साधना 22
व्यक्तीचा प्रश्न
जीवनाच्या एका टोकाला मी चराचराशी, अणुरेणूंशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे मला विश्वव्यापी कायद्याची सत्ता मानवी लागते. माझ्या अस्तित्वाचा खोल असा पाया तेथेच घातला जातो. विश्वाने आपल्या विराट मिठीत मला धरून ठेवले आहे. सर्व वस्तूंशी सहकार्य करण्यात माझी पूर्णता आहे. त्यातच माझे सामर्थ्य आहे.
जीवनाच्या दुसर्या टोकाला सर्वांहून अलग, पृथक् असाही मी आहे. तेथे मी एकाकी एकटा असा उभा आहे. सर्वांपासून स्वतंत्र, अपूर्व, निस्तुल असा मी तेथे असतो. माझ्यासारखा मीच. या विश्वाचे सारे वजन माझ्यावर घातलेत तरी मी चिरडला जाणार नाही. मी तो मीच राहणार. माझे व्यक्तित्व मी उचलून धरीन.
माझे हे व्यक्तित्व लहान असले तरी ते महान् आहे. आपण इतरांपेक्षा विशिष्ट गुणधर्माने संपन्न आहोत, याचा या व्यक्तित्वाला अभिमान वाटत आहे. आपले विशिष्ट व्यक्तित्व नष्ट झाले तर आपण दिवाळखोर ठरू. जीवनाला मग अर्थ काय? जरी हे जीवन मग बाह्यतः जसेच्या तसे दिसले तरी निर्मितीचा आनंद तेथे कोठून असणार? आपले व्यक्तित्व नष्ट झाल्याने आपण निःसत्त्व होऊच, परंतु जगाचेही त्यामुळे नुकसान आहे. जग एका मोलवान वस्तूला त्यामुळे गमावून बसते. आपल्या या विशिष्ट व्यक्तित्वामुळेच आपण या विश्वाला अधिक यथार्थपणे आपलेसे करून घेतो. आमच्या विशिष्टत्वाला आपण पारखे होऊन पडून राहू, तर विश्वाला तरी आपण ओढून कसे घेऊ? जे विश्वात्मक आहे ते विशिष्टाच्या द्वाराच परमोच्च विकास करून घेत असते. आपणाला आपले व्यक्तित्व हिरावले जाऊ नये असे वाटत असते, याचे तरी कारण काय? आपणामधून प्रकट होणार्या त्या विश्वात्म्याचीच ती इच्छा असते. आपणामध्ये जो अनन्ताचा आनंद आहे, त्यामुळेच आपणास आनंद मिळत असतो.
आपल्या या वैशिष्ट्यासाठी मनुष्य मरायला तयार होतो. आपत्तींना तोंड देईल, चुका करील, धडपडेल. आपले व्यक्तित्व व्यक्तीला अत्यंत प्रिय असते. या चराचराहून आपण निराळे आहोत, विशिष्ट गुणधर्माने संपन्न आहोत, हे तरी व्यक्तीला कसे कळते? ज्ञानाचे फळ चाखल्यानेच ही जाणीव होत असते. आपल्या विशिष्टपणाच्या अहंकारानेच मानवाने जागत घोर कृत्ये केली आहेत; पाप, अनाचार माजवले आहेत. तरीही हे विशिष्टत्व टाकावे, असे त्याला वाटत नाही. आपले विशिष्टत्व गमावून सृष्टीच्या पोटात खुशाल घोरत पडण्यापेक्षा ही पापेही त्याला प्रिय वाटतात.
आपले स्वतंत्र व्यक्तित्व अबाधित राहावे, यासाठी मनुष्य अपार किंमत देतो. आणि ज्या मानाने कष्ट सोसू, मोल देऊ, त्या मानाने व्यक्तित्वालाही तेज चढत असते. व्यक्तित्वाची किंमत अजमावयाला तुम्ही किती कष्ट, संकटे सोसलीत, हे ज्याप्रमाणे बघायचे, त्याचप्रमाणे तुम्ही मिळवले काय इतके करून, तेही बघायला हवे. स्वतःचे व्यक्तित्व म्हणजे कष्ट व त्याग एवढेच असेल, लाभ काहीच नसेल तर आपणास आपल्या व्यक्तित्वाचे महत्त्व वाटणार नाही. त्यागाने काही मिळत नसेल तर आत्मनाश हेच मानवजातीचे परम ध्येय ठरायचे !
आपत्ती नि कष्ट भोगून काही परिपूर्णता प्राप्त होणार असेल तरच व्यक्तित्वाला अर्थ. ज्यांनी अनंत आपत्ती सोसून स्वतःच्या व्यक्तित्वाचा विकास करून घेतला, त्यांनी ही गोष्ट स्पष्ट करून दाखवली आहे. व्यक्तित्व मरू नये, त्याचा विकास व्हावा, म्हणून त्यांनी जबाबदार्या आनंदाने शिरावर घेतल्या व एक ब्रही न काढता हाल सोसले, अपार त्याग केले !
एकदा मला एकाने सभेमध्ये प्रश्न विचारला, “हिंदुस्थानात आत्मनाश, स्वतःला शून्य करणे, हेच नाही का ध्येय सांगितलेले?”