पाखराची गोष्ट 2
ती तोफ एकदा सुरू झाली म्हणजे खंडू घाबरे. मुकाट्याने भाकर खाई व उठून जाई. मग जरा ओसरीत तो घोंगड्यावर अंग टाकी. तो ती हिडिंबा लगेच गर्जत येई.
‘पडलेत काय पालथे? जा की शेतात. आळशी आहे मेला. खातो व लोळतो. शेतकरी का असा दिवसा झोपतो? उठा, जा.’
खंडू आता घरी फार बसत नसे. बहुतेक त्याचा वेळ आता शेतातच जाई. दमला तर तेथेच झाडाखाली पडे. त्या दाट छायेच्या एका झाडाखाली उशाला धोंडा घेऊन तो पडे. झाडावर पाखरे गोड गाणी गात असत. ती मधुर किलबिल ऐकून खंडूला आनंद होई. तो मनात म्हणे, ‘पाखरे इतके गोड बोलतात. माणसे का बरे गोड बोलत नाहीत? माझी बायको का बरे गोड बोलत नाही? आणि शेजारीही माझा उपहासच का करतात?’
एक नवीनच पक्षी एकदा त्याला दिसला आणि पुढे रोज त्याच्यासमेर तो पक्षी येऊन बसे. नाचे. गोड शब्द करी. खंडूला आनंद देण्यासाठी का ते सुंदर पाखरू येत असे?
एके दिवशी खंडू त्या पाखराजवळ गेला, तो काय आश्चर्य? ते पाखरू पळालं नाही, भ्यायल नाही. खंडूने त्या पाखराला धरले. त्याने ते पाखरू घरी आणले. एका सुंदर पिंज-यात त्याने ते ठेवले.
खंडू आता त्या पाखरावर जीव की प्राण प्रेम करी. त्याला ताजी फळे घाली. त्याच्या पिंज-यावर हिरवे पल्लव बांधी, फुले बांधी. मोठ्या पहाटे उठून त्या पाखराला तो बोलायला शिकवी.
‘ये हो खंडू. दमलास हो. भागलास हो. बस जरा. मी गाणी गातो. तू आनंदी राहा. मी तुला रिझवीन. मी तुझ्याजवळ गोड बोलेन. मी तुला प्रेम देईन. ये हो खंडू.’
असे त्या पाखराला तो बोलायला शिकवी. त्याची ती कजाग बायको त्या वेळेस झोपलेली असे. बायको जागी झाली की, खंडू शेतावर निघून जाई; परंतु शेतावर गेला तरी त्याला त्या पाखराची आठवण येई. डोक्यावर सूर्य आला की, खंडू आता घरी येई. येताना त्या पाखराला ताजी कोवळी कणसे आणी. रानमेवा आणी.