' पण त्यासाठी त्यांचे शरीर किंवा शरीराचा एक तरी भाग सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे नागांनी मनुष्याला सांगितले होते आणि म्हणूनच मनुष्यरूपातील आपल्या राजाच्या पुनर्जन्मासाठी मनुष्याने त्यांचे प्रेत सुरक्षित ठेवण्याकरीता, नागांनीच विकसित केलेल्या तंत्राचा वापर करून नागांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्याला पिरामिडची निर्मिती करता येणे शक्य झाले. या सर्व गोष्टींचा संबंध पृथ्वीवर मनुष्याव्यतिरिक्त भुत-प्रेत आणि नागांसारख्या इतर प्रजातींचे अस्तित्व असण्याशीच आहे आणि त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे तुझ्यासमोर असलेला तुझा पिता...

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६