साधना 42
“भयादस्य अग्निस्तपति”
त्याच्या भयाने अग्नि तापतो, असे त्या सत्याचे एक वर्णन केले तर -
“आनंदात हि खलु
इमानि भूतानि जायन्ते ।”
असे आनंदस्वरूपी त्याचे दुसरे वर्णन आहे. नियम मानल्याशिवाय खरा आनंद नाही, खरी मुक्ती नाही. ब्रह्म हेही ऋत-सत्याच्या नियमांनी बांधलेले आहे, व आनंदरूपाने स्वतंत्र आहे. ब्रह्म सत्यरूप व आनंदरूप आहे. सत्य म्हणजे बंधन, नियम, मर्यादा. आनंद म्हणते स्वतंत्रता. सत्याशिवाय आनंद नाही, नियमाशिवाय खरे स्वातंत्र्य नाही.
सत्याचे नियम पाळू तेव्हाच स्वातंत्र्यातील खरा आनंद आपण चाखू शकू. वीणेला तारा बांधलेल्या असतात, म्हणून त्यांच्यातून संगीताचा आनंद स्रवतो. तारा शिथिल असतील तर कोठला संगीतानंद? संगीतरूपाने, ध्वनिरूपाने स्वतःच्या पलीकडे जाऊन ती तार स्वतःचे स्वातंत्र्य प्रत्येक सुरागणिक अनुभवीत असते. सतार खरी लागेपर्यंत, सुरेल सूर बाहेर पडू लागेपर्यंत तारा ताणायला हव्यात, पिरगळायला हव्यात.
तुमचे जीवन ढिले, बंधनहीन असेल तर तेथे ना संगीत, ना स्वातंत्र्य. कर्तव्याची तार घट्ट बांधाल तरच मुक्तीचा सोहळा अनुभवाल. कर्तव्य झुगारून देण्यात धर्म नसून, परमेश्वराचे जे विराट कर्मसंगीत सुरू आहे त्यात आपल्याही कर्तव्यकर्माचा सूर नीट मिळवणे यात धर्म आहे. ईश्वराच्या कर्मसंगीताशी आपला सूर कसा लावायचा?
“यत् यत् कर्म प्रकुर्वीत
तत् ब्रह्माणि समर्पयेत् ।”
हे आपले ध्येयवचन आहे. येथे गुरुकिल्ली आहे. सगळया कर्मांनी परब्रह्माची पूजा करायची आहे.
“मैं भक्तिभेट अपनी
तेरी शरणमें लाउँ”
प्रभु समर्पण बुध्दीने कर्म म्हणजे जीवाचे संगीत. ही जीवात्म्याची मुक्ती. आपले कर्म म्हणजे परमात्म्याला जोडणारा सेतू. मग अंतःकरणात आनंद भरून राहतो. वासनांची मग आठवणही होत नाही. दिवसेंदिवस अधिकाधिकच तो आत्मसमर्पण करू लागतो नि जीवनाचे देवाचे राज्य येते; आत्मारामाचे राज्य येते.
मानवजातीचा कर्मद्वाराच भव्योदात्त विकास होत आला आहे, होत राहील. कर्माला कोण तुच्छ मानील? या दिव्य आत्मसर्मपणाची कोण थट्टा करील? युगायुगातून वादळ असो वा सूर्यप्रकाश असो, संकटे असोत वा सुखे असोत, मानवजातीचे महान् मंदिर उभारले जाते आहे. परमेश्वराची भेट या मंदिरात घडणार का एखाद्या वैयक्तिक कोपर्यात?