पाखराची गोष्ट 13
‘हलकी नकाच आणू. जडच आणा. त्या जड पेटीसाठी तर मी आल्ये.’ चंडी म्हणाली.
‘बरे तर. जडच फक्त आणा. जा लवकर.’
पिलांनी ती जड पेटी आणली. चंडीने ती उचलली. नमस्कार वगैरे न करता, निरोप वगैरे न घेता लगबग ती निघाली.
‘या हां बाई.’ पाखरू म्हणाले.
‘या हां बाई.’ बायको म्हणाली.
‘या हां बाई.’ पिले म्हणाली.
‘अडलंय माझं खेटर, झालं माझं काम.’ असे चंडी म्हणाली.
धावपळ करीत ती घरी आली. खंडूने स्वयंपाक केला होता. तो वाट पाहात होता.
‘ही बघ आणली जड पेटी. आता बघत्ये उघडून आत काय काय आहे ते.’ चंडी म्हणाली.
‘आधी जेवू, मग फोड.’ खंडू म्हणाला.
‘आधी फोडीन. जेवण काय आहेच रोजचे.’
‘नको फोडू ती पेटी. माझे ऐक. ती पेटी तशीच ठेव. मला लक्षण बरे दिसत नाही.’ खंडूने सांगितले.
‘गप्प बस तू जा जेवायला. माझे पोट भरले आहे.’ असे म्हणून चंडी पेटी फोडू लागली.
तो काय निघाले आतून? काय होते आत? हिरे की माणके? पाचू की पोवळे? हे काय? चंडीने ती पेटी एकदम फेकली. आतून एकदम एक सर्प बाहेर आला. तो सर्प बाहेर पडून मोठा झाला. त्याने चंडीच्या अंगाला विळखे घातले. चंडीला त्याने दंश केले. चंडी मरून पडली. सर्प फूं करीत निघून गेला.
चंडी मेली. खंडू आता एकटा राहिला. त्याने घरातील मोती वगैरे गावातील राममंदिरातील मूर्तींना दिली. खंडू शेतात खपतो. आनंदात असतो. तो सर्वांना सांगत असतो, ‘अती लोभ करू नये. गोड बोलावे, प्रेम द्यावे. द्वेष कराल तर तुमच्या हातात माणिकमोती पडली तरी त्यांचे साप होतील. प्रेम कराल तर सापांचे हार बनतील. पाखरेसुद्धा मानवांवर प्रेम करतात. मानवांनी परस्परांवर करू नये का?’
कंटाळा आला म्हणजे खंडू त्या वेळूच्या बनात जातो. त्या पाखराला भेटतो. तेथे फळे खातो. गाणी ऐकतो. मग घरी येतो.
पुढे खंडू वारला; परंतु त्या वेळूच्या बनात गोड गाणी ऐकू येतात. त्या पाखराला मनुष्याची वाणी मिळाली तसे अमर जीवनही मिळाले होते का?