वामन भटजींची गाय 5
‘तुम्ही बैलांची सेवा केलीत, आता बैलांच्या आईची करा. गोमातेची सेवा करा. मी तुम्हाला एक सुंदर गाय देतो. कराल तिची सेवा? तुमचा वेळ जाईल. करमणूक होईल. गाईसारखे जनावर नाही बघा. किती निर्मळ, सौम्य, सुंदर असते गाय! नाही? देऊ का तुम्हाला?’
‘द्या. खरेच माझा वेळ जाईल.’
‘परंतु दूध नाही हो ती फार देत.’
‘देईल तेवढे देईल. कामधेनू जर प्रसन्न झाली तर सारे देईल.’
‘परंतु ती कामधेनू हवी.’
‘भाऊराव, दुर्जनच एक दिवस संत होतात. कोळशांचेच म्हणे हिरे होतात. साध्या गाईतूनच कामधेनू तयार होत असतील. द्या तुमची गाय. ती माझी कामधेनू होईल.’
आणि एके दिवशी भाऊरावांनी ती काळी गाय वामनभटजींस दिली. वामनभटजींनी तिचे सावळी असे नाव ठेवले. जेथे पूर्वी ते बैल असत तेथे आता सावळी शोभू लागली.
ते स्वत: ती पडवी झाडीत. गोठा कसा आरशासारखा ठेवीत. पावसात घरात इतरत्र गळले तरी चालेल, परंतु गायीच्या पडवीवरची कौले नीट ठेवली जात. गोमातेच्या गोठ्यात नाही गळता कामा. पावसाळा सुरू झाला असावा. हिरवे हिरवे गवत तयार झालेले असावे. वामनभटजी मोठ्या पहाटे उठत व पाऊस नसला तर सावळीस घेऊन पसा-याला जात. पसारा म्हणजे पहाटे गुरांना पावसाळ्यातील हिरवे हिरवे गवत खायला घेऊन जाणे. वामनभटजी गाईचे गोवारी झाले. त्यांनी गुराख्यांकडून एक बांबूची बासरी करून घेतली. पहाटे रानात सावळी चरत असावी व भटजींची बासरी सुरू असावी. मध्येच बासरी थांबे व वेदमंत्र त्या वनात सुरू होत.
वेळच्या वेळेस ते पाणी पाजायचे. वेळच्या वेळेस चारा घालायचे. कधी दुपारी, कधी रात्री तिच्या मानेखाली हात घालून खाजवायचे. तिच्या अंगावरून हात फिरवायचे. सावळीही प्रेमाने त्यांचे अंग मग चाटायची.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी आटायचे. लांबून पाणी आणावे लागे. ते पाणी गढूळ असे. विहिरीच्या तळाचा गाळ त्यात असे. वामनभटजी ते पाणी गाळीत, निवळू देत आणि मग सावळीला ते निर्मळ पाणी पाजीत.