वामन भटजींची गाय 1
कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण म्हणते ते मंत्र? तेथे भूत तर नाही ना राहत? कोणी ब्रह्मसमंध तर नाही ना? कोण आहे त्या घरात?
त्या घरात वेदमूर्ती वामनभटजी राहातात. विद्वान आहेत हो. दशग्रंथी आहेत. वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ. सारा ऋग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे. वेद म्हणजे त्यांची करमणूक, त्यांचा आनंद. शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटांतील गोड गाणी असतात. वामनभटजींच्या तोंडी वेदमंत्र असत.
वामनभटजींचे वडील बंधू मोठे शास्त्री होते. भावाजवळच वामनभटजी बरेचसे शिकले. मधुकरी मागून शिकले. वडील भाऊ जरा तामसी व संकुचित वृत्तीचे होते. वामन भटजींस लहानपणापासून प्रेमाचा ओलावा मिळाला नाही. मोठ्या कष्टाने वेदविद्या त्यांनी संपादन केली.
त्यांनी आता स्वतंत्र व्हायचे ठरविले. त्यांचे लग्न झाले होते की नाही, माहीत नाही. कोणी म्हणतात, झाले होते; परंतु वामनभटजींची पत्नी कोणी कधी पाहिली नाही. आज तीस वर्षे त्या गावात ते आहेत; परंतु ते एकटेच आहेत.
तो पालगड गाव ब्राह्मणवस्तीचा होता. शेसवाशे ब्राह्मणांची घरे. तेथे वामनभटजींचे बरे चाले; परंतु त्यांचा वेळ कसा जावयाचा? वेद शिकविण्याची त्यांनी शाळा काढली. काही मुले त्यांच्याकडे सकाळी शिकायला येत. दुपारी शिकायला येत; परंतु ही मुले त्यांना भीत. ते त्या मुलांवर एकदम घसरा घालायचे. कधी कधी त्यांना बेदम मारायचेही! ते शिकवीत छान; परंतु जर का तब्बेत गेली, तर मात्र जमदग्नीचा अवतार; परंतु एखादे वेळेस त्या मुलांनाही प्रेमाने जवळ घ्यायचे, त्यांना खाऊ द्यायचे. त्यांच्या घरची प्रेमाने चौकशी करायचे. काही भाजी घरी असली, त्यांना कोणी दिली असली व जास्त असली तर मुलांना म्हणायचे, ‘जा रे घरी घेऊन, आईला द्या.’