पाखराची गोष्ट 11
‘आहे काय त्या पेटीत? असतील किडेबिडे. रद्दी पेटी. गवताची पेटी.’
‘परंतु उघडून तर बघ, थांब मीच उघडतो.’ असे म्हणून त्याने ती पेटी उघडली. तो आतून मोत्यांचे सर निघाले. सुंदर पाणीदार गोलबंद मोती! पृथ्वीमोलाची मोती. टपोरी मोती.
‘आहाहा, किती रमणीय ही मोती.’ खंडू म्हणाला. चंडी ती मोती मोजीत बसली.
‘चांगली आहेत की नाही? आकाशातील जणू तारे तशी ही आहेत.’ खंडू म्हणाला.
‘परंतु ती जड पेटी का नाही आणलीत? हलकी आणलीत. खंड्या तुला अक्कल नाही. अगदी दगडू शेट आहेस. जा, ती जड पेटी घेऊन ये.’
‘मी जाणार नाही.’
‘तू नसशील जाणार तर मी जात्ये. तू घरी स्वयंपाक कर. भाकरी भाज. मी उद्या सकाळी उठून जाईन. मला रस्ता सांग. जाईनच मी. जाणारच. जड पेटी घेऊन येईन. तीत हिरे असतील. सांग रस्ता.’
खंडूने तिला रस्ता सांगितला. दुसरा दिवस केव्हा उजाडतो असे तिला झाले. एकदाची रात्र संपली. बाहेर झुंजूमुंजू होते तोच चंडी निघाली. घरी खंडू होता. आज चुलीजवळ भातभाकरी तो करणार होता. उगीच गेली चंडी. हे बरे नाही, असे त्याला राहून राहून वाटत होते.
चंडी गेली. हिंडत हिंडत दूर आली. ते बन लागले. त्या बनात ती शिरली. ते वेळूचे बन कोठे आहे? तो खळखळ वाहणारा झरा कोठे आहे? रस्ता चुकले की काय? नाही. तो पाहा आला झरा. गाणे गाणारा झरा. सतत वाहणारा, निर्मळ पाण्याचा झरा. चंडी झ-याचे पाणी प्यायली. तेथे एका दगडावर बसली.
आता दुपार झाली. पाखरे विश्रांतीला झाडांवर येऊन बसली. वेळूचे बन गजबजले. ते पाहा आपले पाखरू येत आहे. त्याने चंडीला पाहिले. पाखरू चंडीकडे आले.