साधना 18
जीवन खंडमय नसून अखंड आहे. हेतुशून्य नसून हेतुमय आहे, सतत पुढे जाणारे आहे, अशी दृष्टी म्हणजे नैतिक दृष्टी. ही दृष्टी आली म्हणजे आपला आत्मा अनंत काळाला व्यापून राहिला आहे असे समजते. मग स्वतःपुरते फक्त पाहणे म्हणजे चूक आहे, ही गोष्ट ध्यानात येते. आपल्या व्यक्तिगत जीवनाहून विशाल असे एक आपले जीवन आहे,-जे सर्वांशी संबध्द आहे, याची थोडीफार तरी जाणीव प्रत्येकाला असते. दुसर्यासाठी स्वतःचे सुख ज्याने भिरकावले नाही, असा एकही मनुष्य आढळणार नाही. मनुष्य हा केवळ अलग जीव नाही. त्याचे विश्वात्मक स्वरूप आहे. आपले हे व्यापक स्वरूप मनुष्य जेव्हा ओळखतो, तेव्हा तो मोठा होतो. सर्व सत्ता आपल्या हाती घेऊ पाहणार्या लोकांनाही या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. कारण त्यांना सामर्थ्य हवे असते. आणि सत्याची उपेक्षा करून त्यांचेही चालत नाही. सत्याची मदत मिळावी म्हणून स्वार्थालाही थोडेफार निःस्वार्थ व्हावे लागते. दरोडेखोरांच्या टोळीसही काही नीतिनियम पाळावे लागतात. ते सर्व जगाला लुटतील, परंतु परस्परास लुटणार नाहीत. अनैतिक हेतूच्या पूर्ततेसाठी त्यांनाही काही नैतिक शस्त्रे जवळ ठेवावी लागतात. पुष्कळ वेळा असे दिसते की, नैतिक शक्तीमुळेच वाईट करण्याची शक्ती मिळाली. नैतिक सामर्थ्याच्या जोरावरच आपण दुसर्यास लुबाडतो. गुलाम करतो ! पशूंच्या जीवनात नीती नाही. कारण वर्तमानकाळाच्या पलीकडे त्यांची दृष्टी नाही. मनुष्याचे जीवन अनैतिक असू शकते. परंतु अशा जीवनालाही नीतीचा आधार लागतो. जे अनैतिक आहे ते कमी नैतिक आहे, त्यातील नीती परिपूर्ण नाही, एवढाच अर्थ. जे असत्य असते तेही थोडया अंशी सत्य असते. तसे नसेल तर ते असत्यही उरणार नाही. काहीच न दिसणे म्हणजे अन्य असणे. परंतु चुकीचे दिसणे याचा अर्थ काहीच पाहिले नाही असा नव्हे, तर नीट पाहिले नाही, पूर्णतया पाहिले नाही. स्वार्थी मनुष्यालाही स्वार्थासाठी इतरांशी संबंध ठेवावे लागतात. त्यालाही काही मर्यादा पाळाव्या लागतात. स्वार्थी मनुष्य स्वतःसाठी का होईना कष्ट सोसतो, हाल काढतो, तोही दुःख भोगतो. परंतु जाणतो की, पुढे सुख येईल. जीवनात लहान दृष्टीला जी गोष्ट दुःखदायक वाटते, जे गमावले असे वाटते, ते अशा मनुष्यास कमावल्याप्रमाणे वाटते.
ध्येयासाठी जगणार्या मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. त्याला तात्पुरती सुखे क्षुद्र वाटू लागतात. सुख हे स्वतःपुरतेच असते. परंतु ज्याला आपण सत् असे म्हणतो, त्याचा संबंध सर्व मानवजातीच्या सर्वकालीन सुखांशी असतो. सत् असे जीवन जगणे म्हणजे सर्वांसाठी जगणे. सत् ची कल्पना डोळ्यांसमोर ठेवून आपण पाहू लागलो म्हणजे सुखदुःखांविषयीची आपली कल्पना, आपली दृष्टी पार बदलून जाते. मग सुखे फेकावीत, दुःखे-संकटे वरावी असे वाटू लागते. जीवनाला अधिक मोल आणून देणारा मृत्यूही स्पृहणीय वाटतो. मानवी जीवनाच्या विशाल दृष्टीने विचार करू लागल्यावर, सत् च्या दृष्टीने विचार करू लागले म्हणजे सुखदुःखाचा विचार शिवत नाही. हुतात्मे ही गोष्ट सिध्द करीत असतात. तुमच्या-आमच्या जीवनातही ही गोष्ट थोड्याफार प्रमाणात दिसून येतच असते. समुद्रातून एक घडा भरून नेला तर ओझे वाटते. परंतु सागरात बुड्या मारताना हजारो घागरी पाणी डोक्यावर असूनही त्याचे ओझे वाटत नाही ! ज्या वेळेस आपण स्वार्थाच्या भूमिकेवर उभे असतो, तेव्हा सुखदुःखांचा भरपूर बोजा आपणास वाटतो. परंतु नैतिक भूमिकेवर उभे राहताच तीच सुखदुःखे आपण सहज उचलतो. मग सुखाने हुरळून जात नाही, दुःखाने होरपळत नाही. ‘सुखदुःखे समे कृत्वा’ ही भावना होते. महापुरुष आपत्तीचे डोंगरही कसे सहन करतो, हे पाहून आपण कौतुक करतो. अपार छळ होत असतानाही तो क्षमामूर्ती राहतो. मानवी जीवनाचा मोठेपणा अशांच्या द्वारा कळून येतो.
अत्यंत सुंदर जीवन म्हणजे अनंत जीवनातच आपले यथार्थ जीवन आहे हे ओळखून वागणे होय. संपूर्ण जीवन पाहण्याची नैतिक दृष्टी आपणाजवळ हवी. भगवान बुध्द हीच विशाल नैतिक दृष्टी घ्या असे सांगतात. नैतिक शक्ती पराकाष्ठेची करायला सांगतात. क्षुद्र स्वार्थ नका पाहू, असे परोपरीने त्यांनी सांगितले. ख्रिस्ताच्या उपदेशाचे हेच सार. विश्वात्मक जीवन जेव्हा आपणास प्राप्त होईल, तेव्हाच सुखदुःखांच्या द्वंद्वातून आपण मुक्त होऊ. स्वार्थरहित हृदय अपार आनंदाने भरून येते. हा आनंद अनन्त प्रेमापासून जन्मलेला असतो. आणि ही स्थिती कर्मशून्यतेची नसते. प्रेम कर्मप्रवृत्त करते. तुमचे कर्म वाढते, उदात्त होते. तुमच्या कर्माचा हेतू अतःपर स्वार्थ हा नसून ‘लोककल्याण’ हा असतो. या विश्वातील अनंत कर्मांशी एकरूप होणे, सहकार्य करणे म्हणजे गीतेचा कर्मयोग. दुःखाच्या मगरमिठीतून कसे मुक्त व्हावे, याचा विचार बुध्ददेव सारखा करीत होते. चिंतन करता करता हे ज्ञान त्यांना मिळाले की, व्यक्ती स्वतःला समष्टीत जेव्हा मिसळते, त्या वेळेस दुःखापासून सुटका.