साधना 11
बुध्ददेव साधुसिंहाला उपदेश करताना म्हणाले : ”मी कर्माचा त्याग शिकवतो ही गोष्ट खरी, परंतु कोणत्या कर्माचा? ज्या कर्मामुळे दुष्टपणा उत्पन्न होईल, त्यांचा त्याग मी शिकवतो. मी शून्याचा उपदेश करतो, ही गोष्ट खरी; परंतु कोणत्या गोष्टी शून्य करायच्या? स्वतःचे अहंकार, दुष्ट विचार, अज्ञान यांना शून्य करा. दया, क्षमा, प्रेम, सत्य यांना नाही नष्ट करायचे ! याचे नाही निर्वाण करायचे?”
बुध्दाने जे मोक्ष-तत्त्व उपदेशले, त्याचा अर्थ हा की, अविद्येपासून, अज्ञानापासून मुक्त व्हा. अविद्या म्हणजेच अज्ञान. ज्यामुळे आपण आपले खरे व्यापक स्वरूप विसरतो ते अज्ञान. त्याच्या पाशातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष. या अज्ञानामुळे अहंकाराच्या पिंजर्यात आपण पडतो; गर्वान्ध, विषयान्ध, लोभी, दुष्ट बनतो. मनुष्य झोपतो त्या वेळेस तो जिवंत असतो. परंतु सभोवतालच्या सृष्टीशी त्याचा संबंध नसतो म्हणून तो स्वतःलाही त्या वेळेस जाणत नाही. त्याचप्रमाणे जगात वावरताना चराचराशी एकतेचा अनुभव तुम्हाला जेव्हा येत नसतो, त्या वेळेस तुमची ती आत्म्याच्या बाबतीतील निद्राच असते. अहंकाराच्या निद्रेतून जागे व्हाल, तेव्हा बोधी प्राप्त होऊन बुध्द व्हाल.
बंगालमधील एका खेडेगावात एका धर्मपंथाचे दोन साधू मला भेटले. मी म्हटले, ‘तुमच्या धर्मग्रंथाचे विशिष्टत्व कशात ते सांगू शकाल?’ एक म्हणाला : ‘हे सांगणे कठीण आहे.’ दुसरा म्हणाला, ‘कठीण नाही, सोपे आहे. आपले खरे स्वरूप आधी समजून घ्यायचे व मग आपल्यामधील परमात्म्याला समजून घ्यायचे?’ मी त्याला म्हटले : ‘हा उपदेश सर्व जगाला तुम्ही ना काही करत? तो म्हणाला, “ज्याला तहान असेल तो नदीवर येईल !’ मी म्हटले : ‘परंतु असे कोणी येतात का? तुम्हांला दिसले का?’ मृदू, स्मित करीत तो म्हणाला : ‘आज ना उद्या त्यांना आलेच पाहिजे. ते सारी येतील. येणारच !’ त्याच्या उद्गारात निश्चितता होती. गंभीर शान्ती होती. ते उतावळीपणाचे उद्गार नव्हते.
बंगाली खेड्यातील त्या साधूचे म्हणणे खरे आहे. अन्नवस्त्राहून जास्त जरुरीच्या व महत्त्वाच्या वस्तू शोधून काढायला मनुष्य बाहेर पडला आहे. मनुष्य स्वतःचे स्वरूप पाहण्यासाठी बाहेर पडला आहे. मानवी यात्रा अनंत काळापासून याचसाठी सुरू झाली आहे. जगात अनेक साम्राज्ये वाढली नि गाडली गेली. आपली स्वप्ने मूर्तिमंत करण्यासाठी मानवाने अनेक चिन्हे निर्माण केली. परंतु मुले पहिली खेळणी फेकतात, नवीन घेऊ बघतात, तसे मानवाचे चालले आहे. शेकडो वर्षे श्रम करून तो काही उभारतो आणि पुन्हा ते झुगारून देतो. जणू त्यात त्याला राम वाटत नाही. युगामागून युगे जात आहेत आणि मानव परिपूर्णतेकडे जात आहे. मनुष्याने घोडचुका केल्या, कत्तली केली, अनंत संहार केले, मुंडक्यांच्या राशी केल्या. रक्ताचे पाट वाहवले. नाना यातना, जुलूम, छळ हे सारे सहन करीत मानवजात पुढे जात आहे. मनुष्याने उभारलेल्या नानाविध संस्था म्हणजे महावेदी आहेत. प्रत्यही तेथे अपार बलिदान होत आहे; परंतु यातूनच परिपूर्णतेचे दर्शन मानवजात एक दिवस घेईल. जन्म-मरणांची पावले टाकीत हे अनंत यात्रेकरू सारखे येत आहेत. उत्तरोत्तर अधिकाधिक एकता अनुभवू बघत आहेत.
मनुष्याचे दारिद्रय अपार आहे. त्याच्या वासना अनंत आहेत. आत्मज्ञान होईपर्यंत तो हपापलेलाच असायचा. ज्याला आत्मदर्शन झाले त्याला स्थिर बिंदू सापडला. मग त्या मध्यबिंदूभोवती-सारे व्यवस्थित गुंफलेले त्याला दिसते.