सोराब नि रुस्तुम 11
रुक्षचा निरोप घेताना सोराबच्या डोळ्यांत पाणी आले. सोराब कोवळा तरुण होता. उदार व दिलदार होता. त्याचे मन अद्याप घट्ट नव्हते झाले. हृदय निष्ठुर नव्हते झाले. त्याचे उदार व उदात्त शौर्य होते. त्याच्या पराक्रमातही कोवळीक होती. शौर्यात दिलदारी होता.
तलवार, भाला, गदा, तोमर घेऊन सोराब निघाला. सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन निघाला. ढाल घेऊन निघाला. त्याच्या राजाने त्याला आशीर्वाद दिला. हजारो सैनिकांनी जयघोष केले. नगारा वाजू लागला. शिंगे वाजली. निघाला महावीर द्वंद्वयुद्धाला.
आणि तो पाहा प्रचंड रुस्तुम तिकडून येत आहे. तो पाहा त्याचा उग्र, भीषण राकट चेहरा. त्याच्या जीवनातील सारी कोमलता जणू सुकून गेली आहे. पुत्र नाही या भावनेमुळे त्याचे वात्सल्य जणू वाळून गेले आहे. निष्ठुर, कठोर रुस्तुम. इराणच्या राजाने त्याला निरोप दिला. इराणी सैन्याने प्रचंड जयघोष केला. वाद्ये वाजू लागली. रणवाद्ये.
दोघे समोरासमोर आले. एकमेकांनी एकमेकांस पाहिले. सोराबच्या चेह-यावर मृदू हास्य शोभत होते. उग्रता नव्हती. सोराबने आपल्या प्रतिस्पर्ध्यास मधुर वाणीने विचारले, ‘कोण आपण, आपले नाव काय?’
‘नाव गाव काय विचारतोस? का माझी मुलगी मागायची आहे? लग्नाला आलास की लढाईला? चल, तयार हो. चावटपणा बंद कर.’ आणि रुस्तुम धावून आला. सोराबही सरसावला. तलवारींची खणाखणी होत होती. ते आपापल्या ढालींवर वार झेलीत होते. एकमेकांना प्रहार करू पाहात होते. कंठस्नान घालू पाहात होते. हत्ती व हत्तीचा छावा यांचे जणू ते युद्ध होते. रुस्तुमची शक्ती इचाट होती; परंतु सोराब चपळ होता. विजेप्रमाणे तो चपळाई दाखवीत होता.
तलवारींची लढाई संपली. दोघांच्या तलवारी तुटल्या. आता रुस्तुमने गदा घेतली हातात. अगडबंब गदा. ती गदा होती की रुस्तुमने प्रचंड वृक्षच उपटून हाती घेतला होता? केवढी गदा! ती डोक्यावर पडली तर सोराब का वाचेल? आला. प्रचंडकाय रुस्तुम धावून आला.