पाखराची गोष्ट 3
खंडू घरी येताच ते पाखरू पिंज-यात नाचू लागे. गाऊ लागे. ते खंडूचे स्वागत करी व गोड वाणीने म्हणे, ‘ये हो खंडू. दमलास हो. बस हो जरा. मी तुला गाणे गाईन. मी गोड बोलेन. ये.’ खंडूला ते गोड शब्द ऐकून आनंद होई. तिकडे बायको बडबडत असली तरी खंडू तिकडे लक्ष देत नसे. पाखराची गोड वाणी ऐकण्यात तो तल्लीन होई.
खंडू आता आनंदी असे. त्याच्या आत्म्याला जणू प्रेमामृताचा चारा मिळाला. त्याच्या मनाला सहानुभूतीचे खाद्य मिळाले. भुकेलेला खंडू तृप्त झाला. बायको त्याला भाकर करून वाढी आणि ते पाखरू प्रेम देई. जगात न मिळणारे दुर्मिळ प्रेम.
एके दिवशी खंडू शेतात गेला; परंतु पाखराच्या पिंज-याचे दार उघडे राहिले. इकडे ती चंडी उठली. नवरा गेल्यावर ती गोड गोड करून खायची. आज तिने शिरा करण्याचे ठरविले. ताटात रवा काढला. साखर काढली. एका पातेलीत तूप घेतले. तिने सारी तयारी केली इतक्यात अंगणात कोणाची तरी गुरे आली म्हणून त्यांना हाकायला ती गेली. इकडे ते पाखरू पिंज-यातून खाली आले. स्वयंपाकघरात गेले. रव्यामध्ये चोच घालून रवा खाऊ लागले. साखरेत चोच मारून साखरेचे कण त्याने खाल्ले. ते पाखरू मेजवानीत रमले. इतक्यात चंडी आली. तिने ते पाहिले. तिला राग आला. ते पाखरू फडफड करून पिंज-याकडे जाऊ लागले; परंतु तिने ते पकडले. ते पाखरू धडपडत होते. केविलवाणे ओरडत होते.
‘घालशील पुन्हा चोच? घालशील? आणि त्याच्याजवळ गोड गोड बोलायला हवं नाही? मी पिंज-याजवळ आल्ये तर जीभ जशी झडते मेल्याची. खंड्याजवळ गोड गोड बोलतोस? थांब, तुझी जीभ कापून टाकत्ये. का निखारा ठेवू जिभेवर? नको. कापूनच टाकावी. मग बघत्ये कसा गोड बोलशील तो.
असे म्हणून तिने खरोखरच कात्री आणली आणि त्या पाखराची चोच उघडून तिने त्याची जीभ कटकन् कापली. तुकडा उडाला. पाखराने किंकाळी फोडली. ची ची केले. अरेरे!
त्या पाखराला त्या चंडीने आता सोडले. ते दीनवाणे पाखरू पिंज-यात जाऊन बसले. त्याला वेदना होत होत्या; परंतु कोणाला सांगणार, कशा सांगणार? त्याची वाणी गेली. त्या पाखराच्या डोळ्यांतून पाणी आले.
दुपारची वेळ झाली. खंडूच्या येण्याची ते पाखरू वाट पाहात होते. खंडू आला. कोवळी कणसे घेऊन आला. फुलांचे तुरे पिंज-यावर लावण्यासाठी घेऊन आला. खंडू पिंज-याजवळ गेला; परंतु पाखरू आज नाचेना, गोड गाणे म्हणेना. ‘ये हो खंडू. दमलास हो.’ असे म्हणेना. का बरे?