उदारांचा राणा 14
पित्याला वाटले, असेलही चमत्कार. तो निघाला. ते सावकारही निघाले. कितीतरी दिवस ते जात होते. वाटेत एक साधू भेटला त्यांना.
‘साधूमहाराज, कोठे जाता?’ पित्याने विचारले.
‘आम्ही विश्वसंचारी. जगभर हिंडतो.’
‘तुम्ही दगडाचे सोने झालेले पाहिले आहे?’
‘जगात नाना चमत्कार आहेत आणि ज्याच्यावर देवाची कृपा त्याला काय कमी? तुम्ही थोडे दिलेत तर देव अपार देतो. तुला एक गोष्ट सांगू? ऐक.
एकदा एक भिकारी भीक मागत जात होता. काखेला त्याची झोळी होती. इतक्यात शंखांचे आवाज, दुंदुभींचे आवाज कानी आले. कोण येत होते? राजाधिराज येत होते. चराचरांचा स्वामी सोन्याच्या रथात बसून येत होता. हिरेमाणके उधळीत येत होता. दरिद्री, भिकारी लोक वेचीत होते. जगाचे दैन्य दूर करीत राजाधिराज येत होता. आमचा भिकारी वाट पाहात होता. ‘राजाधिराजाचा रथ आपल्याजवळ येईल व तो माणिकमोती उधळील. ती आपण वेचू. जन्माची ददात जाईल,’ असे तो मनात म्हणत होता आणि तो रथ धडधड करीत आला. रथाला चन्द्रसूर्याची जणू चाके होती. वा-याचे जणू वारू होते. दिव्य रथ. भिकारी थरथरत उभा होता. आशेने उभा होता; परंतु तो राजाधिराजच रथातून खाली उतरला. तो त्या भिका-याजवळ गेला व म्हणाला, ‘मला भीक घाल? दे तुझ्या झोळीतील काही तरी.’ भिकारी लाजला, शरमला. ही काय थट्टा, असे त्याला वाटले. अशा ब्रह्मांडाधिपतीने माझ्यासमोर का हात पसरावा? परंतु त्याने हात पसरला आहे खरा. देऊ दे काही. असे मनात म्हणत त्या भिका-याने झोळीत हात घातला. त्याने झाळीतील एक अत्यंत लहानसा बारीकसा दाणा काढून त्या राजाधिराजाच्या हातावर ठेवला. राजाधिराज हसला. रथात बसून निघून गेला. तो भिकारी निराश झाला. माणिकमोत्यांची वृष्टी नाही. दुर्दैवी आपण. असे म्हणत तो आपल्या घरी आला. त्याने भिक्षेचे धान्य जमिनीवर ओतले, तो त्या धान्यात एक सोन्याचा दाणा चमकला! भिकारी चकीत झाला. ‘मी एक दाणा दिला, म्हणून त्याने हा सोन्याचा मला दिला. अरेरे, मी त्याला सारे धान्य दिले असते तर?’ असे त्या भिका-याला वाटले. संपली गोष्ट. छान आहे की नाही? जे काही थोडेफार देवाला तुम्ही द्याल, या दु:खी दुनियेला द्याल, ते अनंतपट होऊन तुम्हाला परत मिळेल. अहो, पेरलेला एक दाणा हजार दाण्यांचे कणीस नाही का घेऊन येत?’