साधना 21
खरे सामर्थ्य मिळवण्यासाठी विश्वव्यापी कायदे पाळले पाहिजेत. ते आपलेच आहेत, हेही ओळखले पाहिजे. सुखी व्हायचे असेल तर व्यक्तिगत इच्छेला विश्वात्मक इच्छेशी मिळवून घ्यावे लागेल. ती इच्छाही आपलीच आहे. ज्या वेळेस आपणामधील सान्त अंश अनन्ताशी मेळ घालतो, त्या वेळेस दुःखही सामर्थ्यदायक वाटते, आशीर्वादरूप वाटते. आपल्या आनंदाची खरी किंमत ओळखण्याचे ते एक माप आहे.
जीवनात मुख्य धडा शिकायचा तो हा की, जीवनात दुःख असले तरी त्यापासून मला मांगल्य निर्मिता येईल. दुःखाला आनंदमय करण्याची शक्ती आपल्यात आहे, हे शिकायचे आहे. दुःख सोसायला मुळीच तयार नाही, असा एकही मनुष्य आढळणार नाही. या हक्कामुळेच आपण मनुष्य आहोत. एकमेकांसाठी आपण दुःख सोसतो-आणि आनंदाने. एके दिवशी एक गरीब माता मला म्हणाली, “काही दिवस मोठा मुलगा एका श्रीमंत आप्ताकडे जाणार आहे.” परंतु ते सांगताना तिला दुःख होत होते. मुलाला दूर पाठवण्याने तिचा भार कमी नव्हता होत? होय, होत होता. परंतु तिच्या मातृहृदयाला मुलाचा भार उचलण्यातील दुःखच आनंदरूप होते. ते दुःख भोगण्याचा तिला हक्क होता. मुलावरील परमप्रेमाने तो तिला प्राप्त झाला होता. दगदग न पडणे म्हणजे मोक्ष नव्हे. दुःखालाच आनंदरूप करण्यात मुक्ती आहे. असे केव्हा करता येईल? व्यक्तिगत जीवन म्हणजेच सर्वस्व नव्हे, असे पक्के ओळखू तेव्हा. आपल्यामध्ये वास करणारा विश्वात्मा आपत्तीला, मरणाला जुमानीत नाही. दुःख म्हणजे आनंदाची दुसरी बाजू, असे जणू तो मानतो. तो विश्वात्मा आपणात आहे, या गोष्टीचा अनुभव आला म्हणजे सारी दुःखे शिवस्वरूप वाटतील. विपत्ती हीच अपूर्ण आणि मर्त्य मानवाची खरी संपत्ती. पूर्णाबरोबर आसन मांडून बसायला अपूर्णाला जर कोणी लायक बनवले असेल तर दुःखाने. या जीवनात जे जे मोलवान आहे ते मिळवायला खणखणीत किंमत द्यावी लागेल. शक्ती, ज्ञान, प्रेम काहीही मिळवायचे असो-त्यासाठी श्रम, कष्ट यांची किंमत मोजायला हवी. दुःखातूनच आनंद फुलतो, परिपूर्णता हसत वर येते. ज्या मनुष्याला दुःखाचा तिटकारा, त्याचा उध्दार नाही. तपाशिवाय तेज नाही. आगीत घालून घेतल्याशिवाय कळा नाही. स्वार्थासाठी दुःख भोगणे ते दुष्ट असते. ते मग पुढे सूड घेते. त्या माणसाला खोल दरीत ते लोटते. परंतु परिपूर्णतेचा ध्यास लागून जे दुःख आपण भोगतो ते तारक असते. ते दुःख अनन्ताच्या आसनासमोर तुम्हाला नेते. दुःख-देवतेच्या तोंडावर मग काळा बुरखा तुम्हांला दिसणार नाही, तर तेथे परमानंद फुललेला दिसेल.