साधना 31
आपण भाषा शिकतो. भाषेचे नियम शिकतो. परंतु येथेच थांबू तर खरा आनंद मिळेल का? भाषा कशी बनली ते पाहण्यात दंग होऊ तर खरे ध्येय मिळाले असे होणार नाही. कारण व्याकरण म्हणजे वाङ्मय नव्हे. छंदःशास्त्र म्हणजे साहित्य नव्हे. केवळ नियम बघू तर आनंद कोठला? प्रथम आपणास अनंत वस्तू चिरडतात. मग त्या अनंत वस्तूतील कार्य-कारणभावाचे नियम आपण शोधतो. ते नियम डोक्यावर बसतात. साहित्यात व्याकरणाचे नियम असतात. तरीही तेथे आनंद असतो. काव्याचे सौंदर्य नियमबध्द असले तरी ते त्यांच्या पलीकडे जाते. नियम हे काव्याचे पंख आहेत. काव्याचा आत्मा खाली न खेचता त्यांनी तो स्वातंत्र्याच्या आकाशात न्यायला हवा. काव्याचे रूप नियमबध्द आहे. त्याचा आत्मा सौंदर्यबध्द आहे. स्वातंत्र्याची पहिली पायरी म्हणजे मुक्ती. सौंदर्यात सान्त व अनन्त एकत्र येतात, एकरूप होतात. बंध व मोक्ष यांचा रमणीय समन्वय सौंदर्यात असतो.
हे जग म्हणजे महाकाव्य आहे. या काव्याचे छंद कोणते, येथील पात्रे कोणती, संकोच-विकास येथे कसकसा आहे, - हे सारे पाहणे मनाचे काम आहे. परंतु येथेच थांबून चालणार नाही. एक रेल्वे स्टेशन आले, म्हणजे काही घर आले असे नाही. हे सारे जगत् आनंदमय आहे, अशी ज्याला पूर्ण अनुभूती आली, त्यालाच अंतिम सत्य लाभले.
मानवी हृदय व निसर्ग यांचा संबंध किती गूढ असला पाहिजे, याचा विचार राहून राहून माझ्या मनात येतो. निसर्गाचे बाह्यरूप एक आणि आपल्या अंतरंगात त्याचे निराळेच रूप असते. उदाहरणार्थ, एक फूल घ्या. फूल कितीही सुंदर असो, त्याला एक मोठे कार्य करायचे असते. त्याचे रंग नि गंध त्या कामासाठी. त्याचा आकारही त्या कामाला अनुरूप असतो. त्या फुलाला फळास जन्म द्यायचा असतो. वृक्षजीवनाची परंपरा भंगली तर सृष्टी उजाड होईल. फुलांचा गंध नि रंग यांच्या मुळाशी महान् उद्देश आहे. मधमाशी येते, त्या फुलावर बीजोत्पादक पराग-कण फेकते. फुलाचे फळ होऊ लागते. फळ होऊ लागताच त्या फुलाच्या सुंदर पाकळया गळू लागतात. सृष्टीतील काटकसरीचा कठोर कायदा त्या फुलास लागू होतो. गंध-रंग सारे संपते. त्या फुलाला छानछोकी करायला अवसर नाही. ते कामात व्यग्र आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू अशा रीतीने कर्ममग्न दिसेल. कळीचे फूल, फुलाचे फळ, फळातून बीज, त्यातून पुन्हा नवा अंकुर, आणि पुन्हा वृक्ष-अशी ही सृष्टी अखंड चालली आहे. या कामात अडथळा आणणारी वस्तू दूर फेकली जाईल. निसर्गाच्या प्रचंड कचेरीत बहुविध कामे सुरू असतात. येथे नाना खाती. ते रंगीत नखरेबाज दिसणारे फूल कर्महीन नाही. उन्हातान्हात श्रमणारे ते मजूर आहेत. त्या फुलाला आपल्या कामाचा हिशेब द्यायचा आहे. त्याला मजा मारायला वेळ नाही.
परंतु हे फूल मानवी हृदयात शिरते तेव्हा त्याचे स्वरूप बदलते. ते फूल विश्रान्ती आणि आनंद याचे निधान वाटते. जी वस्तू बाहेर अनंत श्रमांची मूर्ती असते, ती वस्तू हृदयात सौंदर्य नि शान्ती यांची मूर्ती बनते !
शास्त्र येऊन म्हणेल की, फुलांचे बाहेरचे स्वरूप तेच खरे. तुमच्या मनोमय कल्पना फोल आहेत. परंतु आपले हृदय ग्वाही देते की, मनाची कल्पनाही बरोबर आहे. निसर्गाच्या बाह्य जगात उपयुक्त काम करण्याची मला खूप शक्ती आहे, असे फूल प्रशस्तिपत्र दाखवील. परंतु आपल्या हृदयाच्या दाराजवळ ते सौंदर्य घेऊन येते. बाह्य जगात राबणारे ते फूल माझ्या हृदयात मुक्त व स्वतंत्र आहे. फुलाचे कोणते स्वरूप खरे? फुलाचे वृक्षपरंपरा राखण्याचे, फळ म्हणून होण्याचे बाहेरचे स्वरूप खरे आहेच. परंतु ही बहिःसत्यता झाली. परंतु आतही एक सत्य आहे व ते म्हणते, “आनंदात् हि एव खलु इमानि भूतानि जायन्त ।” हे सारे चराचर आनंदातून जन्मते.