साधना 47
संगीत हा कलेचा अत्यंत विशुध्द नमुना आहे. त्यात सौंदर्य सहजपणे निर्माण झाले असते म्हणून संगीताचा आपणावर तात्काळ परिणाम होतो. तो अनन्त परमात्मा शान्त व मर्यादित स्वरूपात बाहेर प्रकट होत असतो. ते संगीतच आहे. सान्त, साधे, प्रत्यक्षावगमन असे हे संगीत आहे. सायंकाळचे आकाश तेच तेच तारे पुनः पुन्हा उधळीत येते. त्या आकाशाला त्याचा कंटाळा नाही. आपणास बोबडे बोलता येते, याचाच आनंद वाटून बालक तेच ते बोबडे शब्द पुन्हा पुन्हा बोलते, आणि आपणही तेच शब्द तसेच उच्चारले तर बालक आनंदाने ऐकते. हे आकाश त्या बालकाप्रमाणे आहे. आषाढातील रात्र असावी. बाहेर अंधार गुडुप नि मुसळधार पाऊस असावा. पृथ्वी झोपलेली असते. रात्रीच्या निःस्तब्ध शान्तीवर पाऊस आपली एकावर एक पांघरुणे जणू घालीत असतो. अंधारात दूर दिसणारी अंधुक झाडे, पोहणार्याचे डोके दिसावे त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पाण्यात दिसणारी झाडेझुडपे, ओलसर तृणाचा व ओल्या पृथ्वीचा वास, दूरवर पसरलेला घरादारांना वेढून राहिलेला अंधार, त्यातून डोके वर काढणारा देवळाचा घुमट, सारे काही रात्रीच्या हृदयातून बाहेर पडणार्या संगीताच्या लहरींप्रमाणे वाटते. आकाशाला व्यापून राहणार्या पावसाच्या आवाजात, त्या नादब्रह्मात, या सभोवतालच्या सर्व नादलहरी, या संगीत ताना मिसळतात, विलीन होतात. म्हणून जे हृदयाचे खरे की आहेत, जे द्रष्टे आहेत, ते या विश्वाचे वर्णन संगीतरूपाने करतात. सर्वत्र दिसणार्या अनंत आकाराना ते चित्रकला म्हणणार नाहीत. निळया तमाच्या पार्श्वभूमीवर अनंत छटांचा चाललेला खेळ; त्याला ऋषी, ते द्रष्टे कवी चित्रकला नाही म्हणणार ! का बरे? चित्रकाराला कुंचला, रंगाची पेटी, पडदा - सारे हवे. पहिला कुंचला मारला, काही लक्षात येत नाही. संपूर्ण चित्राची कल्पना अजून किती तरी दूर. जेव्हा चित्र संपते, चित्रकार निघून जातो, तेव्हा ते चित्र एकाकी येथे उभे असते. कलावंताच्या हाताचे प्रेममय स्पर्श निघून गेलेले असतात.
परंतु गाणार्याचे सारे हृदयात आहे. त्या ताना, ते सूर, सारे हृदयातून येते, जीवनातून येते. बाहेरून मिळवलेली ती सामग्री नसते. कल्पना व तिचा उच्चार ही येथे बहीण-भावाप्रमाणे, एवढेच नव्हे तर कधी कधी एकरूप असतात. संगीतात हृदय तत्काळ प्रकट होते. बाह्य वस्तूचा अडथळा येथे येऊ शकत नाही.
कोठल्याही कलेप्रमाणे संगीतातही पूर्ण व्हायला थोडा अवधी लागतो. तरीही प्रत्येक पावलाबरोबर पूर्ण सौंदर्य प्रकट होत असते. संगीत प्रकट करण्याचे साधन जे शब्द; तेही तेथे भाररूप अडथळे वाटतात. कारण शब्दांचा अर्थ करण्यासाठी विचार करावा लागतो. संगीताला अर्थावर विसंबून राहावे लागत नाही. शब्द जे कधीही प्रकट करू शकणार नाहीत, ते संगीत बोलून दाखवत असते. शिवाय, संगीत व गवयी अविभक्त आहेत. गवयी गेला की त्याच्याबरोबर संगीत गेले. संगीत गाणार्याच्या जीवनाशी व आनंदाशी अमर संबंधाने सदैव बांधलेले आहे.
विश्वसंगीत अनंत काळापासून सुरू आहे. विश्वाच्या उद्गात्यापासून ते अलग नाही, क्षणभरही दूर नाही. परमेश्वराचा आनंद अनंत रूपे घेऊन प्रकट होत आहे. परमात्म्याच्या हृदयाचे कंप म्हणजेच आकाशातील शतरंग. या गाण्यातील प्रत्येक सुरात पूर्णता आहे. कोणताही सूर शेवटचा नसला तरी त्यात अनंतता भरलेली आहे. विश्वाच्या या मधुर संगीताचा अर्थ न कळला म्हणून काय झाले? तारांना बोटांचा स्पर्श होताच सर्व मधुरता, स्वरसंगीत प्रकट व्हावे तसेच हे नाही का? ही सौंदर्याची भाषा आहे. आलिंगनाची भाषा आहे. ही भाषा विश्वाच्या हृदयातून बाहेर पडते व सरळ आपल्या हृदयाला येऊन भिडते.
काल रात्री मी अंधारात एकटाच उभा होतो. सर्वत्र असीम निःस्तब्धता. आणि त्या विश्वकवीच मधुर गान मी ऐकले. आणि जेव्हा शय्येवर येऊन पडलो व डोळे मिटले, तेव्हा माझ्या निद्रेतही जीवनाचा नाच चालू असेल, व माझ्या शान्त शरीरातील गान विश्वसंगीताला साथ देईल, माझे हृदय नाचत राहील, नसानसांतील रक्त उसळत राहील, माझ्या शरीरातील कोट्यवधी प्राणमय परमाणू प्रभूचा स्पर्श होताच त्याच्या दिव्य वीणेतून निघणार्या सुरांबरोबर सूर लावतील, - हा विचार माझ्या मनात होता.