साधना 17
मूल जेव्हा नव्याने चालू लागते तेव्हा शंभरदा पडते. परंतु एकदा उभे राहते. त्या मुलाचे लक्ष पडण्याकडे नसते. उभे राहताच ते टाळ्या वाजवते, नाचते. आपल्या जीवनाचे असेच आहे. दुःखे, आपत्ती आहेतच. परंतु त्यामुळे आपण दुर्बल आहोत असेच मनात समजाल तर साराच ग्रन्थ आटोपला. कार्यक्षेत्रातील काही विवक्षित गोष्टीवरच भर देऊन बसाल तर अपयशच दिसेल, दुःखेच दिसतील. परंतु जीवन तुम्हाला विशाल दृष्टी घ्यायला सांगत असते. म्हणजे मग पलीकडची पूर्णता दिसते, ध्येय दिसते. तिकडे जायची आशा उत्पन्न होते. श्रध्दा जागी होते. ही बंधने सद्यःकालीन आहेत. ही जातील. आपण अधिक शक्ती लावली पाहिजे. प्रबल इच्छाशक्ती घेऊन उभे राहिले पाहिजे, असे मग वाटते. श्रध्देसमोर संकटे टिकू शकत नाहीत. श्रध्दा अनंत क्षेत्र दाखवते. श्रध्दा म्हणजे नराचा नारायण होईल. जिवाशिवांचे ऐक्य होईल. तुझी स्वप्ने पुरी होतील.
अनन्ताकडे दृष्टी देताच सत्य दिसेल. संकुचित वर्तमानापुरते पाहाल तर सत्य सापडणार नाही. इंद्रियांमुळे शेकडो, हजारो संवेदना होतात. परंतु आपणाजवळ जे गोळा होते त्यातील काय ठेवावे, काय फेकावे, याचा आपण विचार करतो. व्यापकपणा असल्याशिवाय हा विचार येणार नाही. आपले जीवन अनन्ताकडे, पूर्णतेकडे जात आहे. सत्य आपणास जे दिसले, जे मिळाले, त्याच्या पलीकडे नेत असते. आणि शेवटी अ-सीमाजवळ नेऊन उभे करते. पापही उद्या पुण्याच्या रूपाने फुलेल. पाप सत्याशी, पूर्णतेशी तोंड देऊ शकणार नाही. अंधार प्रकाशाशी झुंजायला येईल तर स्वतःच प्रकाशरूप होईल. खरे म्हणजे माणसाचे वाइटाकडे फार लक्ष नसते. सतारीच्या तारातून भेसूरता निर्माण होऊ शकेल. परंतु ही सतार सुरेल संगीतासाठी आहे, या गोष्टीवर आपण लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपण परिपूर्ण होऊ शकू, अव्यंग होऊ शकू. या श्रध्देसमोर जगातील दुःखे, पापे, विरोध मावळतील. हे जीवन, हा संसार दुःखमयच, असे म्हणणारे असतात. परंतु काहीनी अशी एकांगी दृष्टी घेतली तर जीवन पुढे नेणारे आहे, आशा देणारे आहे. निराशावाद हे दौर्बल्य आहे. काहीच्या मनाची ती ठेवणच असते. त्यांना आनंदाने राहणे आवडतच नाही. सारे तुच्छ, निस्सार आहे असे म्हणण्यातच त्यांना आनंद वाटतो. हे जीवन वाईटच असते तर तसे सिध्द करायला तत्त्वज्ञान कशाला हवे? मी वाईट नाही. असे हे समोरचे जीवन सांगत आहे. या जीवनाला वाईट म्हणणे म्हणजे समोर जिवंत असणार्या माणसावर मढ्याचा आरोप करण्यासारखे आहे.
अपूर्णता पूर्णतेकडे जात असते. असत्याकडून सत्याकडे जायचे असते. ज्ञान म्हणजे काय? चुकांना काडी लागत असते आणि त्यातून ज्ञानाचा प्रकाश मिळतो. आपणाला अन्तर्बाह्य दुष्टतेशी झगडत पुढे जायचे आहे. जगण्यासाठी या शरीररूपी यंत्रात खाद्यरूपी इंधन घालावे लागते, त्याचप्रमाणे आपले नैतिक जीवन प्राणमय राहावे म्हणून तेथेही काही जळण लागते. जगातील कितीही वाईट गोष्टी तुम्ही दाखवल्यात तरी मानवजात अंधारातून प्रकाशाकडे जात आहे, अशी श्रध्दा आपल्या जीवनात खोल असते. कोणत्याही काळी नि कोणत्याही देशात मनुष्याने जर कशाला किंमत दिली असेल तर ती मांगल्याच्या ध्येयाला. मानवी जीवनात सद्भावाला चिरंजीव स्थान आहे. आपण त्यांचा आदर करतो, त्यांच्यावर प्रेम करतो-ज्यांनी आपल्या जीवनात मानवी मोठेपणा प्रकट केला.
सत् कशाला म्हणावे? नैतिक जीवन म्हणजे काय? मनुष्य ज्या वेळेस मोठी दृष्टी घेऊन बघतो, आपले स्वरूप आपण आज आहोत त्याहून निराळे आहे, ते सुंदर आहे, महान आहे असे जेव्हा त्याला वाटते, तेव्हा त्याने नैतिक जीवनाच्या अंगणात पाऊल टाकले असे होईल. कारण ज्या ध्येयाप्रत जाऊन पोचावयाचे असते, त्याची त्याला अशा वेळेस जाणीव होते. केव्हा एकदा ती धन्यतम स्थिती मिळवून येईन असे त्याला होते. ती परम दशा म्हणजे आपले खरे स्वरूप असे वाटून त्याच्या क्षणिक वासना मरतात. त्याची इच्छाशक्ती जागी होते, जीवनाकडे बघण्याची दृष्टीब दलते. ते ध्येयभूत जीवन व सद्य:कालीन जीवन याचा झगडा सुरू होतो. क्षणिक सुख व शाश्वत कल्याण यांतील फरक लक्षात येतो. आपल्या विशाल जीवनास पोषष ते सत् असे ठरते. जीवनाविषयीची अशी दृष्टी आली म्हणजे सर्व कर्मांत एक प्रकारची सुसंवादिता निर्माण होते. जीवनात मेळ येऊ लागतो. सर्व शक्तीने त्या दूर असणार्या ध्येयभूत जीवनाकडे तो निघतो. त्या दूरच्या सत्यमय भविष्यासाठी तो त्याग करतो. अशा रीतीने तो मोठा होत जातो, सत्य अनुभवू लागतो. जगात स्वार्थही नीट साधायचा असेल तर नीतिमय राहावे लागते; केवळ वासनांचे गुलाम होऊन भागत नाही.