वामन भटजींची गाय 2
त्यांच्या अंगात कधी नसायचे. नेसूचा एक पंचा व खांद्यावर एक लहानसा फडका. मात्र तपकिरीची डबी कनवटीस नेहमी असायची आणि त्यांना कोणी भेटला तर तपकिरीसाठी त्यांचा हात सहज पुढे व्हावयाचा.
ते एकटे होते; परंतु एकट्याला काय नको? दिवसेंदिवस वेदविद्येला मानही कमी होत चाललेला. उद्या म्हातारपणी काही आधार नको का? थोडी पुंजी नको का? मग काय करावे? वामनभटजींनी भाड्यासाठी एक बैलगाडी करण्याचे ठरविले. सुंदर गाडी त्यांनी विकत घेतली. सुंदर, रुंद खांद्यांचे, आखूड शिंगी, एकरंगी बैल त्यांनी विकत घेतले. गाडी तयार झाली. वामनभटजी गाडीवान झाले.
बैलांची ते किती काळजी घ्यायचे! बैलांच्या अंगावर सुंदर झुली होत्या. वामनभटजींचा नेसूचा पंचा फाटका असेल, खांद्यावरचा फडका जीर्ण झाला असेल, परंतु त्या झुली नीट असत आणि बैलांच्या कपाळावर गोंडे बांधलेले. त्या शुभ्रवर्ण बैलांच्या कपाळावर निळ्या रंगाचे ते गोंडे किती खुलून दिसत आणि गळ्यात घणघण वाजणा-या घंटा, शिवाय पितळी साखळ्या. ते बैल पाहताच पाहणा-याच्या डोळ्यांचे पारणे फिटे. असे बैल आपण कोठे पाहिले नाहीत असे सारे म्हणत.
वामनभटजी बैलांना कधी चाबूक मारायचे नाहीत की शिमटी लावायचे नाहीत. एकदा त्यांची व दुस-या एका गाडीवानाची पैज लागली होती. बैलाला काठी न लावता, चाबूक न मारता आधी कोण जाऊन पोचतो! आणि वामनभटजी एक तास आधी जाऊन पोचले होते. त्यांनी नुसते शब्दाने खुणावले, आवाज करून इशारत दिली, तरी बैलांना कळे.
मधूनमधून आपल्या बैलांना ते कढत पाण्याने आंघोळी घालायचे. कोठे खरचटलेले असले तर त्यावर तेल लावायचे. किती प्रेमाने ते बैलांना स्नान घालीत! त्या वेळेस अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा करणारा श्रीकृष्णच आपण पाहात आहोत की काय असे वाटे आणि बैलांच्या अंगावर तांब्याने पाणी घालताना मुखाने मंगल वेदघोष सुरू असावयाचा. मोठे प्रसन्न, पावन असे ते दृश्य असे.