Get it on Google Play
Download on the App Store

पाखराची गोष्ट 7

खंडू ती सारी मौज पाहात होता; परंतु तेथे तो थांबला नाही. त्याचे लक्ष फुलांकडे नव्हते, झ-याकडे नव्हते. ते आपले पाखरू केव्हा कोठे भेटेल असे त्याला झाले होते.

ती पाहा वेळूची बने आली. कळकीची बने, उंचच उंच. जणू उंच वाढलेले रसहीन ऊसच. वारा त्या बनांतून खेळत होता. गोड आवाज येत होता. ते वेळू म्हणजे निसर्गाचे का वेणू होते?

‘येथेच असेल ते पाखरू,’ खंडू म्हणाला. तो चौफेर पाहात होता. तेथे एका शिलाखंडावर तो बसला. दुपार होत आली. पाखरे घरट्यात चालली. जरा विश्रांती घ्यायला, पिलांना घास द्यायला ती घरट्यात आली. झाडांवर मंजुळ किलबिल होत होती.

अरे, ते पाहा खंडूचे पाखरू. ते पाहा जात आहे. खंडूने शीळ वाजवली. टाळी वाजवली.

‘पाखरा ये ये. हा बघ खंडू आला आहे. दमलास का म्हण. ये.’ पाखराने ते शब्द ओळखले. ते पाखरू खंडूजवळ आले. ते नाचले. ते गाऊ लागले.

‘अरे, तुझी जीभ तुटली ना होती? गाणे कसे गातोस? आवाज कसा काढतोस?’ खंडूने विचारले.

‘माझी वाणी परत आली. इतकेच नव्हे, तर मला माणसांसारखे सारे बोलता येते. आकार पाखराचा, परंतु तुमच्यासारखे सारे बोलते. खंडू, तुला पाहून मला खूपच आनंद होत आहे. तू माझ्यावर प्रेम केलेस. आज माझ्या घरी तू आला आहेस. माझा पाहुणचार घे. त्या वेळूच्या बनात आमचे मोठे घरटे आहे. माझी मुलेबाळे तेथे आहेत. बायको तेथे आहे. त्या सर्वांना मी घेऊन येतो. तुझे दर्शन होईल त्यांना. तुझ्या कितीतरी गोष्टी त्यांना मी सांगत असतो. बस हो येथे. जाऊ नको.’

असे म्हणून ते पाखरू उडाले. ते आपल्या घरट्यात गेले. पिले चिव चिव करीत त्याच्याभोवती आली. बायकोने त्याचे स्वागत केले.

‘बाबा, बाबा, आज का उशीर केलात? आम्हाला भूक लागली.’ पिले म्हणाली.

‘खरेच, कोठे गेले होतेत आज लांब फिरत?’ बायकोने विचारले.

सोराब नि रुस्तुम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
वामन भटजींची गाय 1 वामन भटजींची गाय 2 वामन भटजींची गाय 3 वामन भटजींची गाय 4 वामन भटजींची गाय 5 वामन भटजींची गाय 6 वामन भटजींची गाय 7 वामन भटजींची गाय 8 वामन भटजींची गाय 9 पाखराची गोष्ट 1 पाखराची गोष्ट 2 पाखराची गोष्ट 3 पाखराची गोष्ट 4 पाखराची गोष्ट 5 पाखराची गोष्ट 6 पाखराची गोष्ट 7 पाखराची गोष्ट 8 पाखराची गोष्ट 9 पाखराची गोष्ट 10 पाखराची गोष्ट 11 पाखराची गोष्ट 12 पाखराची गोष्ट 13 उदारांचा राणा 1 उदारांचा राणा 2 उदारांचा राणा 3 उदारांचा राणा 4 उदारांचा राणा 5 उदारांचा राणा 6 उदारांचा राणा 7 उदारांचा राणा 8 उदारांचा राणा 9 उदारांचा राणा 10 उदारांचा राणा 11 उदारांचा राणा 12 उदारांचा राणा 13 उदारांचा राणा 14 उदारांचा राणा 15 उदारांचा राणा 16 सोराब नि रुस्तुम 1 सोराब नि रुस्तुम 2 सोराब नि रुस्तुम 3 सोराब नि रुस्तुम 4 सोराब नि रुस्तुम 5 सोराब नि रुस्तुम 6 सोराब नि रुस्तुम 7 सोराब नि रुस्तुम 8 सोराब नि रुस्तुम 9 सोराब नि रुस्तुम 10 सोराब नि रुस्तुम 11 सोराब नि रुस्तुम 12 सोराब नि रुस्तुम 13 सोराब नि रुस्तुम 14