वामन भटजींची गाय 8
वामनभटजींचे काम संपले आणि ते आपल्या गावी परत यायला निघाले. एके गावी मोटारीने येऊन तेथून ते आपल्या गावी परत यायला निघाले. वेद म्हणत येत होते. सावळीची आठवण काढीत येत होते. आला गाव. गावाच्या हद्दीत ते शिरले. तो लोक रस्त्यातून भेटू लागले.
‘सावळी कशी आहे हो माझी?’ ते विचारीत.
‘मेली नाही अजून. तुमच्यासाठी जीव धरून आहे.’ श्रीधरपंत म्हणाले.
‘म्हणजे?’ त्यांनी धक्का बसून विचारले.
‘अहो, एक थेंबभर दूध देत नाही. पिलंभटजी काय फुकट खायला घालील? हात लावावा कासेस तर फाडफाड लाथा मारते. तुम्ही उगाच फुशारकी मिरवीत असा. पाच शेर दूध देते नि अशी आहे नि तशी. माझी कामधेनू आहे सा-या गप्पा. तरी आम्हाला वाटतच होते.’
‘अहो, खरंच ती कामधेनू आहे. तुम्ही पाहाल. ती लोटाभर दूध देईल.’ वामनभटजी म्हणाले.
वामनभटजींभोवती लोक गोळा झाले. घरी सामान ठेवून हातपाय धुवून वामनभटजी पिलंभटजींकडे आले. एकदम गाईजवळ गेले. गाय हंबरली. वामनभटजींनी तिच्या अंगावरून हात फिरविली. त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. तिच्याही आले.
‘सावळ्ये आलो हो मी.’ ते म्हणाले.
सावळी हंबरली. तिने त्यांचे अंग चाटले.
‘दाखवा ना दूध काढून वामनभटजी.’ जमलेले लोक म्हणाले.
‘अहो, ती भाकड कसले दूध देणार?’ पिलंभटजी म्हणाले.
‘परंतु ता वामनभटजींची कामधेनू आहे. बघू या कामधेनूचा महिमा पिलंभटजी, आणा तुमचा पाच शेरांचा लोटा. वामनभटजी सरसावा पुढे. नाही तर पैज हरलो म्हणा.’ लोक टिंगल करीत म्हणाले.
‘आणा लोटा.’ वामनभटजी म्हणाले.
सारे खो खो हसले. आणखी गर्दी जमली. लहान मुलेमुलीही आली. आयाबायाही जमल्या. सर्वांचे डोळे लागले आणि पिलंभटजी भांडे घेऊन आले. वामनभटजींना सावळीच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरविला.
‘सावळ्ये, मी भुकेलेला आहे. मला पोटभर दूध पाज. दोन महिन्यांचा मी उपाशी आहे हो.’ असे म्हणून ते दूध काढण्यासाठी बसले. कासेला त्यांनी हात लावला. कास भरून आली. जणू चार समुद्रच चार आचळांत येऊन उभे राहिले.