Get it on Google Play
Download on the App Store

साधना 38

कर्मरूपाने साक्षात्कार

नियमपालनाने आनंदप्राप्ती होते, हे ज्यांनी ओळखले तेच नियमांच्या पलीकडे जाऊ शकतात. त्यांना मग नियम उरत नाहीत, बंधने राहात नाहीत, असा याचा अर्थ नव्हे. तर ती बंधनेच त्यांना मोक्षरूप वाटतात. मुक्तात्मा बंधनांना झुगारू इच्छित नाही, उलट ती त्याला सहज वाटतात; ती त्याला उत्साहदायी, आनंददायी वाटतात.

खरे पाहू तर जेथे बंधने नाहीत तेथे आत्मा स्वतंत्रच राहू शकत नाही. तेथे आत्म्याची हत्या होत असते. मोहाचे आमंत्रण येऊन जीव व्रतच्युत होतो, आणि मग त्याला निराधार वाटते. मातेच्या हातून हिसकावून घेतलेले मूल जसे अगतिकपणे रडू लागते तसे जीवाचे होते. मग तो ओरडतो व म्हणतो, “हे पाप अनिर्बंध नि भीषण आहे. मला वाचवा. मला बंधनांनी बांधा आणि त्याच्याबरोबर आनंदाशीही बांधा.”

बंधन म्हणजे आनंदाच्या विरुध्द-हे मानणे जसे चुकीचे, त्याप्रमाणेच कर्म म्हणजे मुक्तीच्या आड येणारी वस्तू असे जे आपल्याकडे मानले जाते तेही चुकीचे. या लोकांना कर्म करणे म्हणजे खालच्या भूमिकेवर येणे, आत्म्याच्या स्वतंत्र वृत्तीला मर्यादा घालणे, आत्म्याचे पंख तोडणे असे वाटते. परंतु आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आनंद ज्याप्रमाणे बंधनातून निर्माण होतो त्याप्रमाणे मोक्षसुध्दा कर्मद्वारा सिध्द होत असतो. आनंदाला आनंदातच आन्तरिक समाधान नाही. त्या आनंदाला बाहेरच्या बंधनाची इच्छा होते. त्याचप्रमाणे आत्म्याला केवळ आन्तरिक स्वतंत्रतेत अर्थ वाटत नाही. त्याला बाह्य कर्माची अपेक्षा असते. जीवात्मा कर्म करूनच सकल कोशांपासून, आवरणापासून मुक्त होत असतो. घडी केलेले वस्त्र ज्याप्रमाणे मोकळे करावे त्याप्रमाणे हा गुंडाळलेला सुप्त आत्मा कर्मद्वारा महान् होतो, आपली विशालता, स्वतंत्रता अनुभवू शकतो. असे नसते तर जीवात्म्याला, काम करावे असे आपण होऊन कधीच वाटते ना.

अधिकाधिक कर्माने अधिकाधिक शक्ती प्रकट होते नि ती ध्येयाकडे नते. कर्मद्वारा मानवाचे वैशिष्ट्य प्रकट होते. तो स्वतःचा विकास अनुभवतो. इतरांपासून स्वतःच्या विशिष्ट गुणमर्धांनी उमटून पडतो नि शोभतो. त्याच्या जीवनाचा गंध दरवळतो नि सुख प्राप्त होते. स्वातंत्र्य, कोपर्‍यात एकलकोंडे पडून राहण्यात नाही. अंधारात एकटे पडून राहणे यासारखे भयानक बंधन दुसरे नाही. कळी फुलू पाहात असते. बीज अंकुरण्यासाठी धडपडते. सारे पापुद्रे फोडून साकार होऊ इच्छितात. आपल्या भावना प्रकट होण्यासाठी संधी बघत असतात. आपला जीवात्मा कोंडून घेऊ इच्छीत नसतो. नवनवीन कार्यक्षेत्रे तो शोधतो. त्याच्या शक्तीला अंत ना पार. मर्त्य जीवनाला आवश्यक अशा गोष्टीच तो करू बघतो असे नाही, तर इतर अनेक क्रियाकलापांत तो रंगतो. जीव हे सारे का करतो? त्याला मोक्ष हवा असतो. स्वतःच्या स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, अशी त्याला अदम्य इच्छा असते.

दलदली हटवून, रोगोत्पादक जंगले तोडून मनुष्य उपवने फुलवतो, मळे पिकवतो. कुरूपतेच्या तुरुंगात पडलेली सुंदरता, ओंगळपणाच्या कचाटयात सापडलेले लावण्य मनुष्य मुक्त करू बघतो. परंतु हे सौंदर्य आत्म्याचेच होय. बाहेर तो सौंदर्य न फुलवता तर त्याच्या आत्म्यालाही कृतार्थता न वाटती. अनिर्बंध समाजात व्यवस्था यावी म्हणून तो कायदे करतो. पदोपदी होणारा अविचाराचा अडथळा दूर करून जे सत् आहे त्याला वाव देतो. मनुष्य हे सारं करून स्वतःचा सद्भावच नाही का प्रकट करीत? बाहेरच्या या आविष्काराशिवाय आत मोक्षाचा आनंद कुठला? मनुष्य स्वतःची शक्ती, स्वतःचा सद्भाव सारखा बाहेर ओतीत आहे. आणि यात ज्या मानाने त्याला यश लाभावे, त्या मानानो आपण महान् होत आहोत, असा त्याला अनुभव येतो. उपनिषद् सांगते -