साधना 32
फुलाला बाह्य सृष्टीत एक काम करायचे आहे, मानवाच्या मनःसृष्टीतही एक करायचे आहे. हे मनःसृष्टीतील कोणते काम? निसर्गात त्याचे काम सेवकाचे आहे. परंतु मनुष्याच्या हृदयात राजाचा दूत म्हणून ते येते. सीता अशोकवनात रडत असते. रामचंद्राची मुद्रिका घेऊन हनुमान दूत बनून येतो. ती खूण बघातच दूताने काय बातमी आणली असेल ते सीता ओळखते. आपला प्रियकर आपणास विसरला नाही, तो आपणास लवकरच मुक्त करील, असे सीतेला ती अंगठी सांगते.
हे फूलही प्रियकराकडून संदेश घेऊन येते. सीता सोन्याच्या लंकेत असूनही वनवासी होती. आपलीही तीच स्थिती असते. श्रीमंतीत लोळत असूनही आपण दरिद्री असतो. जगातील वैभव आपल्या हृदयास जिंकू बघते. रावण वैभवाने सीतेला वश करू बघतो. पंतु ते फूल येते, परतीराहून खूण येते. ते फूल कानात म्हणते, “मी त्याचा संदेश आणला आहे. त्यानेच मला पाठवले. त्या प्रेममयाचा, आनंदमयाचा मी दूत. तू इकडे अनाथाप्रमाणे पडलीस. त्याने आता सेतू बांधला आहे. तो तुला विसरला नाही. तो तुला मुक्त करील, हृदयाशी धरील हा मोह तुला कायमचे गुलाम नाही करू शकणार.”
तुम्ही फुलाला जर विचाराल की, तू त्याचा दूत कशावरून? तर ते म्हणेल, “हे पाहा त्याचे रंग, हे त्याचे गंध. ही त्याने प्रेमभेट पाठवली आहे.” ती प्रेमाची भेट आपल्या हृदयात अपार उत्कंठा उत्पन्न करते. ज्या सोन्याच्या लंकेत आपण आहोत त्याच्याशी आपणास काहीएक करायचे नाही. आपला मोक्ष या सोन्याच्या मोहातून पलीकडे जाण्यात आहे. त्यातच जीवनाची कृतार्थता, परिपूर्णता.
सृष्टीच्या बाह्य व्यवहारात ते रंग नि गंध मधाचा अचूक मर्गा दाखवायला मधमाशीस उपयोगी पडतात. परंतु आपल्या हृदयात ते फूल केवळ आनंद घेऊन येते. ते फूल म्हणजे परमेश्वराचे जीवात्म्याला नानारंगी शाईत लिहिलेले प्रेमपत्र होय !
म्हणून मी म्हणत असतो की, आपण किती जरी व्यवहारमग्न असलो, तरी अंतःकरणात असे एक गुप्त मंदिर आहे की, जेथे आपला आत्मा जातो-येतो. तेथे कारखान्याची भट्टी नसते. तेथे प्रेममंदिर असते. सृष्टीतील कार्यकारणभावाची जड शृंखला तेथे नसते. ती जड शृंखला येथे वीणा बनते. प्रेमाचे संगीत ऐकवते.
सृष्टीत एकाच वेळी दास्य नि मोक्ष यांचे स्वरूप असावे, याचे आश्चर्य वाटते. सहेतुकता व अहेतुकता एकाच वेळी ! निसर्ग बाह्यतः कार्यमग्न दिसतो, तर त्याचे अंतरंग अपार शान्तीने भरलेले असते. काम करणारी सृष्टीच हसत खेळत जाणारी दिसते. सृष्टीकडे बहिर्दृष्टीने बघाल तर तिची बंधने दिसतील. अंतर्दृष्टीने बघाल तर ती सौंदर्याची खाण वाटेल.