उदारांचा राणा 15
‘साधूमहाराज, सुंदर सांगितलीत गोष्ट.’ जयंता म्हणाला. तो साधू निघून गेला. जयंता, त्याचे वडील व ते सावकार जाता जाता एकदाचे समुद्रकाठी आले. तो अपरंपार समुद्र उचंबळत होता. जणू जयंताला हृदयाशी धरण्यासाठी हजारो हातांनी पुढे येत होता.
‘बाबा, चला आता समुद्रात. चला माझ्याबरोबर. सावकारांनो, चला माझ्याबरोबर. घाबरू नका. भिऊ नका. मी बरोबर आहे. भीती नाही. छातीइतके फार तर पाणी होईल. चला, मोत्यापावळ्यांच्या राशी तुम्हाला देतो. हिरेमाणकांच्या खाणी दाखवतो. चला.’ असे म्हणून जयंता समुद्रास प्रणाम करून पाण्यात शिरला. तो बापाला व सावकारांना बोलावीत होता. हळुहळू तेही शिरले पाण्यात. घो घो लाटा वाजत होत्या. सो सो वारा वाहत होता. चालले सारे पाण्यातून. कमरेइतकेच पाणी. चालले पुढे. तो दूर प्रभा दिसली. समुद्राचे पाणी हिरवे निळे दिसत होते. कोठे लाल छटा होती. सुंदर देखावा, अपूर्व देखावा.
ते सारे त्या विशिष्ट जागेपाशी आले. तेथे मोत्यांच्या वेली होत्या. मोत्यांचे घड लोंबत होते. किती रमणीय व कमनीय ती मोत्ये! आणि त्या पाहा पोवळ्यांच्या वेली, गुलाबी नयनमनोहर पोवळी आणि पलीकडे ते इंद्रनील मणी आणि या बाजूला पाचू. शेकडो छटा आसपास प्रतिबिंबित होत होत्या. त्या सर्वांचे डोळे दिपले. ती संपत्ती पाहून जयंताचा पिता व ते सावकारही चकित झाले.
‘बाबा, घ्या तुमचे पैसे. जितके पैसे मी देणे असेनन तितक्यांची घ्या संपत्ती. घ्या मोती-पोवळी, घ्या हिरे-माणके. सावकारांनो, बघता काय? लुटा संपत्ती. कोणी बोलणार नाही. घ्या.’ जयंता सांगत होता.