पाखराची गोष्ट 6
‘पाखरा, जा हो आता. जा लांब उडून. येथे शेतावरही नको येऊस. एखादे वेळेस ती येईल. तुला मारील. लांब बनात जा. पूर्वेच्या बाजूला एक बन आहे. त्यात एक सदैव वाहणारा झरा आहे. बांबूची, कळकीची उंच बने आहेत. जा तेथे. सुखात राहा. तुझी मला आठवण आहे. मी तुला विसरणार नाही. माझ्या हृदयात तुझ्यासाठी घरटे आहे. त्या घरट्यात तुझी मनोमय मूर्ती सदैव राहील. मुकी गाणी ती गाईल हो. जा.’
पाखराला जणू ती वाणी समजली. ते उडाले. पुन्हा एकदा येऊन, खंडूसमोर जरा नाचून, त्याच्या डोक्यावर घिरट्या घालून ते गेले. खंडू पाहात होता. पूर्वेकडच्या बाजूला ते उडाले. ते दमले. एका झाडावर ते बसले. पिंज-यात बसून त्याच्या पंखांची शक्ती कमी झाली होती; परंतु ते पाहा पुन्हा उडाले. निळ्या निळ्या आकाशातून उडत चालले. खंडू पाहात होता. ते पाखरू दिसेनासे झाले. खंडू पुन्हा काम करू लागला.
काही दिवस गेले. काही महिने गेले. एके दिवशी खंडू शेतावर न जाता, पूर्वेकडच्या वनात वळला. ते पाखरू दृष्टीस पडावे, पुन्हा एकदा भेटावे म्हणून त्याचा जीव आसावला होता. ते पाखरू म्हणजे त्याच्या पंचप्राणातील जणू एक प्राण बनले होते.
तो चालला बनातून. झाडांकडे तो पाहात होता. पाखरांकडे तो पाहात होत; परंतु ते पाखरू त्याला कोठे दिसेना. खंडू निराश न होता चालला पुढे आणि तो खळखळ वाहणारा झरा आला. कसे स्वच्छ स्फटिकासारखे पाणी! जणू वनदेवता त्यात आपले तोंड पाही. वनदेवतेचा जणू तो आरसा. रानातील पशुपक्ष्यांचा जणू तो आरसा!
खंडू त्या झ-यातील पाणी प्यायला. त्याच्या काठाने तो पुढे चालला. तीरावर ओलाव्याने रानफुले फुलली होती. नाना रंगांची फुले. पांढरी, पिवळी, निळी, लाल, नाना छटांची, नाना आकारांची. काही चिवटीबावटीही होती आणि ती पाहा फुलपाखरे नाचत आहेत. या फुलावरून त्या फुलाकडे जात आहेत. ती फुलपाखरे फुलांचे संदेश पोचवीत होती. फुलांचे टपालवाले जणू. का ती फुलपाखरे म्हणजे छोटे पतंग होते? बिनदोरीचे पतंग; परंतु कोण उडवीत होते त्यांना?