Get it on Google Play
Download on the App Store

साधना 24

धर्म शब्दाचा अर्थ फार खोल आहे. धर्म म्हणजे, वस्तूचे वा व्यक्तीचे अत्यंत अंतरंगातील स्वरूप. आपल्यामधून जो हेतू प्रकट व्हावयाचा आहे तो हे म्हणजे आपला धर्म. ज्या वेळेस अन्याय्य गोष्ट घडते, त्या वेळेस आपण म्हणतो अधर्म झाला. म्हणजेच आपले जे खरे स्वरूप तद्विरुध्द काही तरी घडले, असे आपणास वाटते.

हा धर्म म्हणजे आपणातील सत्य. हा धर्म अप्रकट असतो. तो प्रकट करायचा असतो. बीजांतून वृक्ष वर येणे हा त्या बीजाचा धर्म. अनंकुरित स्थितीत, कवचात पडून राहणे हा बीजाचा धर्म नव्हे. बीज फोडले तर  तेथे वृक्ष दिसणार नाही. त्याचे स्वरूप, त्याचा स्वधर्म तेथे दिसणार नाही, परंतु अडथळ्यांशी झगडत जेव्हा ते अंकुरू लागते, वाढते, तेव्हा त्याचे खरे स्वरूप प्रकट झाले असे आपण म्हणतो. मानवजातीच्या इतिहासात, आपणात काय आहे ते काहींनी दाखवले आहे. महात्म्यांच्या जीवनातून, महान् सत्य प्रकट झालेले आपण पाहिले आहे. त्यावरूनच आपण निश्चयपूर्वक म्हणू शकतो की, जी जीवने आपणास भिकार वाटतात ती तशीच राहणार नाहीत. त्यांचीही कवचे गळून पडतील व आतील सुंदरता प्रकट होईल. हे निष्फळ दिसणारे जीवनही फुलेल, फळेल, गगनाला भिडेल.

बीजाचा मोक्ष स्वतःचे विकसित स्वरूप मिळवण्यात आहे. बीजरूपाने राहणे म्हणजे कोंडवाड्यात पडणे. कवच फोडून बीज वाढते. ते कवच फोडणे म्हणजे का मरण? ज्या त्यागाने परिपूर्णता प्राप्त होते, विकास लाभतो, त्या त्यागाला मरण निर्वाण, शून्य असे म्हणता येणार नाही. बंधने फेकून ते मोक्ष मिळवणे होय.

परमोच्च मोक्षाचा अर्थ समजला की स्वतःच्या स्वधर्माचा, स्वतःच्या जीवनहेतूचाही बोध होतो. आरंभी सर्वांवर आपली सत्ता असणे, सारे सुखभोग मिळणे म्हणजे आपला मोक्ष, असे आपणास वाटते. परंतु खरे स्वातंत्र्य ते हे नव्हे, असे इतिहास सांगत आहे. ज्यांनी मोक्षधर्म प्रकट केला, त्यांनी त्यागाचा मार्ग घेतला. त्यागानेच मोक्ष-वैभव, असे त्यांनी सांगितले. हुतात्मे, महात्मे यांची महान् जीवने हाच अर्थ सांगत आहेत. मनुष्यात जो महान् अंश आहे तो विश्वाला मिठी मारू पाहतो. त्यासाठी तो सर्वस्वाचा त्याग करतो. सर्वस्वाचा होम करून सर्वस्व मिळवतो.

आपल्याला आपली दोन रूपे दिसत असतात : एक स्वतःचा बडेजाव मिरवणारे, स्वतःपुरते पाहणारे स्वरूप, आणि दुसरे स्वतःपलीकडे जाऊन फुलाप्रमाणे फुलत फुलत स्वतःतील महान् अर्थ प्रकट करणारे स्वरूप. पहिले स्वरूप स्वार्थावर, संचयावर उभे राहते, तर दुसरे त्यागावर उभे असते. दिवा जर तेल खर्च करणार नाही, तर दिवा सर्व पदार्थांपासून दूर राहील. दिवा जेव्हा पेटेल, तेव्हाच त्याच्या जीवनातील अर्थ प्रकट होईल. तो आसमंतातल्या वस्तुमात्राशी जोडला जाईल, आपली ज्योत पाजळत राहावी म्हणून तो तेलाचा साठा दिवा संपवून टाकतो.

या दिव्याप्रमाणे आपले स्वरूप आहे. संचय करू, स्वार्थी बनू, तर स्वतःमधील उदात्तता, सुंदरता प्रकट होणार नाही. आपण अंधारात राहू. आपल्या जीवनाच्या खर्‍या हेतूविरुध्द वागू. परंतु प्रकाश सापडताच तो उंच धरून पुढे जाऊ. सेवेने तो प्रकाश वाढवू. बुध्दांच्या निर्वाणाचा हा अर्थ. तेल खर्च कर असे त्यांनी दिव्याला सांगितले. बुध्दांनी सांगितलेला त्याग हेतुशून्य कसा असेल? उद्देशहीन त्याग तामस आहे. दिव्याने प्रकाशासाठी तेल खर्चायचे. स्वतःमधील सुप्त हेतू प्रकट व्हावा म्हणून तेलाला तिलांजली, तेलाचे हवन. यालाच मोक्ष म्हणतात.