साधना 50
अनन्त परमात्मा संपूर्णतेने मिळवणे अशक्य आहे, असे बुध्दीने निर्धारण्याचा हा प्रश्न नाही. ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. हा अनुभव आनन्दरूप आहे. आकाशात उडणारा पक्षी पंखाच्या प्रत्येक फडफडण्याबरोबर आकाशाच्या अनन्ततेची जाणीव मिळवत असतो. हे पंख आकाशाच्या अतीत आपणास नेणार नाहीत हे तो पूर्णपणे समजतो. परन्तु असे समजण्यातच आनन्द आहे. त्याच्या पिंजर्यातील आकाश मर्यादित आहे. त्याच्या जीवनास तेवढे पुरेसेही असेल. गरजेहून ते अधिक नाही. परन्तु गरजेपुरत्या जीवनात पक्ष्याला आनन्द नाही. आपणास जरूर आहे त्यापेक्षा अनन्त पटीने मिळाले आहे ही कल्पना कळेल तेव्हाच पक्ष्याला आनन्द होईल.
याप्रमाणे अनन्त परमात्म्याकडे आत्मा उड्डाण करत जाऊ दे. जे आपणास मिळवायचे आहे ते मिळवायला आपणास पुरेशी शक्ती नाही, हे पदोपदी अनुभवास येऊन आनंद होऊ दे. हे समजण्यातच मोक्ष आहे.
मनुष्याचे शाश्वत सुख अमूक एक मिळवून घेण्यात नसून, जे आपणाहून महान् आहे त्याच्या चरणी स्वतःला समर्पिण्यात आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनाहून थोर अशी जी सामाजिक, राष्ट्रीय, मानवजातीसंबंधी कर्तव्ये आहेत, तदर्थ जीवन देणे यात मानवाचा मोठेपणा आहे. आपणाजवळचे सारे, एवढेच नव्हे तर प्राणही या कर्तव्यासाठी द्यायला आपण आनन्दाने सिध्द होतो. या वस्तू इतक्या थोर असतात की, त्या आपल्या उदात्ततेने आपणास व्यक्तिगत जीवनाची क्षुद्रता पटवतात. सारे जीवन त्या महनीय ध्येयासाठी होमावे असे वाटते. जोपर्यंत एखाद्या महान् ध्येयासाठी आपण आपले जीवन समर्पीत नाही, तोवर ते जीवन नीरस, कंटाळवाणे वाटते. जिच्यासाठी आपण सर्वस्व सोडू, अशी एखादी उज्ज्वल ध्येयभूत वस्तू मानवाला हवी असते. बुध्द, ख्रिस्त, सारे सन्त, पैगंबर, प्रेषित, हे उदात्त विचारांचे व ध्येयांचे प्रतिनिधी आहेत. सर्वस्व समर्पणाची सन्धी ते दाखवत असतात. ते आपले दिव्य भिक्षापात्र तुमच्यासमोर करतात व तुमच्या सर्वस्वाची भिक्षा मागतात. त्यांना नाही म्हणणे जिवावर येते; आणि देण्यातच माझा सारा आनन्द साठवलेला आहे, त्यातच मोक्ष आहे, ज्या मानाने देईन त्या मानाने अनन्ताशी जोडला जाणार आहे, हे जीवाला कळून येते.
मनुष्य अपूर्ण आहे. त्याला पूर्ण व्हायचे आहे. आपले हे वरवरचे स्वरूप अति क्षुद्र आहे. येथेच आपण थबकू तर पुढे विकास नाही. मग या लहान डबक्यात पडून नरक-भीषण नरक अनुभवाल. तुमचे ध्येयभूत जीवन असीम आहे. तुम्हाला जे खरोखर व्हावयाचे आहे, ते परमोच्च आहे. तुमच्या सुप्त मोठेपणास मर्यादा नाही. तुमचा मोक्ष ती स्थिती मिळवून घेण्यात आहे. आपले वर्तमानकालीन जीवन जे क्षणाक्षणाला अनुभवाला येते त्याच्याशी जोडलेले आहे, परन्तु ध्येयभूत जीवन अनन्तासाठी धडपडत असते ते कधी गमावता येणार नाही. कारण ते कधी मिळत नसते.
जीवनाची मर्यादा व्यावहारिक जीवनास उपयोगी आहे. जगण्यासाठी मनुष्य अन्न मिळवतो, ऊब असावी म्हणून कपडा मिळवतो. सृष्टीच्या या पसार्यात वस्तू मिळवतो. इस्टेट वाढवणे यातच मनुष्य गुंग असतो.
जगातील हे मिळवणे आपल्या गरजेने मर्यादित असते. जेवढी जरूरी तेवढे मिळवतो. भांडयात रिकामी जागा असेल त्या मानाने पाणी आत जाणार. भुकेपुरते अन्न, राहण्यापुरते घर, वस्तू गरज भागवते म्हणून ती उपयुक्त. अशा पध्दतीने काही वस्तू आपण मिळवत असतो. मिळवण्याचा लोभ हा संसाराचा भावच आहे.