Get it on Google Play
Download on the App Store

साधना 36

म्हणून मी पुन्हा सांगतो की, मनुष्याबद्दल प्रेम असल्याशिवाय कोठली मानवता? तुमचे सामर्थ्य हे संस्कृतीचे माप नव्हे. मानवाच्या संस्थानी नि कायद्यांनी प्रेमवृत्तीचा किती विकास केला आहे, यावरून संस्कृती मापली जाते. तुम्ही मनुष्याला यंत्र समजता की तो दिव्यतेची मूर्ती मानता, हाच पहिला व शेवटचा प्रश्न आहे. ज्या ज्या वेळेस माणूस कठोर झाला, हृदयशून्य झाला, त्या त्या वेळेस संस्कृती नष्ट झाल्या. जेव्हा प्रबळ लोक दुर्बळांना दास करतात, जेव्हा माणसे किंवा त्यांचे प्रबळ संघ, मानवाच्या मोठेपणावर घाव घालतात, मानव्याची मुळेच तोडतात, स्वातंत्र्य, प्रीती आणि न्याय यांचे खून पाडतात, त्या वेळेस सार्‍या संस्कृती धुळीस मिळतात. आसुरीपणा कराल तर संस्कृती जगणार नाही. मनुष्य ज्यामुळे मनुष्य आहे - असे जे काही, त्याची वाढ प्रेमाने आणि न्यायानेच होईल. जसे माणसाचे तसेच या विश्वाचे. केवळ भोगाच्या, उपयुक्ततेच्या दृष्टीने जगाकडे नका बघू. विश्वाचे खरे स्वरूप अशाने कळणार नाही. जग तुमच्या गरजा भागवते, जगाचा उपयोग आहे, हे सारे खरे. परंतु जगाचा व आपला संबंध येथेच संपला नाही. जगाशी आपण अधिक खोल बंधनांनी संबध्द आहोत. आपणास जीवनाचे प्रेम वाटते, याचा तरी अर्थ काय? या विशाल जगाशी अधिक का संबंध राहावा, असाच नाही का अर्थ? हा संबंध प्रेमाचा आहे. अनंत तंतूंनी जगाशी आपण बांधलेले आहोत. या पृथ्वीपासून तार्‍यापर्यंत पसरलेल्या धाग्यांनी बांधलेले आहोत. सृष्टीपासून स्वतःला अलग करून तिच्यावर सत्ता गाजवायला जन्मलो आहोत असे मनुष्य मानतो. सृष्टीहून स्वतःला श्रेष्ठ मानतो. परंतु हा हास्यास्पद प्रकार आहे. सृष्टीला तो शत्रू मानता. परंतु जसजसे ज्ञान वाढत आहे तसतसा सृष्टीपासूनचा अलगपणा सिध्द करणे त्याला जड जात आहे. सृष्टीपासून स्वतःला निराळे समजण्यासाठी जे जे काल्पनिक मनोरे मनुष्य उभारतो ते पडू लागतात. मनुष्याच्या बुध्दीला तो अपमान वाटतो. परंतु याला उपाय काय? आत्मसाक्षात्काराच्या आड अहंकार आणाल नि ऐक्य मात्र बघाल, तर सत्याच्या प्रचंड चाकाखाली तुमचा अहंकार चुरडला गेल्याशिवाय राहणार नाही. सृष्टीपासून अलग राहून स्वतःला मोठे मानणे म्हणजे अर्थशून्य तुसडेपणा होय. आपण कोणी तरी मोठे, बाकी सार्‍या जगाने गुलामाप्रमाणे आपल्यासमोर सेवा करीत राहावे, हा विचार का स्पृहणीय? बाबा रे, सृष्टी तुझ्याहून हीन नाही. तुझ्यासारखीच ही सृष्टी, हे जग. एवढेच नव्हे तर तुम्ही उभयता एकरूप आहात. शास्त्रीय शोधाने हे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे. ही जी ऐक्यजाणीव, ती केवळ बुध्दिगम्य न राहता सर्वात्मकतेच्या रूपाने सतेज होईल, त्याच वेळेस ती आनंददायी व प्रेमरूप होईल. सृष्टीशी एकरूप होण्यातच अमरतेची निःशंक खूण. विभक्तपणा म्हणजे मरण. ज्या वेळेस आत्मा विश्वात्म्याशी मिळून जातो, तेव्हा कोठले मरण? ज्या वेळेस जीवनात विश्वात्म्याचे संगीत सुरू होते तेव्हा मुक्ती आली असे समजा. मग सृष्टीचा नि परमात्म्याचा जो प्रेमाचा खेळ चाललेला असतो त्यात आपणही सामील होतो. प्रेमाच्या विश्वव्यापी मेजवानीत सामील होऊन अमरतेच्या प्रसादाचे वाटेकरी होतो. जीवनातील सारे विरोध प्रेमात बुडून जातात. प्रेम हे एकच वेळी द्वैतमय व अद्वैतमय असते. असलेच पाहिजे. प्रेम हे चल आहे आणि स्थिरही आहे. प्रेम मिळेपर्यंत हृदय बदलत असते, अशान्त असते. शेवटी शान्त नि स्थिर होते. प्रेमामध्ये लाभालाभ एकत्र राहतात. प्रेमाच्या जमाखर्चात जमा व खर्च एकाच बाजूला. या सृष्टीच्या महान समारंभात तो परमात्मा प्रेम मिळावे म्हणून रोज देणग्या देत आहे. देणे व घेणे अविरोधीपणाने जेथे चालते तेथेच प्रेम आहे समजा.

प्रेमाच्या एका टोकाला अहं आहे, दुसर्‍या टोकाला निरहं आहे. अहंप्रत्ययाशिवाय प्रेम करायचे कसे? आणि पुन्हा अहं असेल तर प्रेम कसे होईल?