साधना 33
ऋषी म्हणतो, “आनंदात् हि एव खलु इमानि भूतानि जायन्ते, आनन्देन जीवन्ति, आनंदं प्रयन्ति, आनंद अभिसंविशन्ति ।” म्हणजे सर्व प्राणिमात्र आनंदातून जन्मले, आनंदावर पोसले गेले. ते आनंदाकडे जात आहेत. आनंदात शिरत आहेत. असे म्हणणारा आनंदोपासक ऋषी नियमांची उपेक्षा करतो असे नाही. अमूर्त विचारात रमून तो असे म्हणतो असे नाही. सृष्टीचे अभंग कायदे तो जाणतो, त्याचे महत्त्व ओळखतो. तो म्हणतो, “त्याच्या भीतीने अग्नी जाळतो, वायू पाहतो, सूर्य प्रकाशतो. त्याच्या भीतीने मेघ वर्षतो, मृत्यू आपले काम करतो. सृष्टीचे नियम वज्रप्राय आहेत. सृष्टीच्या राज्यात दयामाया नाही. कायदेभंग कराल तर थप्पड खाल. तरीही हा कवी म्हणतो, “प्राणी आनंदातून जन्मले, आनंदावर पोसले गेले, आनंदात नाचतात, आनंदाकडे जातात, आनंदात शिरतात. तो अमर परमात्मा आनंदरूपाने स्वतःला प्रकट करतो-’आनंदरूप अमृतं द् विभाति ।” या अपार आनंदाचे आकारात प्रकट होण्याचे जे स्वरूप त्यालाच नियम म्हणतात. आनंदाला काही तरी रूपाने प्रकट व्हावे असे वाटते. गवयाचा आनंद गानाने, कवीचा काव्याने प्रकट होतो. मनुष्य हा निर्माता आहे. हृदयातील अपार आनंदामुळे हे नाना आकार तो निर्मितो.
या आनंदाचेच दुसरे नाव म्हणजे प्रेम. आनंदाच्या प्रकटीकरणास द्वैत हवे. ज्या वेळेस गवयाला स्फूर्ती येते, त्या वेळेस त्याचे जणू दोन भाग होतात. अंतःकरणात त्याचे एक रूप ऐकत असते. बाहेरचा श्रोतृवृंद हे त्याचेच विस्तृत असे दुसरे स्वरूप. प्रियकर आपल्या प्रिय वस्तूत आपलेच दुसरे रूप बघतो. आनंदानेच वियोग आणि विरोध, द्वैत दूर करून परस्पर ऐक्य अनुभवून आनंद भोगायचा.
अमृतस्वरूपी परमात्म्याचे दुसरे एक रूप जीवात्म्याच्या रूपाने निर्मिले. जीवात्मा आणि परमात्मा अलग अन् निराळे असले तरी हा निराळेपणा, हा वेगळेपणा कायमचा नाही. तो कायमचा असता तर जगातील दुःखाला व दुष्टपणाला सीमाच राहिली नसती. मग असत्याकडून सत्याकडे कधीही आपण जातोच ना. हृदयाची पावनता कधीही लाभती ना. जगातील विरोध, भेद सारे तसेच राहिले असते. विविधतेतील एकतेचा धडा दिसला नसता. नसती भाषा, नसते ज्ञान, नसते सहकार्य, नसते हृदयाला हृदय मिळणे. परंतु जगारत त्याच्या उलट दिसत आहे. जगातील वेगळेपणा वज्रलेप नाही. वस्तू बदलत आहेत. एकमेकांत मिसळत आहेत. शास्त्रच अध्यात्मविद्या होऊन जात आहेत. दिवसेंदिवस वस्तुजात आपल्या मर्यादा ओलांडीत आहे. जीवनाची व्याख्या अधिक स्पष्ट होत आहे.
परमात्म्यापासून आपण निराळे झालो. परंतु परम प्रेमामुळेच आपण निराळे झालो. एकमेकांस पाहण्याचे सुख मिळावे म्हणून अलग झालो. जगातील दुःखे, असत्ये, क्लेश, कष्ट यांना आपण जिंकून घेतो. एवढेच नव्हे तर त्यांना निराळेच रूप देऊन त्यातून सौंदर्य व सामर्थ्य प्रकट करतो.