साधना 46
मानवजातीच्या इतिहासाच्या कालखंडात त्या त्या विशिष्ट सौंदर्याची पूजा आपणास दिसते. त्या विशिष्ट सुंदरतेचाच अभिमान बळावतो. बाकीचे सौंदर्य तुच्छ वाटते व ती सुंदरताच नव्हे असे सांगतात. त्या त्या विशिष्ट सुंदरतेच्या उपासकाच्या मनात मग अहंकार, दंभ, अतिशयोक्ती हे दुर्गुण ठाण मांडतात. भारताच्या प्राचीन काळात ज्याप्रमाणे उदात्त सत्य दूर सारून ब्राह्मण रूढींच्या भीषण जंगलात गुरफटलेले दिसतात, आणि ते जंगलच भरमसाट वाढत गेलेले दिसते, त्याप्रमाणे सौंदर्याच्या प्रान्तातही उदात्ततेचा लोप होऊन रूढी निर्माण होतात. ठराविक साचात सौंदर्य जाऊन बसते.
परंतु सौंदर्याचाही मोक्षकाळ येतो. आणि हा काळ जेव्हा येतो तेव्हा वस्तू लहान असो वा महान् असो, तिच्यातील सौंदर्य नजरेत भरते; सौंदर्य अविरोधाने सर्वत्र भरून राहिले आहे असे दिसते. परंतु येथेही आपण अतिशयोक्ती मग करू लागतो. अमूकच वस्तू सुंदर काय म्हणून मानायची, असे म्हणून बंड करणारे, अत्यंत सामान्य वस्तूही किती सुंदर आहे, असे मग म्हणू लागतात. मारून मुटकून सामान्य वस्तूसही असामान्य करण्याच्या हट्टास आपण पेटतो. वास्तविक आपणास सर्वत्र मेळ घालायचा असतो. परंतु बंड पुकारल्यामुळे पुन्हा भेद निर्माण होतात. बंडाचा स्वभावच भेद निर्मिणे हा आहे. सौंदर्याचे रूढीविरुध्द होणारे जे बंड त्याची पूर्वचिन्हे दिसत आहेत; आपल्या सौंदर्य-क्षेत्रात सुंदर व कुरूप असे जे आपण भेद पाडतो ते आपली सौंदर्यदृष्टी अपूर्ण व संकुचित असते म्हणून पाडतो, ही गोष्ट आज मानवाला कळून आली आहे. मनुष्य स्वार्थरहित दृष्टक्षने जेव्हा वस्तूकडे बघायला शिकेल, इंद्रियांच्या अनिवार भोगेच्छांपासून झडझडून दूर होऊन जेव्हा मनुष्य प्रत्येक वस्तूकडे पाहील, त्या वेळेस फक्त त्याला चराचरात भरून राहिलेल्या सौंदर्याचे दर्शन होईल.
ज्या वेळेस सर्वत्र सौंदर्य आहे असे आपण म्हणतो, त्या वेळेस कुरूपता हा शब्दच भाषेतून दूर करायचा आपला उद्देश नसतो. ज्याप्रमाणे असत्य म्हणून काही नाहीच असेही आपण म्हणू शकत नाही. असत्य खात्रीने आहे; परंतु विश्वाच्या विशाल रचनेत नसून आपल्या जाणीवशक्तीत आहे जाणीवशक्तीचा अभाव म्हणजे असत्यता. असत्यता आहे त्याचप्रमाणे कुरूपताही आहे. आपण जीवनातील सौंदर्याला जेव्हा छिन्नभिन्न करतो, तेव्हा ही कुरूपता जन्मते. सत्याचे अपूर्ण व अंधुक दर्शन झाल्यामुळे जी कला आपण निर्माण करतो, तिच्यात कुरूपता उत्पन्न होते. सत्याच्या नियमास झुगारून काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण जीवन चालवू शकतो. सत्याचा नियम चराचरात सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे एकतानतेचा, मधुरतेचा, सुंदरतेचा नियम सृष्टीत आहे. सृष्टीत जो मेळ आहे, जी मधुरता आहे त्याचे नियम आपण झुगारतो तेव्हा कुरूपता जन्मते.
आपणात सत्य समजून घेण्याची जी शक्ती असते, तिच्या साह्याने सृष्टीतील नियम आपण जाणून घेतो. त्याचप्रमाणे सौंदर्य पाहण्याची जी आपणास शक्ती असते, तिच्या साहाय्याने सृष्टीतील मधुरता, मेळ आपण पाहू शकतो. सृष्टीतील नियम समजल्यामुळे सृष्ट वस्तूवर आपण सत्ता मिळवतो व बलवान होतो. आपल्या नैतिक सृष्टीचा कायदा समजून घेऊन जेव्हा आपण स्वतःवर सत्ता चालवतो, तेव्हा आपण स्वाधीन व स्वतंत्र होतो. त्याचप्रमाणे बाहेरच्या अनंत सृष्टीतील मधुरता, सुसंवाद यांना आपण ज्या मानाने पाहू, त्या मानाने सृष्टीतील आनंद आपणास चाखता येईल. आपल्या जीवनात हा आनंद अधिकाधिक येऊ लागला की कलेत सौंदर्य उत्पन्न करण्याची आपली दृष्टीही सुंदर नि विशाल होते.
आपल्या आत्म्याच्या ठिकाणी असलेली गोडी जेव्हा आपणास कळेल, तेव्हाच सृष्टीत भरून राहिलेला आनंद स्पष्टपणे आपणास समजेल. आपण प्रेमरूपाने, सद्भावरूपाने त्या अनंतासमोर सौंदर्यलहरी नाचवीत नेतो. आपल्या जीवनाचे हेच अंतिम साध्य. सौंदर्य सत्यरूप आहे, हे तत्त्व आपण विसरता कामा नये. सर्व जगाचा प्रेमरूपाने आपणास साक्षात्कार व्हायला हवा. कारण, प्रेम जगाला जन्म देते, प्रेम सांभाळते, आणि प्रेमच अखेर पदराखाली झाकूनही घेते. प्रेमाने उत्पत्ती, प्रेमाने स्थिती, प्रेमाने लय होतो. हृदय खुले करू, परमोमदार करू, तेव्हाच ते वस्तूच्या भाग्यात शिरू शकेल, व ब्रह्माचा निरपेक्ष सहज आनंद भरपूर सेवू शकेल.