साधना 48
अनन्ताचा साक्षात्कार
उपनिषद सांगते, “इह चेत् अवेदीत् अथ सत्यमस्ति ।” याच जन्मात परमेश्वराला समजून घ्याल तर जीवनाला अर्थ प्राप्त होईल. नाही तर “महती विनष्टिः ।” -मोठा नाश आहे. ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे काय? अनन्त वस्तूंतील एक वस्तू हा काही त्या अनन्त परमात्म्याचा अर्थ नव्हे. परमेश्वर ही काही अशी वस्तू नाही की, जी तुमच्या रोजच्या व्यवहारात, राजकारणात, व्यापारात स्पर्धाक्षेत्रात उपयोगी पडेल. तुमचे बागबगीचे, बंगले, महाल, गाड्याघोडे यांच्या यादीत घालण्यासारखी ही वस्तू नाही. बँकेत ठेवण्याची ही वस्तू नाही.
मनुष्य प्रभुप्राप्तीसाठी तळमळतो याचा अर्थ काय? ही का इस्टेटीत भर घालायची वस्तू आहे? नाही. खात्रीने नाही. संचयात सारखी भर घालणे ही एक नीरस गोष्ट आहे. ज्या वेळेस जीवाला शिवाच्या भेटीची ओढ लागते त्या वेळेस या सांसरिक मिळवामिळवीच खटाटोपातून तो कायमचा मुक्त होऊ इच्छितो. अनित्य पसार्यातील नित्य वस्तू, सकल रसातील तो परमोच्च रस, “नित्योऽनित्यानां रसानां रसतमः” त्याला तो मिळवू बघतो. उपनिषदे ब्रह्मसाक्षात्कार करून घ्या, असे जेव्हा सांगतात, तेव्हा नवीन काही मिळवायला नाही सांगत.
“ईशावास्यमिदं सर्वं
यत्किंच जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुज्जीथाः
मा गृधः कस्यस्विध्दनम् ॥
“या जगात जे जे आहे ते परमेश्वराने अन्तर्बाह्य व्यापले आहे. देवाने जे दिले त्याचा उपभोग घे. परंतु ते तुझे नाही. त्याचा लोभ नको धरू.”
जे जे आहे ते प्रभुव्याप्त आहे, हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, जे जे जवळ आहे ती त्याची देणगी म्हणून जेव्हा बघाल, त्याच वेळेस या सान्त जगातील अनन्त परमात्मा, अनित्य वस्तूंतील ते नित्य तत्त्व, या देणग्यात लपलेला ता अनन्त-दानी ओळखू शकाल. या विश्वातील या सकल वस्तू त्या एक सत्यमय प्रभूला प्रकटवीत असतात. आपणाजवळ ज्या लहानमोठया अनेक वस्तू असतात, त्यांच्यामुळे आपला त्या अनन्ताशी संबंध जोडला जातो, म्हणून त्यांना अर्थ; नाही तर या संभाराला काय किंमत?
इतर वस्तू वा व्यक्ती आपणास आढळतात, तसा परमात्मा नाही. येथे नसेल तर तो तेथे असेल, अशा प्रकारचे त्याचे स्वरूप नाही. प्रातःकालीन प्रकाश विकत घेण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. डोळे उघडताच तो समोर स्वागतार्थ उभा असतो. ब्रह्म सर्वत्र आहे, हे अनुभवण्यासाठी स्वतःला देऊन टाकण्याचाच काय तो अवकाश असतो. म्हणून बुध्ददेव निक्षून सांगत की, स्वार्थी संकुचित जीवनाच्या तुरुंगातून आधी मुक्त व्हा. या संकुचित जीवनाची जागा भरून काढणारे दुसरे विशाल नि आनंदप्रत जीवन मला मिळणार नसेल तर हा त्याग करण्यात काय अर्थ? स्वार्थ का सोडायचा? परमार्थ मिळावा म्हणून. महान् वस्तूची प्राप्ती व्हावी म्हणून.
ईश्वराची खरी पूजा म्हणजे त्याला रोज कणकण मिळवायचे अशी नसून, आपण स्वतःला रोज तिळतिळ देऊन टाकणे ही आहे. त्याच्या व आपल्या ऐक्याच्या आड जे कामक्रोधादी येतात ते दूर करणे, सद्भावसंपन्न होणे, प्रेममय होणे-म्हणजे प्रभूची पूजा.