सोराब नि रुस्तुम 7
‘होय महाराज. चांगली आहे युक्ती.’
आणि त्याप्रमाणे ठरले. इराणच्या राजावर स्वारी करण्याचे निश्चित झाले. फौजा तयार झाल्या. तलवारी खणखणू लागल्या. भाले सरसावले. तंबू, डेरे, राहुट्या सारे सामान निघाले. मोठ्या ईर्षेने ते प्रचंड सैन्य इराणच्या हद्दीकडे निघाले.
इराणच्या राजाला ही गोष्ट कळली. त्यानेही कूच करण्याचे नगारे केले. फौजा सिद्ध झाल्या. मारणमरणाची लढाई करण्यास वीर निघाले. ढाली सरसावल्या. भाले चमकले. देशासाठी लढाई होती. प्रत्येकजण घराबाहेर पडला.
दोन्ही फौजांचे समोरासमोर तळ पडले. एका बाजूला नदी पाहात होती. दोन्ही फौजांच्या मध्ये प्रचंड वाळवंट होते. जिकडेतिकडे डेरे, तंबू, राहुट्या, पाले दिसत होती. घोडे खिंकाळत होते. उंट दिसत होते. वीर केव्हा युद्ध सुरू होते याची वाट पाहात होते. तलवारी रक्तासाठी तहानलेल्या होत्या. भाले घुसण्यासाठी शिवशिवले होते.
कोणीच आधी हल्ला करीना. असे किती दिवस चालणार? शेवटी आक्रमण करून येणा-या राजाने एक जासूद पाठविला. त्याच्या बरोबर एक पत्र होते. काय होते त्या पत्रात? त्या पत्रात द्वंद्वयुद्धाची मागणी होती. आमच्याकडील वीर तयार आहे असे त्यात लिहिलेले होते. पत्र देऊन जासूद परतला. इराणच्या राजाने बैठक बोलावली. विचार होऊ लागला.
‘लाखो लोक मरण्यापेक्षा द्वंद्वयुद्धाने निकाल लागावा हे बरे नाही का?’ राजाने विचारले.
‘परंतु आपल्याकडे असा अद्वितीय योद्धा आज कोण आहे? रुस्तुम होता परंतु तो कोठे गेला त्याचा पत्ता नाही. वीस वर्षे होऊन गेली. तो असता तर अब्रू सांभाळता. शत्रूकडे सोराब म्हणून एक अद्वितीय योद्धा आहे. नवजवान आहे. तोच येणार द्वंद्वयुद्धाला. त्याच्याशी कोण भिडेल? एका सोराबच्या जोरावर शत्रू लढाई जिंकू पाहात आहे. आपण शत्रूची ही योजना पसंत करू नये.’ सेनापती म्हणाला.